चारा छावण्यांतील अनुदानात वाढ

    दिनांक  16-May-2019



 

मुंबई : चारा छावण्यांतील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे, प्रतिजनावर आता ९० रुपयांऐवजी शंभर रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण उपाय योजना उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

चारा छावण्यांतील जनावरांसाठी लागणाऱ्या वैरणीची खरेदी व त्यावरील वाहतुकीचा खर्च तसेच मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिवस १८ किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस १ किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांसाठी नऊ किलो हिरवा चारा व लहान जनावरांसाठी एक किलो पशुखाद्य देण्यात येत असल्यामुळे चारा छावण्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये प्रति जनावर १० रुपयांची वाढ करून आता मोठ्या जनावरांसाठी शंभर रुपये तर लहान जनावरांसाठी ५० रुपये दर देण्यात येणार आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.

 

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दुष्काळ निवारणासंबंधीच्या उपसमितीची बैठक झाली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, चारा छावणी, पाणी पुरवठा, रोहयो आदींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, पदुममंत्री महादेव जानकर आदी यावेळी उपस्थित होते.

 

पाटील म्हणाले, सध्या राज्यात १ हजार ४१७ चारा छावण्या सुरू असून त्यामध्ये ९ लाख ३९ हजार ३७२ पशुधन आहे. या पशुधनासाठी मोठ्या जनावरांना प्रतिदिवस १८ किलो हिरवा चारा व आठवड्यातून तीन दिवस एक किलो पशुखाद्य आणि लहान जनावरांना नऊ किलो हिरवा चारा व एक किलो पशुखाद्य देण्यात येते. पशुधनासाठी पाणी आणणे, लांब अंतरावरून चारा आणणे यासाठी वाहतूक खर्च वाढत असल्यामुळे चारा छावणी चालकांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दहा रुपये वाढ करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे मोठ्या जनावरांना ७० रुपये तर लहान जनावारांना ३० रुपये अनुदान आहे. मात्र, राज्यातील परिस्थिती पाहून वाढीव अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत चारा छावण्यांसाठी औरंगाबाद विभागासाठी १११ कोटी, पुणे विभागासाठी ४ कोटी व नाशिक विभागासाठी ४७ कोटी निधी वितरित करण्यात आले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat