पुण्यात पुन्हा आगडोंब ; जीवितहानी नाही

    दिनांक  16-May-2019पुणे : सध्या राज्यात आग लागण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पुण्यातील शनिवारपेठेमध्ये एका इमारतीत अचानक आग लागली. प्रभात टॉकीजसमोरील इमारतीत लागलेल्या या भीषण आगीनंतर रहिवाशांची एकच धावपळ उडाली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन आग नियंत्रणात आणल्याने मोठी हानी टळली. अग्निशमन दलाने या आगीतून २५ जणांची सुटकाही केली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

 

प्रभात टॉकीजजवळ 'जोशी संकूल' या ५ मजली इमारतीला गुरुवारी सकाळी आग लागली. त्यामुळे इमारतीतील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आग लागल्यानंतर काही वेळाने धूराचे लोळही इमारतीत पसरल्याने रहिवाशी अधिकच भयभीत झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अवघ्या तासाभरातच आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी २५ जणांची आगीतून सुटका केली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat