सिव्हील सोसायटीला जागे करण्याचे कामही माध्यमांनी केले पाहिजे : दिनकर गांगल

    दिनांक  18-May-2019


 

 

‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान सोहळा संपन्न


मुंबई : “सिव्हील सोसायटीला जागे करण्याचे कामही माध्यमांनी केले पाहिजे,” असे सांगतानाच “स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारितेची जी ताकद होती, ती पुन्हा एकदा निर्माण झाली पाहिजे,” असे प्रतिपादन ‘थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांनी केले. ते विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे नारद जयंतीच्या निमित्ताने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारा’च्या प्रसंगी बोलत होते. यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी पत्रकारिता आणि अन्य माध्यम क्षेत्रांशी संबंधित सात जणांची निवड करण्यात आली. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे मुख्य उपसंपादक(वृत्त) निमेश वहाळकर यांना पत्रकारितेतील विशेष कामगिरीसाठी व सोशल मीडिया व ब्लॉगिंग विभागातील पुरस्कारासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे स्तंभलेखक व ब्लॉगर सोमेश कोलगे यांना ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. 

 
 
दै. ‘लोकसत्ता’चे मुख्य उपसंपादक पंकज भोसले यांना पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल तसेच ‘महिला पत्रकार पुरस्कारा’साठी ‘टीव्ही ’ मराठीच्या संपादिका, वृत्तनिवेदिका निखिला म्हात्रे यांना सन्मानित करण्यात आले. दै. ‘कृषिवल’चे मुख्य संपादक प्रसाद केरकर यांना ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कारा’ने तर ‘इलेक्ट्रॉनिक आणि ब्रॉडकास्टिंग मीडिया’ या श्रेणीतील पुरस्कारासाठी ‘झी २४ तास’चे वरिष्ठ राजकीय संवाददाता अमित जोशी यांचा सन्मान करण्यात आला. ‘सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार’ या पुरस्कारासाठी दै. ‘मुंबई मिरर’चे छायाचित्रकार सचिन हरळकर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, काही कारणामुळे ते अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या सहकारी लता मिश्र यांनी यावेळी हा सन्मान स्वीकारला. सोबतच शनिवार, दि. १८ मे रोजी माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या बोर्डरूममध्ये पार पडलेल्या देवर्षी नारद जयंती कार्यक्रम आणि पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार व ‘थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ‘झी २४ तास,’ ‘झी मराठी दिशा’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर हे उपस्थित होते. सोबतच विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर, विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह मोहन ढवळीकर, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे डॉ. उदय साळुंखे व सुरेश देवळे मंचावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानधन, शाल आणि श्रीफळ असे यंदाच्या पुरस्काराचे स्वरूप होते.  
 

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे संपादक दिनकर गांगल आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, “राजकारण व गुंडगिरीच्या पलीकडेही समाजात काही चांगले काम घडत आहे आणि ‘थिंक महाराष्ट्र’च्या माध्यमातून आम्ही त्याला पुढे आणत आहोत. हे सामर्थ्य टेक्नॉलॉजीने आणि सोशल मीडियाने दिले आहे,” असे सांगतानाच “समाजात १० टक्के वाईट व १० टक्के चांगली माणसे असतात, तर उरलेली ८० टक्के माणसे दोन्हीच्या मध्ये असतात. माध्यमांमुळे मात्र ही ८० टक्के माणसे वाईटाकडे जाताना दिसतात,” हे सांगून या ८० टक्के माणसांना चांगल्याकडे आणण्याचे काम माध्यमांनी करायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना विजय कुवळेकर म्हणाले की,“सर्वसामान्य माणसाला काय हवे आणि काय द्यावे, याचा पत्रकारांनी नेहमी विचार केला पाहिजे. कारण, ज्याच्याकडे प्रश्न मांडण्याचे सामर्थ्य असते, त्याच्यावरील जबाबदारीही मोठी असते. पत्रकार किंवा माध्यमे ही सर्वसामान्यांचे प्रश्न नक्कीच सोडवू शकतात. आपल्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडतात तशाच चांगल्याही घडत असतात. वाईट आणि चांगल्या गोष्टींपैकी काय समोर मांडायचे हे पत्रकाराने ठरवले पाहिजे. पत्रकाराने विध्वंसकतेपेक्षा विधायकतेला महत्त्व द्यायला हवे,” असे ते म्हणाले.

 

माध्यमांच्या विश्वासार्हतेबद्दल कुवळेकर म्हणाले की, “राष्ट्रबांधणीचा पाया विश्वासार्हता असतो. आज माध्यमांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेले असताना त्याबाबतही आपल्याला विचार करावा लागेल. माध्यमांना आपले सामर्थ्य समाजहितासाठी, राष्ट्रहितासाठी मानवहितासाठी वापरावे लागेल. विश्वासार्हता यातूनच निर्माण होईल व हाच आपल्या अस्तित्वाचा पाया आहे,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारा’ची माहिती दिली. गेल्या १८ वर्षांपासून ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देण्यात येत असून नारद ‘आद्य वार्ताहर’ असल्याने त्यांच्या हा पुरस्कार प्रदान केला जातो, भारतीयत्वाची, भारतीय संस्कृतीची जपणूक या माध्यमातून होते, असे ते म्हणाले. विश्व संवाद केंद्राचे संपादक दत्ता पंचवाघ यांनी ‘पत्रसामर्थ्य’ विशेषांकाबद्दल माहिती दिली. सोबतच पत्रलेखनाचे विषय व संपादनाबद्दल त्यांनी माहिती दिली. विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित पत्रलेखन स्पर्धेतील विजेत्यांचादेखील यावेळी सन्मान करण्यात आला. सोबतच पत्रलेखन स्पर्धेत सहभागी झालेल्या पत्रलेखकांच्या पत्रांचा अंतर्भाव असलेल्या ‘पत्रसामर्थ्य’ या विशेषांक-२०१९ चे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वेलिंगकर इन्स्टिट्यूट व शिक्षण प्रसारक मंडळीचे डॉ. उदय साळुंखे यांनी यावेळी संस्थेची माहिती दिली. सोबतच विश्व संवाद केंद्राच्या कार्याचे कौतुक केले. दरम्यान, आभार प्रदर्शन मोहन ढवळीकर यांनी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat