नाशिक शहराचा मानबिंदू, भावबिंदू : राणी भवन

    दिनांक  20-May-2019राणी भवन अर्थात स्वातंत्र्य लक्ष्मी राणी लक्ष्मीबाई भवन अशी गेली ६० वर्षे ओळख असलेली जिवंत अशी वास्तू जिवंत म्हणण्याचे कारण म्हणजे सतत चाललेली सेविकांची लगबग. तसेच समाज उत्थानासाठी नवनवीन कल्पनांचे व विचारांचे विचारमंथन चालणारी वास्तू अशी ही वास्तू आपली साठी पूर्ण करून एकसष्टीत अर्थातच शतकाकडे वाटचाल करते आहे. नाशिकमधील जुना आग्रा रोड किंवा अशोकस्तंभ इथे गेली साठ वर्षे मोठ्या दिमाखात उभी आहे. राणी भवन म्हणजे नाशिक शहराचा मानबिंदू, भावबिंदूच...

 

दि. २४ मे, १९५५ या दिवशी वदंनीय मावशी.. तथा लक्ष्मीबाई केळकर (राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय प्रथम प्रमुख संचालिका) यांच्या हस्ते या संस्थेची स्थापना झाली. या दिवसाचे अजून एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे ही स्थापना झाशीच्या राणीच्या बलिदान वर्षाच्या शताब्दी वर्षांत झाली. अशी ही संस्था श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीत आहे, याचा सार्थ अभिमान सर्व सेविकांना आहे. आज खूप आठवण होते ती कै. मोडक वहिनीची, कै. इंदूकाकू, कै. कुमुदताई अभ्यंकर, कै. उषाताई चाटी व अशा अगणित सेविकांची. ज्याच्या पुढाकाराने १९५५ साली राणी भवनाचा उगम झाला. त्या बिंदूचा आता सागर झालाय. ज्यांनी ज्यांनी राणीभवन निर्मितीसाठी आणि भवनाच्या वृद्धीसाठी तनमनधन अर्पूण काम केले त्या सर्व ज्ञात अज्ञात भगिनींना राणी भवनाचे सद्यरूप आणि कार्य पाहून नक्कीच समाधान वाटत असेल. विद्यमान अध्यक्षा शांताक्का, प्रमिलाताई मेढे, चित्राताई या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने संस्था दिवसेंदिवस मोठी झाली आहे. राणी लक्ष्मी भवन हे सर्व सेविकांचे जणू माहेरघरच आहे. सेविकेला तिच्या दैनंदिन कामामधून वेळ मिळाला की, पहिली आठवण येते, ती राणी भवनची. विश्वासाने उसंत घ्यावी असे हे ठिकाण. इथे चालणारे सर्व प्रकल्प हे स्त्रीला केंद्रस्थानी ठेवूनच चालवले जातात. जागतिकीकरणाच्या रेट्यात समाजात विभिन्न प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे नाशिक शहरामध्ये शहराबाहेरून आलेल्या मुलीबाळींनी, लेकीसुनांनी नोकरी करतांना राहायचे कुठे? हा प्रश्न होता. तर हा प्रश्न सोडवला, राणी भवनाच्या महिला वसतिगृहाने. अत्यंत सुरक्षित व सुसज्ज अशा या महिला वसतिगृह व मुलींची सोय खूपच अप्रतिम आहे. इतकेच काय? नोकरी करणार्‍या महिलांच्या मुलांना सांभाळण्यासाठी राणी भवनामध्ये गोकुळ पाळणाघर सुरू झाले...

 

राणी भवनमधील अष्टभुजेचे मंदिर व त्या हॉलमध्ये चालणारी राष्ट्र सेविका समितीची शाखा हे खूप मोठे सकारात्मक विचारांचे व्यासपीठ आहे. स्त्रीचा व्यक्तिमत्त्व विकास अष्टभुजेसारखा सर्वांगाने व्हावा, हा विचार इथे रुजला. इथे मानसिकदृष्ट्या मुली-महिला सक्षम कशा होतील, हे बघितले जाते. मुलीवर होणारे संस्कार हे सर्वार्थाने स्त्री मुक्ती नसून तर त्या संस्काराने स्त्रीची शक्ती जागृत झाली पाहिजे. हे संस्कार इथे मुलींवर केले जातात. नाशिकच्या समाजजीवनात राणी भवनचा गेली ६० वर्षे मोलाचा वाटा आहे. स्त्रीची बौद्धिक पातळी वाढावी, त्यांना नवनवीन तंत्रज्ञान माहिती व्हावे या आधुनिक काळाच्या कसोटीवर ती सक्षमपणे उभी राहावी म्हणून इथे प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रभक्ती हा राणी भवनचा गाभा आहे, विचारांचा गाभा आहे. प्रखर राष्ट्रभक्ती व उत्तम अष्टभुजेसारखी तेजस्वी ज्वाला स्त्रीच्या मनात निर्माण होईल, याची काळजी प्रत्येक कार्यक्रमातून घेतली जाते.पौरोहित्य हा विषय काही वर्षांपर्यंत किंवा आधी फक्त पुरुष किंव्हा बंधुवर्गापुरता मर्यादित होता. परंतु, राणी भवनमध्ये स्त्रियाच पौरोहित्य करतात, ही गोष्ट नवीन राहिली नाही. प्रतिवर्षी, नवीन बॅच राणी भवनमधून शिकून बाहेर पडते.

 

एका स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे म्हणून नावारूपाला आलेले उद्योगमंदिर महिलांना घरगुती शेव, चकल्या, मसाले, फराळाच्या इतर पदार्थांची विक्री व्यवस्था राणी भवनने जिजामाता उद्योग केंद्राची स्थापना करून उद्योजिका व नोकरी करणार्‍या महिला दोन्हींचीही राणी लक्ष्मी भवनेने गरजपूर्ती केली आहे. दरवर्षी एका गरजू महिलेला वैद्यकीय मदत दिली जाते. टी. बी. सॅनेटरीयम येथे प्रतिमाह फळवाटप केले जाते. रुग्णोपयोगी साहित्य नाममात्र शुल्क घेऊन पुरविले जाते.संस्थेत गीतापाठ, भजनी मंडळ, तिळगुळ समारंभ, झेंडावंदन, रामनवमी उत्सव, झाशीची राणी पुण्यतिथी, हळदीकुंकू असे समाजोपयोगी कार्यक्रम संस्थेतर्फे महिलांच्या संघटनाकरिता वर्षभर चालूच असतात. अशा या स्वातंत्र्य लक्ष्मी राणी लक्ष्मी भवन या संस्थेत आपणही भेट देऊन आमचा आनंद द्विगुणित करावा व राणीभवनच्या भरभराटीसाठी आपला आशीर्वाद आम्हाला मिळावा, हीच प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना!

 

राणी भवन शौर्य पुरस्काराचे वितरण : राणी भवनचा हीरक महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा २४ मे, २०१९ रोजी प्रसाद मंगल कार्यालय गंगापूर रोड येथे अध्यक्षा शांताक्का यांच्या उपस्थितीत होत आहे. वक्ते सच्चिदानंद शेवडे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. अ‍ॅड. विवेक तांबे शौर्य पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमात होणार असून पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सारिका अहिरराव पवार यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, ही आग्रहाची विनंती.

वसुधा विद्याधर लगड

८५५४९८२००१

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat