बाळाच्या त्वचेची काळजी घेताना...

18 May 2019 17:31:05



बालपणी आपल्या त्वचेमध्ये वेगाने बदल घडून येत असतात. लहानग्या बाळाची त्वचा, दोन-तीन वर्षांच्या बाळाची त्वचा व संपूर्ण वाढ झालेल्या व्यक्तीची त्वचा यामध्ये आमूलाग्र फरक असतो. जन्मल्यानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये सर्वसामान्यतः होणारे हार्मोन्समधील बदल किंवा नाजूक त्वचाछिद्रांमुळे तसेच काही संसर्गामुळे त्वचेवर लाल चट्टे येणे, जळजळ होणे असे प्रकार होत असतात. लहान बाळांच्या त्वचेतील पाण्याच्या प्रमाणात वेगाने चढ-उतार होत असतात. त्यांच्या त्वचेमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक कमी असतात. त्यामुळे त्यांची त्वचा बऱ्याचदा शुष्क व कोरडी असते आणि ते आपल्याला जाणवतदेखील नाही. लहान मुलांच्या त्वचेमधून मॉइश्चरायझर कमी होत जाण्याचा वेग मोठ्यांच्या त्वचेपेक्षा दोन पट जास्त असतो. या सर्व कारणांमुळेच लहान बाळांच्या त्वचेची काळजी वेगळ्याप्रकारे घेतली जाणे गरजेचे असते.

 

ऋतू व हवामान यामध्ये बदल झाले तरी तुमच्या बाळाची त्वचा निरोगी व सतेज राहावी यासाठी मदत करू शकतील, अशा काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर तुमच्या बाळाला अंघोळ करताना मजा वाटत असेल तर अगदी निःशंक होऊन बाळाच्या अंघोळीचे प्रमाण वाढवा. यामुळे बाळाला येणारा घाम स्वच्छ होत राहील. पण अंघोळीचे पाणी कोमट आहे याकडे लक्ष द्या. बाळाच्या अंघोळीचे पाणी जास्त गरम नको व जास्त थंडदेखील नको. बाळासाठी आंघोळ ही आरामदायी असायला हवी. बाळाची अंघोळ हा आई-बाबा व बाळ यांच्यादरम्यानची जवळीक अधिक जास्त घट्ट करण्याची चांगली संधी असते. अंघोळीमुळे बाळ शांत होते. अंघोळीनंतर बाळाला शांत झोप लागते.

 

अंघोळ ही नुसते पुसून काढण्यापेक्षा किंवा धुवून काढण्यापेक्षा जास्त महत्त्वाची असते व त्यामुळे अनेक फायदे होतात पण त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने काही खबरदाऱ्या घेतल्या गेल्या पाहिजेत. अंघोळीमुळे बाळ व त्याचे आई-बाबा दोघांनाही मानसिक आरोग्य लाभते. म्हणूनच बाळाच्या अंघोळीसाठी योग्य वस्तूंचा उपयोग केल्यास तुम्ही तुमच्या बाळाची सौम्य व मुलायमपणे काळजी घेऊ शकता.

 

लक्षात ठेवा, बाळाची त्वचा ३० टक्के जास्त पातळ असते. तिची स्वच्छता राखणे, ती सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे, पण ते अतिशय मुलायमपणे केले गेले पाहिजे. म्हणूनच पीएचसंतुलित कोमल उत्पादने वापरणे आवश्यक आहे. पॅराबेन फ्रीडाय फ्री क्लीन्जर्ससौम्य असतात आणि त्वचेला जराही न दुखावता मुलायमपणे स्वच्छ करतात.

 

एखादे उत्पादन निवडताना त्यामध्ये नेमके कोणते घटक पाहिले पाहिजेत

 

१. सौम्य व मुलायम

२. त्वचा व डोळ्यांना त्रासदायक नसावे.

३. त्यामध्ये ऍलर्जिक शक्यता नाही हे क्लिनिकली सिद्ध झालेले असावे.

४. पीएचसंतुलित फॉर्म्युला जो त्वचेच्या सौम्य ऍसिडिक पीएचला (५ ते ७ च्या दरम्यान) अडथळा ठरणार नाही.

५. सौम्य सुवास जो त्रासदायक ठरणार नाही.

 

बाळांच्या त्वचेची नीट काळजी न घेतली गेल्यास त्याचे तात्पुरते व दीर्घकालीन, गंभीर परिणाम होऊ शकतात. उष्णतेचे लालसर चट्टे, नॅपी रॅश, पाळण्यात खूप वेळ राहिल्याने उठणारे चट्टे, ऍटॉपिक एक्झिमा असे त्रास होऊ शकतात. यापैकी बऱ्याच त्रासांचे मुख्य कारणे जंतूंमुळे होणारे संसर्ग, वातावरणातील बदल, घाम ही असतात. हे सर्व टाळण्यासाठी बाळांच्या त्वचेची नीट काळजी घेणे गरजेचे असते. भारतात दरवर्षी जवळपास २७ मिलियन मुले जन्माला येतात. त्यांच्या आरोग्यासाठी, सुरक्षेसाठी पालकांना योग्य पद्धतींची माहिती देणे आवश्यक आहे. त्यामुळे आई-बाबा त्यांच्या बाळासाठी सर्वोत्तमगोष्टी निवडू शकतील.

 

- डॉ. संजय नातू

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0