हिंदू एकता दिंडीत हिंदु राष्ट्राचा जयघोष

    दिनांक  19-May-2019मुंबई : अखंड हिंदु राष्ट्रच्या स्थापनेची संकल्पना मांडून ती साकार करण्यासाठी समस्त हिंदूंना संघटित करणारे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने १९ मे या दिवशी मुंबई येथे भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. अश्वारूढ वीरांगणा, लाठी-काठी, दांडपट्टा, दंडसाखळी आदी मर्दानी खेळ, विविध लोककला आदींसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना या दिंडीत सहभागी झाल्या होत्या.

 

आर्थर रोड (चिंचपोकळी) येथून दुपारी ४.३० वाजता दिंडीला प्रारंभ झाला. शंखनाद, त्यानंतर धर्मध्वजाचे पूजन झाले. मुंबईची ग्रामदेवी मुंबादेवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीत ठेवण्यात आलेल्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्रीफळ वाढवून दिंडीला प्रारंभ झाला. ना.म. जोशी मार्ग, करीरोड ब्रीज या मार्गे जाऊन लालबाग येथील भारतमाता चौक येथे दिंडीची सांगता झाली. या दिंडीमध्ये तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परशुराम क्रीडामंडळ (काळाचौकी), श्रीराम गणेश मंदिर (धारावी), रायगड संवर्धन प्रतिष्ठान, व्रजदल आदी स्थानिक संघटना आणि मंडळे, बजरंगदल, हिंदु महासभा, लष्कर-ए-हिंद आदी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांसह शिवसेना, भाजप आदी राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या दिंडीमध्ये डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती यासंह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.

 

प्रारंभी मर्दानी खेळ, हिंदु जनजागृती समितीच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणार्थीची शौर्य जागरणाची प्रात्यक्षिके, वासुदेव,डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, लेझीम पथक, प्रारंभी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चित्र असलेला फुलांनी सजवलेला चित्ररत, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे स्मरण करून देणारे रणरागिणी शाखेचे लाठीधारी महिला पथक, टाळ-मृदूंग यांच्या गजरात हरिनाम गजर करणारे वारकरी, लेझीम पथक, छत्रीच्या माध्यमातून अध्यात्मप्रचार करणारे सनातनच्या साधक, राष्ट्रपुरुषांची वेशभूषा साकारलेले बालसाधक, हिंदु जनजागृती समितीचे प्रथमोपचार आणि आपत्कालीन साहाय्य पथक आदी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडीमध्ये सर्वत्र हातात भगवे ध्वज हातात धरून, फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेत धर्मप्रेमी सहभागी झाले होते. अनेक संतांनी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, हे आधीच सांगितले आहे. रामसेतु बांधतांना ज्याप्रमाणे वानरसेना सहभागी झाली. त्याप्रमाणे हिंदूंनी या कार्यात योगदान द्यावे. जागृत, संघटित आणि धर्माचरणी हिंदू हेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे बळ आहे.

 

"जागृत, संघटित आणि धर्माचरणी हिंदू हे हिंदु राष्ट्र स्थापनेचे बळ !"

 

- सतीश कोचरेकर, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat