विविध धर्म प्रणालीतील चिह्नसंकेत

    दिनांक  18-May-2019   ख्रिश्चन क्रॉस

 

आपल्या लेखमालेच्या 'प्रतीके आणि चिह्न यांचा अभ्यास' या प्राथमिक उद्देशानुसार या पुढील काही लेखांत जगभरातील प्रचलित धर्मप्रणालींमधे स्वीकृत चिह्न आणि चिह्नसंकेतांचा अभ्यास समाविष्ट असेल. वाचकांनी प्रतिक्रिया द्याव्या ही नम्र अपेक्षा...!


कुठल्याही धर्मप्रणालींच्या प्रथा-परंपरेनुसार लिखित साहित्याबरोबरच अनेक प्रतीके आणि चिह्नं, श्रद्धास्थानं मानली गेली आहेत. ख्रिस्ती धर्मप्रणालीसुद्धा याला अपवाद नाही. ख्रिस्ती धर्माचा प्रचार-प्रसार-विस्तार जगभरात झाला आहे. जगातील एकूण लोकसंख्येचा आणि नागरिकांच्या धर्मस्वीकृतीचा विचार करता, ख्रिश्चन धर्मीयांची संख्या २.४ अब्ज एवढी मोठी आहे. ख्रिस्ती धर्मशास्त्रानुसार, पौर्वात्य ख्रिस्ती आणि पाश्चिमात्य ख्रिस्ती या दोन धर्मप्रणालीमध्ये अनेक शाखा आणि त्याच्या काही शे अन्य उपशाखा प्रचलित आहेत. 'चर्च ऑफ द इस्ट,' 'रोमन कॅथलिक,' 'प्रोटेस्टंट,' 'इस्टर्न ऑर्थोडॉक्स,' 'ओरिएन्टल ऑर्थोडॉक्स,' 'अँग्लीकन,' 'इव्हानजेलीस्ट,' 'सिरीयन ऑर्थोडॉक्स,' 'नॅान ट्रिनिटेरीयन रिस्टोरेशनीझम,' 'मेथॉडीस्ट,' 'प्रेसबायटेरियन' अशा यातल्या काही प्रमुख शाखा. 'चर्च' हे धर्म उपासना केंद्र, पवित्र ग्रंथ 'बायबल,' 'क्रॉस,' 'मासा,' 'डव्ह' हा कबुतरासारखा पक्षी, 'रोझरी बीड्स' म्हणजे जपमाळ आणि 'कम्युनियन' म्हणजे समाजातील एकोपा आणि ऐक्य भावना या सह अन्य काही ख्रिस्ती धर्म प्रणालीमधील प्रतीके-चिह्ने आहेत. धर्मश्रद्धा आणि उपासना या दोन गोष्टी या प्रतीके आणि चिह्ने यामुळे साध्य होतात. या प्रतीक आणि चिह्नांच्या साहाय्याने या धर्म प्रणालीचा नव्या श्रोत्यांना परिचय करून देता येतो आणि त्याची शिकवण देण्यासाठी काम सुलभ होते. ख्रिश्चन धर्मप्रणालीत अनेक शाखा आणि उपशाखा असल्या तरी, हीच प्रतीके आणि चिह्ने सर्व धर्म आचरणात समान मानली गेली आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे प्रतीक-चिह्न म्हणजे 'ख्रिश्चन क्रॉस.' दर्शक किंवा वाचक व्यक्तीच्या बुद्धी आणि भावना या दोन्ही जाणीवांना सहज समजणारी आणि त्यावर अपेक्षित प्रभाव पाडणारी गुणवत्ता ही सिम्बॉल-प्रतीके आणि चिह्नांची मुख्य ओळख आहे. एखाद्या संकल्पनेचे वर्णन करणारे साहित्य वाचता येत नसल्याने काहीजणांना समजत नाही. ज्यांना वाचता येते ते इतके दीर्घ वर्णन वाचत नाहीत. मात्र, प्रतीके-चिह्नांची भाषा या दोघांनाही समजते. म्हणूनच मानवाच्या प्रगतीच्या काळापासून, शब्दांशिवाय संवाद साधणारी या चिह्नांची भाषा प्रगत झाली. काही निश्चित लिखित संकल्पना आणि काही पूर्ण अमूर्त धारणा अशा दोन्ही विचारांच्या व्यक्ततेसाठी प्रतीके आणि चिह्नं वापरली जातात.

 

ख्रिश्चन धर्माच्या निर्मितीपासून म्हणजे साधारण दोन हजार वर्षांपासून ही प्रतीके आणि चिह्ने प्रचलित झाली. त्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या काही संस्कृतींचा प्रभाव या प्रतीकांवर निश्चितपणे पडला आहे. आरेखनात म्हणजे डिझाईनमध्ये वैविध्य असलेल्या 'ख्रिश्चन क्रॉस'चा अभ्यास करताना याची विशेष जाणीव होते. येशू ख्रिस्ताला या क्रॉसच्या आकाराच्या वधस्तंभावर सुळी दिले गेले होते. त्या घटनेचे प्रतीक म्हणून 'क्रॉस' हे चिह्न, जगभरतल्या ख्रिश्चन आणि अन्य धर्मांतील नागरिकांना परिचित आहे. मात्र, या ऐतिहासिक घटनेपलीकडे त्याचे वेगळे चिह्नसंकेत विस्मृतीत गेल्यात जमा आहेत. कारण, त्याचा संदर्भ वर्तमानकाळात फारसा कोणी देत नाही. या चिह्न आणि चिह्नसंकेतांच्या अभ्यासात एका अनोख्या तत्त्वज्ञ त्रिमूर्तीचा परिचय झाला. त्या विलक्षण त्रिमूर्तीतील पहिला तत्त्वज्ञ फ्रान्समध्ये जन्माला आलेला रेने गुनोन (१८८६-१९५१). यातला दुसरा तत्त्वज्ञ स्वित्झर्लंडमध्ये एका जर्मन कुटुंबात जन्माला आलेला फ्रीथजॉफ शुओन (१९०७-१९९८). यातले तिसरे तत्त्वज्ञ म्हणजे मला गुरुस्थानी असलेले, श्रीलंकेत जन्माला आलेले तामिळ तत्त्वज्ञ आनंद के. कुमारस्वामी (१८७७- १९४७). हे तिघे कदाचित एकमेकांना भेटलेही नसतील. मात्र, अनेक आंतरराष्ट्रीय समीक्षकांनी यांना त्रिमूर्तीची उपाधी दिली होती. कर्तृत्वाने फार मोठे असलेल्या या विद्वान-व्यासंगी तिघांचा बहारीचा काळ साधारण एकच होता. या तीन विद्वान तत्त्वज्ञांचा या संदर्भातील परिचय आधी विस्ताराने करून देतो. त्यामुळे आपल्या प्रतीके आणि चिह्न या विषयातील त्यांच्या संशोधन-अभ्यासाविषयी वाचकांची जाणीव-जागृती होईल. याचे कारण असे की, हे तीन तत्त्ववेत्ते, भारतातील वाचकांना फारसे परिचित नसावे. परंपरावादी, स्थायित्ववादी, आध्यात्मिक, तत्त्वज्ञान विषयक अभ्यास मांडताना त्यांचे सखोल विश्लेषण आणि त्याची तत्त्वमीमांसा करताना या तिघांनी, प्राचीन भारतीय वेदान्त आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा सातत्याने पुरस्कार केला. विविध कौटुंबिक पार्श्वभूमीतून, समाज संस्कृतीतून आणि वेगळ्या देशातून आलेले हे तीन तत्त्ववेत्ते ८०-१०० वर्षांपूर्वी काही ज्ञानशाखांचा एकाच पद्धतीने अभ्यास करत होते आणि त्यांची व्यक्तता समानधर्मी होती. यातला रेने गुनोन या फ्रेंच तत्त्वज्ञाचा जन्म, एका कडक शिस्तीच्या रोमन कॅथलिक ख्रिश्चन कुटुंबात झाला. याच रोमन कॅथलिक प्रणालीतील 'जेसुईट' या उपशाखेतील शिक्षण पद्धतीनुसार त्याचे शिक्षण पूर्ण झाले. गणित विषयात पदवी अभ्यासक्रम अर्धवट सोडून त्याने खूप तरुण वयात 'थिऑसॅाफी' आणि आध्यात्मिक विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, तत्कालीन युरोपियन समाजातील नकली आणि तोतयेगिरीने चालवलेल्या 'स्पिरीच्युएलीझम' म्हणजे 'परलोकविद्यावाद' या अंधश्रद्धा जोपासणाऱ्या प्रथा-पद्धतीवर आणि बौद्धिक आणि आध्यात्मिक दिवाळखोरीवर त्याने आपल्या लेखांतून हल्ला केला. (मृतात्मे जीवंत व्यक्तीशी संपर्क ठेऊ शकतात, अशी श्रद्धा म्हणजे परलोकविद्या). याच दरम्यान, भारतीय वेदान्त आणि अद्वैत तत्त्वज्ञान याच्या तो संपर्कात आला आणि तो त्याचा कायमचा व्यासंग झाला.

 

१९२१ साली प्रकशित झालेले 'Introduction to the Study of Hindu Doctrines' हे त्याचे पहिले पुस्तक. ' Man and His Becoming according to The Vedanta' हे वेदान्त साहित्य आणि अद्वैत तत्त्वज्ञानावरील त्याचे पुढचे पुस्तक. १९३१ साली प्रकाशित झालेले 'The Symbolism Of Cross' हे 'ख्रिश्चन क्रॉस'च्या चिह्नसंकेतांचे विश्लेषण करणारे पुस्तक खूप गाजले आणि त्याचे सर्व लिखाण टीकेचे धनी झाले. रेने गुनोन याच्या जीवनकाळातील अनेक घटना आणि त्याचे निर्णय याचा विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. एका कडक शिस्तीच्या रोमन कॅथलिक ख्रिश्चन कुटुंबात वाढलेल्या गुनोनवर, त्याच्या वरील सर्व पुस्तकांमुळे याच कॅथलिक ख्रिश्चन धर्मबांधवानी भरपूर टीका केली. प्राचीन भारतीय हिंदू धर्म संस्कृतीच्या मार्गदर्शक परंपरा आणि वेदान्त साहित्यातील तत्त्वज्ञानाचा रेने गुनोनने सतत पुरस्कार केला. 'ख्रिश्चन क्रॉस'च्या संकेतांचे सडेतोड विश्लेषण करताना त्याची हिंदू धर्म संस्कृतीतील चिह्नसंकेतांशी केलेली तुलना त्याच्या तत्कालीन धर्मबांधवांना रुचली नसावी. आपण ज्या समजाचा एक घटक आहोत, त्याच समाजातील सामंजस्य, सहिष्णुता आणि तर्कसंगतीचा अभाव त्याला स्वीकारणे शक्य नव्हते. धर्मबांधवांनी केलेल्या या टीकेमुळे रेने गुनोन खूप व्यथित झाला. आपल्या मायदेशाचा कायमचा निरोप घेऊन, तो १९३० साली कैरो या इजिप्तच्या राजधानीच्या शहरात दाखल झाला. 'शाधीलीया' या सुफी संप्रदायातील काहीशा गूढवादी आणि रहस्यमय पंथाची दीक्षा त्याने घेतली. 'शेख अब्देल वाहेद याह्या' या नावाचा स्वीकार करून रेने गुनोन अखेरपर्यंत कैरोमध्ये समाजापासून दूर विजनवासात राहिला. १९५१ साली त्याचे या जगाचा निरोप घेतला. विजनवासात राहत असतानाही त्याने फार मोठी साहित्य निर्मिती केली. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात चीनमध्ये स्थापन झालेल्या 'ताओ' धर्मसंकल्पनेचा आणि इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर इस्लामिक तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास त्याने केला. ख्रिश्चन-हिंदू-इस्लाम-ताओइझम या सर्व मूळ धर्मसंकल्पना, त्याचा इतिहास, त्यातील पंथ, उपपंथ आणि संप्रदाय याचा अभ्यास आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचे तुलनात्मक विश्लेषण आणि त्यातील चिह्न आणि चिह्नसंकेत हे विद्वान रेने गुनोनच्या साहित्याचे वैशिष्ट्य होते आणि आजही आहे. येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले तो हा क्रॉस इतकेच त्याचे महत्त्व नाही. ख्रिस्ती धर्माच्या निर्मितीच्या आधीपासून जगात मानव अस्तित्वात होता. भगवान येशूने आदम आणि ईव्ह या दोघांना निर्माण केले आणि आपण सर्व त्या दोघांची प्रजा आहोत ही अंधश्रद्धा आहे, असे त्याने सातत्याने लिहिले. 'ख्रिश्चन क्रॉस'वर प्राचीन आणि अन्य संस्कृतीत प्रचलित असलेल्या तत्त्वज्ञान आणि प्रतीक-चिह्नांचा प्रभाव कसा आहे, याचे त्याने केलेले विश्लेषण कालातीत आहे. रेने गुनोन या त्रिमूर्तीतील पहिल्या तत्त्वज्ञाच्या विलक्षण जीवनक्रमाचा परिचय वाचकांना करून देण्यामागे काही निश्चित हेतू आहे. याची कल्पना जाणकार वाचकांना नक्कीच आली असेल. अन्य दोन तत्त्ववेत्यांचा परिचय आणि 'ख्रिश्चन क्रॉस' या चिन्हाचे अन्य संकेत या पुढील लेखात...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat