पंतप्रधान केदारनाथांच्या चरणी नतमस्तक

    दिनांक  18-May-2019 


उत्तराखंड : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. केदारनाथला जाऊन केदारनाथांचे दर्शन घेऊन त्यांनी या दौऱ्याची सुरुवात केली. एका विशेष हेलिकॉप्टरने पंतप्रधान मोदी केदारनाथ मंदिराजवळ पोहचले.

 

केदारनाथला पोहचल्यानंतर मोदींनी बाबा केदार मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन ध्यान धारणा केली. यावेळी पुजाऱ्याने त्यांना रुद्राक्षची माळ घालत व कपाळी चनदांचा टिळा लावत मंदिराच्या वतीने स्वागत केले. मोदींनी खास पारंपरिक गढवाली पोशाख परिधान केला होता. दर्शन झाल्यानंतर मोदींनी मंदिर परिसरातील कामकाजांचा आढावा घेतला.

 

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदींची केदारनाथला ही चौथी भेट आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या विजयासाठी साकडे घातल्याचे समजते. दरम्यान, बाबा केदारनाथांचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी हे १९ तारखेला म्हणजेच उद्या बद्रीनाथला रवाना होणार असून सकाळी १० वाजता मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat