
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएम) यशस्वी चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र ७० किलोमीटर अंतरावरील लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, क्षेपणास्त्र, ड्रोन किंवा अवाक्स सारख्या लक्षाला सहज उध्वस्त करू शकते. एकावेळी विविध लक्षाला ३६० डिग्री फिरून भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्राचे खास वैशिष्ठ्य आहे.
नौदलाच्या आईएनएस कोची आणि आईएनएस चेन्नई या नौकांद्वारे पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि इस्रायल एअरो स्पेस इंडस्ट्रीज द्वारा ही चाचणी घेण्यात आली. डीआरडीएल हैद्राबाद, डीआरडीओ प्रयोगशाळा यांनी इस्रायल एअरो स्पेस इंडस्ट्रीजच्या सहयोगाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
जमिनीवरुन हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र कोलकाता श्रेणीतल्या विनाशिकेवर तसेच भारतीय नौदलाच्या भविष्यातल्या सर्व युद्ध नौकांवरही वापरले जाऊ शकते. या सफलतेमुळे ही विशिष्ट क्षमता बाळगणाऱ्या गटात भारतीय नौदलाचा समावेश झाला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat