कर्नाटकातील काँग्रेस महिला नेत्याच्या हत्येचे धागेदोरे सोलापुरात

    दिनांक  17-May-2019
सोलापुर : कर्नाटकातील विजापूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांची हत्या झाल्याने व या हत्येचे धागेदोरे सोलापुरात असल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. रेश्मा यांनी महिनाभरापूर्वी सोलापुरातील एमआयएम नगरसेवक तौफीक शेख यांच्याविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली होती. तेव्हापासून रेश्मा बेपत्ता होत्या. अखेर त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

सोलापुरातील एमआयएमचे शहरअध्यक्ष आणि नगरसेवक तौफीक शेख यांच्या विरोधात सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये मागील महिन्याच्या १७ तारखेला विनयभंगाची तक्रार देण्यात आली होती. तक्रार दिल्यापासून रेश्मा गायब होत्या. मात्र आज कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील कोलार येथे त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफिक शेख आणि रेश्मा पडकेनूर यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. रेश्मा यांनीही तौफिक शेखच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदन अहवालनानंतर हत्या कशी करण्यात आली हे स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी याप्रकरणी एमआयएमचे तौफीक शेख यांच्याभोवती संशयाची सुई फिरत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat