नव्या भारताची 'हिरकणी'

    दिनांक  19-May-2019मनात जिद्द आणि चिकाटी असली की, आपण कुठलेही शिखर सर करू शकतो. याचे ताजे उदाहरण म्हणजे साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहिते. आज जाणून घेऊया या आधुनिक भारताच्या हिरकणीबद्दल थोडेसे...


महाराष्ट्राच्या इतिहासात 'हिरकणी'ला जिद्द, चिकाटी आणि साहसी कृत्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून ओळखले जाते. स्वत:च्या तान्ह्या बाळाच्या प्रेमापोटी तिने किल्ले रायगडाच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. २ हजार ७०० फूट उंची असलेल्या या गडावरून खाली उतरायचे म्हणजे साहस आणि धैर्याचे काम. असे म्हटले जायचे की, रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येई ती फक्त हवा आणि वरून खाली जाई ते फक्त पाणी. पण या गोष्टीला अपवाद ठरणारी एक स्त्री म्हणजेच 'हिरकणी.' भल्या अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव पणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण, सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडे-झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी या मातेने हा निर्णय घेतला. याच गोष्टीचे साधर्म्य साधणारे सध्याचे उदाहरण म्हणजे अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी राहणारी 'प्रियांका मोहिते.' साताऱ्याच्या या हिरकणीने जगातील सर्वात उंच अशी तीन आठ हजार मीटर्स उंचीची शिखरे गाठण्याचा पराक्रम केला. याच कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा 'शिवछत्रपती पुरस्कार' देऊन गौरवले.

 

प्रियांका मंगेश मोहिते हिचा जन्म साताऱ्यामधील एका सामान्य कुटुंबात झाला. साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी राहत असल्यामुळे तिला बालपणापासूनच गड-किल्ल्यांबद्दल प्रचंड ओढ होती. दर शनिवारी-रविवारी भावंडांसोबत तसेच कुटुंबासोबत अजिंक्यतारा फिरण्याचा तिचा बेत असायचा. तिच्या याच ओढीने प्रियांकाच्या मनात सह्याद्री पर्वतरांगेबद्दल औत्सुक्य, जिज्ञासा निर्माण झाली व तिची पावले सह्याद्रीकडे वळली. सातवीपासून तिचा ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला. साताऱ्यातील सह्याद्री ट्रेकिंग संस्थेसोबत तिने ट्रेकिंगचा प्रवास सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन तिने १०० पेक्षाही अधिक गड-किल्ले सर केले. सलग तीन वर्षे ट्रेकिंग केल्यानंतर प्रियांकाने आपला मोर्चा गिर्यारोहणाकडे वळवला. दहावीत असताना शिक्षक कैलास बागल यांच्या प्रोत्साहनाने तिने हिमालयातील 'नीम' संस्थेत प्राथमिक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे ठरवले. पण तिथे वय कमी पडत असल्याने तिला प्रवेश मिळाला नाही, तरीही त्याने निराश न होता प्रियांकाने बारावीपर्यंत राजगड-तोरणा, शिवथरघळ अशा लाँग ट्रेल्स करण्यास सुरुवात केली. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने पुन्हा एकदा प्राथमिक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यावेळी तिने 'गंगोत्री ग्लेशिअर'मध्ये १७ हजार फूट उंची गाठली होती. त्यामध्ये तिने 'अ' श्रेणी मिळवली. त्याचवेळी कृष्णा पाटील अवघ्या १९व्या वर्षी 'एव्हरेस्ट' चढाई करणारी सर्वात लहान भारतीय महिला ठरली होती. योगायोगाने कृष्णाचा अनुभव आणि धैर्य पाहूनही प्रियांकाला बळ मिळाले. कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा आणि तिची जिद्द या सगळ्यामुळे तिने पुढे 'एव्हरेस्ट'सर करण्याचा मानस आखला.

 

यानंतर तिने अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे बऱ्यापैकी कठीण असलेले उत्तराखंडातील 'माऊंट बंदरपूंछ' शिखर प्रियांकाने पहिल्यांदा सर केले. या यशानंतर विविध अडचणी पार करत २२ मे, २०१५ ला 'एव्हरेस्ट'चे शिखर गाठले. तरुण वयात 'माऊंट एव्हरेस्ट' सर करणारी ती तिसरी भारतीय ठरली. तिचा हा प्रवास इथपर्यंतच थांबला नाही, तर जगातील १४ महत्त्वाची शिखरे पार करण्याचा निर्धार तिने केला. त्याप्रमाणे तिची तयारीदेखील चालू झाली. पुढे तिने 'माऊंट किलिमांजारो'चे शिखरदेखील सर केले. या शिखराची उंची १९ हजार, ३४१ फूट एवढी आहे. त्यानंतर प्रियांकाला २०१८ मध्ये 'माऊंट ल्होत्से' सर करण्याची संधी मिळाली आणि तिथेही तिने भारताचा झेंडा फडकावला. २०१९ च्या मे महिन्यात तिने 'मकालू' शिखर सर करण्याची किमया केली. मकालू शिखर सर करणारी प्रियांका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली. मकालूची उंची आठ हजार मीटरपेक्षा जास्त आहे. हे शिखर जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. महाराष्ट्राच्या या कन्येला हा प्रवास करताना अनेक आर्थिक अडचणींसोबत मानसिक, शारीरिक अडचणींचादेखील सामना करावा लागला. परंतु, केलेल्या निश्चयावर ठाम राहत तिने हे पराक्रम केले.

 

विशेष म्हणजे, हे सर्व करताना प्रियांकाने अभ्यासाशी कधीच तडजोड केली नाही. दोन्ही गोष्टी सांभाळून तिने २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठातून एम. एस्सी. (बायोटेक) ही पदवी मिळवली. गिर्यारोहण आणि अभ्यास याचा योग्य समतोल साधत तिने नव्या पिढीसमोर एक वेगळे उदाहरण ठेवले आहे. तसेच, प्रियांकाला मिळणारे कुटुंबाचे पाठबळ हेदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. सध्या प्रियांका 'सिन्जीन इंटरनॅशनल लिमिटेड बायोकॉन' या बंगळुरूतील कंपनीमध्ये नोकरी करते. सकाळी ८ ते सायंकाळी ५ अशा कार्यालयीन वेळेत नोकरी करतानादेखील गिर्यारोहणासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रियांकाची मेहनत चालू असते. शिवाय, शनिवार रविवार या सुट्टीच्या वेळेतदेखील ट्रेकिंगचा तिचा सराव थांबत नाही. अशा मेहनती आणि ध्येयपूर्तीशी ठाम असलेल्या या महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या हिरकणीला जगातील अशीच उत्तुंग शिखरे गाठण्यासाठी अनेक शुभेच्छा...!

 

- अभिजित जाधव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat