नवी दिल्ली : भारताचा महत्वाकांक्षी 'चांद्रयान-२' मोहिमेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने सांगितले की, 'चांद्रयान-२'चे प्रक्षेपण ९ आणि १६ जुलैच्या दरम्यान होईल. ही माहिती इस्रोच्या अधिकृत ट्विटरवर जाहीर केली. प्रक्षेपणानंतर ६ सप्टेंबर रोजी चांद्रयान- २ चंद्रावर दाखल होईल असे इस्रोने सांगितले आहे. चांद्रयान-२ मध्ये ३ मॉड्यूल ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर ( प्रज्ञान) यांचा अंतर्भाव असणार आहे.
प्रक्षेपण झाल्यानंतर जेव्हा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर लॅण्डर त्याच्यापासून वेगळा होऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील निर्धारित स्थानावर पोहोचेल. यानंतर रोवर यामधून बाहेर पडून चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन तिथले नमुने एकत्र करेल आणि त्याची माहिती इस्रोला पाठवेल. ही सगळी प्रक्रिया ६ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज इस्रोने वर्तविला आहे.
याआधी काही चाचण्या पूर्ण न झाल्याने इस्रोने चांद्रयान-२ प्रक्षेपण केले नव्हते. भारताच्या पहिल्या चांद्रयानसोबत रोवर आणि लॅण्डर नव्हता. यंदा रोवर आणि लॅण्डरही चांद्रयान-२चा भाग आहे. इस्रोने चांद्रयान-२ याआधी २०१७ आणि मग २०१८ मध्ये प्रक्षेपण करण्याची घोषणा केली होती, पण ते शक्य झाले नाही. यापूर्वी २५ ते ३० एप्रिलच्या दरम्यान चांद्रयान-२चे प्रक्षेपण होणार होते.
चांद्रयान-२ची वैशिष्ट्ये
- चांद्रयान-२चे वजन ३२९० किलो असेल.
- चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळा होईल.
- यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि मग रोवर त्यापासून वेगळा होईल.
- ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरा आणि सेंसर असतील.
- तर रोवरमध्येही अत्याधुनिक उपकरणे असतील.
- हे दोन्ही चंद्राच्या पृष्ठभागावर मिळणारे मिनरल्स आणि इतर पदार्थांची माहिती पाठवतील.
- त्या माहितीच्या आधारावर इस्रो त्यावर अभ्यास करेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat