पंजाबच्या संघावर निलंबनाचे काळे ढग ?

    दिनांक  02-May-2019नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योजक नेस वाडियाला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमधील सपोरो न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नेस वाडिया हे आयपीएल संघाचे सह- मालक आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघावरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. नेस वाडिया प्रकरणामुळे प्रीती झिंटाच्या पंजाब संघाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे दिसत आहे.

 

आयपीएलच्या नियमांनुसार, कोणत्याही संघातील व्यक्ती मैदानात किंवा मैदानाबाहेर दोषी आढळल्यास त्याचा परिणाम संघालादेखील भोगावा लागतो. दोषी असल्यास संघाचे निलंबन होऊ शकते. काही वर्षांपूर्वी चेन्नई आणि राजस्थानच्या संघालादेखील अशाच प्रकारे अडचणीत आला होता. मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नईचे मालक गुरुनाथ मेयप्पन आणि राज कुंद्रा हे दोषी आढळले होते. त्यामुळे दोन्ही संघांवर २ वर्षाची बंदी लावण्यात आली होती. नेस वाडिया यांच्यावर तुरुंगवासाची कारवाई झाल्यामुळे पंजाबचा पूर्ण संघ निलंबित होऊ शकतो असे सांगण्यात येत असले तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

नेस वाडियाची ही शिक्षा ५ वर्षांसाठी निलंबित ठेवण्यात आली आहे. पुढील ५ वर्षांच्या काळात नेस याने गुन्हा केल्यास त्याला तुरुंगात धाडले जाईल. वाडियाला उत्तर जपानमधील होक्काइदो विमानतळावर न्यू चितोसे विमानतळावर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अटक करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे २५ ग्राम कॅनाबीस रेझिन आढळले होते. या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नेस वाडिया २० मार्चपूर्वी जपानमध्ये पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर जामीन मिळवून तो भारतात आला. आपण खासगी वापरासाठी अंमली पदार्थ जवळ बाळगल्याचे कबूल केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat