रवी मी...

    दिनांक  02-May-2019


 

मराठी संगीतसृष्टी आणि रंगभूमीला लाभलेलं एक रत्नं म्हणजे वसंत बाळकृष्ण देशपांडे. त्यांची आज जयंती. २ मे १९२० साली अकोल्यातील मूर्तिजापूर या गावी त्यांचा जन्म झाला. पंडित वसंतराव देशपांडे म्हटलं की एक अतिशय शांत आणि सोज्वळ प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध गायक आणि रंगभूमीवरील अतिशय उत्तम नट म्हणून डॉ. वसंतराव देशपांडे यांची ओळख आहे.वसंतराव देशपांडे यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांच्या गण्यावर पं. दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचाही प्रभाव होता. प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतलं. 

राग राज-कल्याण ही वसंतरावांनी शास्त्रीय संगीताला दिलेली देणगी आहे. ठुमरी
, दादरा आणि गझल हे हिंदूस्तानी संगीताचे तीनही प्रकार त्यांनी अत्यंत सहजतेने सादर केले. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत यामध्ये तर त्यांचे प्रभुत्व होतेच मात्र हार्मोनियम आणि तबल्यामध्ये देखील ते पारंगत होते.वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांनी कालिया मर्दन या चित्रपटात कृष्णाचं काम केलं. संगीत नाटकांच्या सुवर्णयुगात कट्यार काळजात घुसली
, वीज म्हणाली धरतीला, तुकाराम, हे बांध रेशमाचे या नाटकांमुळे ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. कट्यारमध्ये त्यांनी साकारलेली खांसाहेबांची भूमिका इतकी अजरामर ठरली की लोक त्यांना पंडित वसंतखान देशपांडे अशा आगळ्यावेगळ्या नावाने ओळखत असत. त्यानंतर दुधभात, अष्टविनायक या चित्रपटांतही त्यानी काम केले. पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार याबरोबरच तब्बल ८० हून जास्त चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं.

१९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ३० जुलै, १९८३ रोजी त्यांचे निधन झालं. मात्र त्यांनी आपल्या संगीताला वाहून घेतलेलं त्यांचं आयुष्य आणि कष्ट कधीच वाया जाणार नाहीत. त्यांनी दिलेला हा संगीताचा वारसा कायमच तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat