बॅंक ऑफ बडोदा ९०० शाखा कमी करणार

    दिनांक  20-May-2019


 

विजया, देना बॅंकेच्या विलीनीकरणामुळे खर्च कपातीचा निर्णय

 
 

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा देशभरातील किमान ८०० ते ९०० शाखा कमी करणार आहे. विजया आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर बॅंकेने कार्यक्षमता वाढवून खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन्ही बॅंकेच्या एकाच ठिकाणी असलेल्या शाखा आणि एटीएमची संख्या कमी केली जाणार आहे. यापूर्वी भारतीय स्टेट बॅंकेनेही पाच सहयोगी बॅंक आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केल्यानंतर देशभरातील दीड हजार शाखा बंद करण्यात आल्या होत्या.

 

तीन्ही बॅंकेच्या विलीनीकरण झाल्यानंतर एप्रिलपासून बॅंक ऑफ बडोदा ही दुसरी मोठी बॅंक बनली आहे. बॅंकेच्या देशभरात ९ हजार ५०० शाखा असून १३ हजार ४०० एटीएम आहेत. ८५ हजार कर्मचारी असून तीनही बॅंकेचे तब्बल १२ कोटी ग्राहक आहेत. बॅंकेची १५ लाख कोटींची उलाढाल असून ८.७५ लाख कोटींच्या ठेवी आणि ६.२५ लाख कोटींची कर्जे आहेत.

 

विजया आणि देना बॅंकेचे बॅंक ऑफ बडोदात विलीनीकरण झाल्यानंतर एकाच ठिकाणी तीनही बॅंकांच्या शाखा कार्यरत ठेवणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. काही ठिकाणी एकाच इमारतीत तीन बॅंकांच्या शाखा आहेत. परिणामी कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि अनावश्‍यक खर्च कमी करण्याच्यादृष्टीने अशा शाखा कमी केल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

 

यासंदर्भात निरिक्षण अहवालातून ८०० ते ९०० शाखा निवडण्यात आल्या आहेत. ज्या बंद करणे किंवा त्यांना इतरत्र हलवण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. पूर्वोत्तर राज्यांमध्ये विस्तार करण्याच्यादृष्टीने बॅंक विचार करत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat