साताऱ्याच्या लेकीने रोवला 'मकालू'वर पाय...

    दिनांक  17-May-2019नवी दिल्ली : साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने 'मकालू' शिखर सर करुन तिरंगा फडकवला. मकालू शिखर सर करणारी प्रियंका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. मकालूची उंची आठ हजार मीटरपेक्षा जास्त आहे. हे शिखर जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. या महाराष्ट्राच्या कन्येने १५ मे २०१९रोजी मकालू शिखर सर करत नवा विक्रम घडवला.

 

प्रियांका मोहितेने याआधी माऊंट एव्हरेस्ट, किलिमांजरो आणि ल्होत्से ही जगातील उंच शिखरे सर केली आहेत. याच कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले आहे. प्रियांकाने चढाई केलेले हे आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीचे तिसरे शिखर ठरले आहे. प्रियांकाने याआधी अनेक हिमालयीन मोहिमा सहज पूर्ण केल्या आहेत. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी प्रियांकाने जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केले होते. २०१८ साली जगातील चौथ्या क्रमांकाचे ल्होत्से शिखर सर केले.

 

प्रियांकाने तिचे गिर्यारोहणातील शिक्षण नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगमधून घेतले आहे. बंदरपूच या शिखरापासून सुरुवात करत तिचा गिर्यारोहणातील प्रवास सुरु झाला. "छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा आदर्श मानते आणि यशाची उंची गाठण्याचा प्रयत्न करते. गिर्यारोहण हे क्षेत्र कायम पुरुषप्रधान मानले जाते. पण मला हा समज मान्य नाही. म्हणूनच महिलाही मागे नसल्याचे सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करते." असे प्रियांका सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat