ग्लेशियर वाचवा, जग जगवा!

    दिनांक  02-May-2019   


पर्वतराजींवरील हे बर्फाच्छादित आवरण, ज्याला ‘ग्लेशियर’ म्हटले जाते, ते ग्लेशियर माणसाला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे साधन आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे, प्रदूषणामुळे या ग्लेशियर्सचे विघटन होत आहे. ते वितळत आहेत.


पाण्याच्या तीव्र टंचाईने जगभरातील देश चिंतेत आहेत. कधीकाळी भूभागासाठी युद्धे होत. पुढे तेलसाठ्यांसाठी युद्धे झाली. पण, येणाऱ्या काळात पाण्याच्या साठ्यांसाठी युद्धे होतील, असे भयानक चित्र सध्या दिसते. या पार्श्वभूमीवर हिमालय पर्वतशिखरांवरील बर्फाच्छादित आवरणाचे महत्त्व फार आहे. कारण, पर्वतराजींवरील हे बर्फाच्छादित आवरण, ज्याला ‘ग्लेशियर’ म्हटले जाते, ते ग्लेशियर माणसाला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे साधन आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे, प्रदूषणामुळे या ग्लेशियर्सचे विघटन होत आहे. ते वितळत आहेत.

 

या ग्लेशियरबाबतहिंदुकुश हिमालय असेसमेंट’ ने आपल्या अभ्यासात असे नमूद केले आहे की, ‘या शतकाच्या उत्तरार्धात हिमालय पर्वतावरील ग्लेशियरचा मोठा भाग नामशेष होणार आहे.’ यावर भाष्य करत काठमांडू नेपाळच्या एका संस्थेने असे स्पष्ट केले आहे की, “पर्यावरणावरचा समतोल राखत प्रदूषणाला आळा घातला गेला नाही, तर २१ व्या शतकात पाण्याचे महत्त्वाचे स्त्रोत मानल्या गेलेल्या या ग्लेशियरचा दोन तृतीयांश हिस्सा आपण गमावणार आहोत.” तर ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट’च्या फिलिप्स वेस्टर यांचे मत आहे की, “जागतिक वाढत्या तापमानामुळे हिंदुकुश पर्वत ज्या ग्लेशियरने आच्छादित आहेत, त्यासुद्धा वितळतील. त्यांच्या वितळण्याचा वेग इतका असेल की, एका शतकाच्या आतच या पर्वतराजी ग्लेशियरविहिन होतील. फिलिप्स वेस्टर यांचे हे विधान अतिशय गंभीर आहे. कारण, ज्या पर्वतराजीसंबंधी फिलिप्स यांनी इशारा दिला आहे, ती पर्वतराजी आशिया खंडाच्या आठ देशांमधून विराजमान आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, चीन, भूतान, बांगलादेश, म्यानमार या देशांमधून या पर्वतांंचे उंचच उंच अस्तित्व जाणवते. इतकेच नव्हे तर सिंधू, गंगा, यांग्सी, इरावती, मेकाँग या आशिया खंडातील जीवनदायिनी नद्या. या नद्यांचे जलस्त्रोत हे हिंदुकुश पर्वतराजीतील ग्लेशियरच आहेत.

आशिया खंडातील आठ देशांचे जलवितरण ज्या नद्यांवर अवलंबून आहे, त्या नद्यांचे मूळ जलस्त्रोतच जर नामशेष झाले, तर या नद्यांचे अस्तित्वच संपणार आहे. त्यामुळे या नद्यांवर अवलंबून असलेल्या देशांचेही अपरिमित नुकसान होणार आहे. कारण, जल नही तो कल नही. जलस्त्रोत नामशेष होण्यापर्यंतचा हा प्रवास नाही, तर वितळलेले ग्लेशियर प्राथमिक स्तरावर नद्यांची पातळी वाढवेल. त्यामुळे महापूर, वादळ वगैरेंची संख्या झपाट्याने वाढेल. जगभरात महापूर, वादळ यांचा सैतानी नाच सुरू आहे. तो ग्लेशियर वितळण्याच्या पूर्वार्धातला पहिला टप्पा आहे. ग्लेशियर वितळण्यामुळे काय होईल याची झलक म्हणून सोलोमन द्वीप आणि जकार्ता शहरांकडे पाहता येईल. सोलोमन द्वीप आणि जकार्ता पाण्याच्या दबावाने खचत चालले आहेत, येणाऱ्या काही वर्षात इथला भूभाग जलमय झालेला असेल, असे वातावरण आहे. त्याही पुढे जाऊन ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ने जगभरातील ग्लेशियर्सचा अभ्यास केला. या अहवालानुसार, हिमालयचे खुम्भू, स्विर्त्झलंडचे ग्रोसर एल्चेस्टर आणि ग्रीनलँडचे जैकबशावन इजब्रेस या महत्त्वाच्या ग्लेशियर्सचे भरपूर नुकसान होणार आहे.

जगभरातील ४६ ग्लेशियरपैकी २१ ग्लेशियर २१व्या शतकाच्या अंतापर्यंत नामशेष होतील
, असाही दावा केला जातो. सिंधू संस्ृतीचे आपण अवशेष पाहतो. पण, ही सिंधू संस्कृती का लोप पावली, याचा अभ्यास करणाऱ्यांनी निष्कर्ष काढला होता की, या परिसरातील पर्वतराजीवरील बर्फाच्छादित आवरण या परिसरातील नद्यांचे जलदाते होते. हे ग्लेशियर वितळले आणि नद्यांवर जलसंकट आले. साधारण ९०० वर्षे हा परिसर बिनपाण्याचा राहिला. त्यामुळे इथले जनजीवन संपुष्टात आले. या पार्श्वभूमीवर जगाच्या पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या ४६ ग्लेशियर्सपैकी २१ ग्लेशियर्सचे विघटन होणे, मृत होणे ही जगासाठी धोक्याची घंटा आहे. कारण, या ग्लेशियरच्या विघटनामुळे समुद्र आणि नद्यांची पातळी अभूतपूर्व वाढणार आहे. त्यामध्ये मानवी जीवनाचे अस्तित्व पणाला लागणार आहे. भयंकर जलप्रवाहातून जरी वाचलो तरी पाण्याचे स्त्रोत संपल्यामुळे निर्माण झालेल्या मरणासन्न पाणीटंचाईचे काय? जगाला सिंधू संस्कृतीसारखे इतिहासात धाडायचे नसेल तर ग्लेशियर वाचवा, जग जगवा!


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat