जेव्हा ५०० रुपयांच्या नोटांचे तुकडे पडतात...

    दिनांक  16-May-2019सांगली : साताऱ्यामधील सांगली तालुक्यातील विटा गावामध्ये ५०० रुपयांच्या नोटांची घडी घातल्यावर तुकडे होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना प्रात्यक्षिक दाखवले. जवळपास ५०० रुपयांच्या १४ नोटांबाबत हा प्रकार घडला असून यासंदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी अनिल राठोड केली आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

 

अनिल राठोड यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहतात. त्या रोजंदारीवर मोलमजुरी करतात. त्यांना काही दिवसांपूर्वी ७,००० रुपये मिळाले होते. ते त्यांनी कपाटात ठेवले होते. नंतर बुधवारी बाहेर खरेदीला गेले असताना त्यामधील काही पैसे त्यांनी रुमालामध्ये घडी घालून ठेवले. त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून ५००ची एक नोट काढताच ५०० रुपयांची एक नोट घडी पडून तुकडा पडल्याचे आढळले. त्यानंतर तिने दुसरी नोट काढली असता ती नोट सुद्धा घडी पडताच तुटत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरुन त्या महिलेने सर्व नोटा घडी करुन पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे त्यांना आढळले. यावर त्या महिलेने अनिल राठोड यांच्याकडे जाऊन घडला प्रकार सांगितला. त्यांनाही तशाच प्रकारे नोटांचे घड्या घालताच तुकडे पडत असल्याचे आढळले.

 

या प्रकारानंतर राठोड यांनी लगेच विट्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेशी संपर्क केला. शाखाव्यवस्थापक दळवी यांनी संबंधित नोटा या केमिकलच्या अथवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला. मात्र आमच्या शाखेत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अशा प्रकारच्या नोटा या वर्षानुवर्षे कपाट बंद असतात त्यांना काहीही होत नाही, असे उत्तर दिले. ही बाब बँकेने आरबीआयच्या निदर्शनास आणावी असा आग्रह केला. विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत, असे शाखा व्यवस्थापकांनी सांगितले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे.

 
  •  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat