२१ एप्रिल, पुढे काय?

    दिनांक  02-May-2019   
श्रीलंका बौद्धधर्मीय जरी असला तरी तो अहिंसावादी देश नाही. तामिळी दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी जी लढाई दिली, ती अहिंसक नव्हती. दहशतवाद अहिंसेच्या तत्त्वाने संपणारा नाही. ‘इसिस’चा हा नवा दहशतवाद श्रीलंका कसा संपवेल, हे बघावे लागेल.


रामायणातील श्रीलंका आपल्या सर्वांना माहीत असते. आताची लंका भूगोलाच्या दृष्टीने रामायणकालीन जरी असली तरी राजकीयदृष्ट्या श्रीलंका एक स्वतंत्र देश आहे. रामायणाच्या काळात तेथे रावणाचे राज्य होते आणि रावण हा वेदशास्त्रसंपन्न ज्ञानी राजा होता. काळ बदलत गेला आणि श्रीलंकेतील जनतेने वैदिक पद्धती सोडून बुद्ध पद्धतीचा अवलंब केला. पुढे इंग्रजांचे राज्य आले. त्यामुळे ख्रिश्चन धर्माला आणि भारतातून आणि मध्य आशियातून इस्लामचा प्रवेश झाला. सिलोनमधील ७० टक्के जनता बौद्ध आहे, ७ टक्के ख्रिश्चन आहेत आणि १२ टक्के मुसलमान आहेत.
 
 
श्रीलंकेतील मुसलमानांनी फुटीरतावादी चळवळ उभी केली, असे कधी ऐकिवात नाही. जगभर मुस्लीम दहशतवादी धुमाकूळ घालत असताना, श्रीलंकेत त्यांनी कधी बॉम्बस्फोट केल्याचे किंवा दहशतवादी कृत्य केल्याचे वाचनात आले नाही. ‘तामिळ येलम्’ चा दहशतवाद हा श्रीलंकेचा ज्वलंत विषय होता. प्रभाकरन् आणि त्याच्या संघटनेने अतिशय अमानुष अशी कृत्ये श्रीलंकेत केली. शेवटी त्याचा बिमोड झाला आणि तो मारला गेला. श्रीलंकेत ‘इसिस’ने सात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले आणि पुन्हा एकदा श्रीलंका दहशतवादाने होरपळून निघाली. या साखळी बॉम्बस्फोटात २६० हून अधिक लोक ठार झाले आहेत.
 
मेलेल्यांमध्ये कुणीही सुरक्षा दलाचा नाही, सैनिक नाही, राजकीय नेते नाहीत, ही सर्वसामान्य माणसे आहेत. चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाले. प्रार्थनेसाठी ख्रिश्चन बांधव जमले होते. ईस्टर संडेचा दिवस होता. येशू ख्रिस्त यांचे थडग्यातून जिवंत बाहेर येणे, या दिवशी घडले, त्या दिवसाला ‘ईस्टर संडे’ म्हणतात. हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. देवाच्या प्रार्थनेसाठी जमलेले श्रद्धावान, अल्लाचा आदेश मानून ठार केले गेले. परमेश्वर एकच आहे, मग हे कसे काय घडले? एकाचा परमेश्वर प्रार्थनेसाठी बोलावतो आणि दुसर्‍याचा परमेश्वर त्यांना ठार करण्यासाठी बोलावतो, याची सांगड कशी काय घालायची? अवघड प्रश्न आहे.
 
 
‘नॅशनल तौहिद जमात’ची मदत घेऊन ‘इसिस’ने हे कृत्य केलेले आहे. सर्व बॉम्बस्फोट आत्मघातकी तरुणांनी केले. हे तरुण अतिशय संपन्न परिवारातील आहेत. मोहम्मद युसूफ इब्राहिम हा मसाल्याचा मोठा व्यापारी आहे. त्याची दोन मुले आत्मघातकी बनून बॉम्बस्फोट घडवून आणतात. दोन्ही मुले उच्चविद्याविभूषित आहेत. एकाचे नाव आहे इन्साफ इब्राहिम आणि दुसर्‍याचे नाव आहे इल्हाम. सामन्यतः मुले उच्च शिक्षण घेतात, कशासाठी तर जीवनात स्थैर्य प्राप्त व्हावे, चांगला पैसा मिळावा आणि आरामदायक जीवन जगता यावे. या प्रेरणांवर मात करून मरणाची प्रेरणा निर्माण करणे, एवढे सगळे असतानादेखील मरण जवळ करणे, हे सर्व डोके चक्रावून टाकणारे आहे.
 
 
 
चांगले सुशिक्षित तरुण आत्मघातकी कसे काय बनतात, कसे बनविले जातात, याचे उत्तर जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत हे दहशतवादी हल्ले किंवा मोठ्या प्रमाणात निरपराध्यांना मारण्याचे प्रकरण संपणे अशक्य आहे. ९/११ चा मास्टर माईंड ओसामा बिन लादेन याला २०११ साली अबोटाबाद येथे अमेरिकेने ठार केले. ‘अल कायदा’ संपली, असे तेव्हा अमेरिकेला वाटले. ‘अल कायदा’ संपली नाही, त्यातून ‘इसिस’चा जन्म झाला. जे ‘अल कायदा’ला जमले नाही, ते ‘इसिस’ने मध्य आशियात करून दाखविले. त्यांनी ‘इस्लामी स्टेट’ उभे केले. अबू बकर अल बगदादी ‘इसिस’चा प्रमुख झाला. ‘इस्लामी खिलाफत’ची घोषणा त्याने केली. जगातील मुसलमानांना आवाहन केले. बेल्जियम ते मालद्वीप अशा दूरदूरच्या देशातून मुस्लीम तरुण ‘इसिस’मध्ये भरती होण्यासाठी इराकला पोहोचले. इंग्लंडमधूनच जवळजवळ हजारांहून अधिक मुसलमान ‘इसिस’मध्ये भरती होण्यासाठी गेले. अबू बकर अल बगदादीने जिहादी इस्लामी राज्य उभे केले. 
 
त्याच्याकडे इराक आणि सीरियाचा सुन्नी बहुसंख्य असलेला भूभाग आला. तेलाच्या विहिरी त्याच्या ताब्यात आल्या, शस्त्रांचे मोठे साठे त्याला सापडले, तस्करीचे मार्ग त्याच्या हातात आले आणि जवळजवळ ७० -८० लाख लोकसंख्या त्याच्या अमलाखाली आली. एक राज्य उभे करण्यासाठी लागणारी साधने आणि जनसंख्या तसेच सैनिकी ताकद बगदादीच्या हातात आली. बगदादी हा जगाच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक माणूस ठरला. त्याच्या विरुद्ध अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स यांनी आघाडी उघडली, नंतर रशियादेखील त्यात सामील झाला. तुफानी बॉम्बस्फोट करून बगदादीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. इराकमधील मोसूल ही ‘इसिस’ची राजधानी होती, तिचा पाडाव झाला. सीरियातील रक्का हे शेवटचे शहर काही दिवसांपूर्वी पडले. ‘इसिस’ची राजवट संपली. ‘इसिस’चा म्होरक्या अबू बकर अल बगदादी जिवंत आहे की मेला, त्याबद्दल निश्चितपणे कुणी काही सांगत नाही.
 
बगदादी मेला की जिवंत आहे? ‘इसिस’ संपली की नाही? हे प्रश्न एवढे महत्त्वाचे नाहीत, महत्त्वाचा प्रश्न आहे, जिहादी दहशतवाद संपला की नाही, याचा. संघटनेची नावे बदलत जातील, नेते मारले जातील, नवीन नेता उभा राहील आणि संघटनेचे नाव नवीन निर्माण होईल. जिहादी दहशतवाद, जिहादी ठार मारून संपणार नाही. प्रश्न जिहादी का निर्माण होतात, याचा आहे. त्या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत शोधले जात नाही, तोपर्यंत दहशतवादी हल्ले संपणे शक्य नाही.
 
 
 
श्रीलंकेतील दहशतवादी नरसंहाराच्या पूर्वसूचना अध्यक्ष आणि पंतप्रधान यांना देण्यात आल्या होत्या. भारतीय गुप्तचर विभागानेदेखील ही गोपनीय माहिती श्रीलंकेला दिल्याचे उघड झाले आहे. परंतु, त्यानुसार कारवाई मात्र शासनातर्फे झाली नाही. अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना आणि पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठीच आपल्या पदावर बसले आहेत. देशाचे सर्वोच्च नेते जेव्हा देशाच्या संरक्षणाचा विचार सोडून पक्षीय राजकारण करीत बसतात, तेव्हा जिहादी दहशतवाद्यांना मोकळे रान मिळाले, याचे आश्चर्य वाटायला नको. कार्डिनल मालकम् रणजित म्हणतात,“गुप्तचर विभागाने इशारे देऊनही त्यावर शासनाने कारवाई न केल्यामुळे आमचा विश्वासघात झाला आहे, अशी आमची भावना झाली आहे.” पंतप्रधान रणिल विक्रमसिंगे म्हणतात,“आम्ही सामूहिक जबाबदारी स्वीकारतो आणि या दुःखदायक घटनेत बळी गेलेल्यांचे रक्षण आम्ही करू शकलो नाही, याबद्दल माफी मागत आहोत.”
 
 
आता श्रीलंकेत आणीबाणी आहे, पोलिसांना भरपूर अधिकार दिले आहेत, पोलिसांचा अंदाज असा आहे की, अजून काही आत्मघातकी मोकाट सुटलेले आहेत. त्यांचा शोध घेणे चालू आहे. एका घरावर छापा मारला असताना गोळीबार झाला, नंतर मोठे स्फोट झाले आणि त्यात सहा पुरुष, तीन महिला आणि सहा मुले ठार झाली. ही शोध मोहीम आणखी काही काळ चालेल आणि त्यात अनेकजण सापडतील, अनेकजण पकडले जातील, सुक्याबरोबर ओलेही जळते, या न्यायाने दहशतवादी कृत्याशी संबंध नसलेले अनेकजण त्यात भरडले जातील. 
  
 
हा दहशतवादी हल्ला मुसलमानांनी केला, याचा परिणाम श्रीलंकेतील सगळ्या मुस्लीम समुदायाला भोगावा लागेल. हे जरी खरे असले की, दहशतवादी जरी मुसलमान असले तरी सगळेच मुसलमान दहशतवादी नसतात. परंतु त्यात फरक कसा करायचा, हा मोठा प्रश्न असतो. मोहम्मद युसूफ इब्राहिम हा मसाल्याचा मोठा व्यापारी आहे. व्यापारी माणसाचे सर्वांशी फार चांगले संबंध असतात, व्यापारी गोडबोल्या असतो, त्याचीच दोन मुलं आत्मघातकी दहशतवादी होतात, तेव्हा विश्वास कोणावर ठेवायचा, हा प्रश्न निर्माण होतो. श्रीलंका बौद्धधर्मीय जरी असला तरी तो अहिंसावादी देश नाही. तामिळी दहशतवाद्यांविरुद्ध त्यांनी जी लढाई दिली, ती अहिंसक नव्हती. दहशतवाद अहिंसेच्या तत्त्वाने संपणारा नाही. ‘इसिस’चा हा नवा दहशतवाद श्रीलंका कसा संपवेल, हे बघावे लागेल, एवढे मात्र खरे की, २१ एप्रिलपूर्वीची श्रीलंका आणि २१ एप्रिल नंतरची श्रीलंका यात खूप अंतर असेल. 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat