राव, रेड्डी आणि पटनाईक...

    दिनांक  16-May-2019देशात सध्या सगळ्यांचे लक्ष २३ तारखेकडे लागले आहे. विविध पक्षांचे राजकीय नेते तर आपापल्या छोट्या-मोठ्या राजकीय गणितासाठी आगामी गुरुवारकडे डोळे लावून बसले आहेत. सध्या देश पातळीवर तीन आघाड्या समोर येत आहेत. सत्तेत पुन्हा परतण्याची जास्त शक्यता असलेली भाजपच्या नेतृत्त्वाखालील रालोआ, काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संपुआ व काहीशी अदृश्य असलेली तिसरी आघाडी अशा या तीन आघाड्या. देशातील बहुसंख्य नेत्यांनी आपण कुठल्या आघाडीत आहोत, हे बर्‍यापैकी स्पष्ट केले आहे. पण, याला अपवाद आहेत चंद्रशेखर राव, जगनमोहन रेड्डी व नवीन पटनाईक हे तीन महत्त्वाचे प्रादेशिक नेते. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीची तेलंगणमध्ये व नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलाची ओडिशामध्ये सत्ता आहे, तर जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस आंध्र प्रदेशात जरी सत्तेत नसली तरी तेथील प्रमुख विरोधी पक्ष आहे. राव, रेड्डी आणि पटनाईक या वरकरणी सरळ पण अत्यंत धूर्त असणार्‍या त्रिकूटाच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या तिघांनीही रालोआ आणि संपुआपासून सुरक्षित अंतर ठेवले असून ’वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. रालोआ आणि संपुआ या दोन्ही आघाड्यांपैकी कोणत्याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळू नये, म्हणून या तिघांनीही देव पाण्यात ठेवले आहेत. आंध्र प्रदेशात २५, ओडिशामध्ये २१ व तेलंगणात १७ अशा एकूण ६३ जागा या तीन राज्यांमध्ये आहेत. यापैकी आंध्रात वायएसआर काँग्रेसकडे ९, ओडिशात बिजू जनता दलाकडे २०, तर तेलंगण राष्ट्र समितीकडे ११ असे ४० खासदार आहेत. सद्यस्थितीत या तिन्ही नेत्यांकडे ६३ पैकी ४० खासदार आहेत. त्यामुळेच निकालानंतर अस्थिर परिस्थिती निर्माण झाली, तर या तिन्ही नेत्यांच्या भूमिकेला खूप महत्त्व असणार आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी या तिघांनाही गळाला लावण्याचा खूप प्रयत्न केला. पण, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. चंद्रशेखर राव यांनी तर आतापासूनच उपपंतप्रधानपदाची मागणी लावून धरली आहे. ते काँग्रेसेतर आघाडी स्थापन करण्याच्या मनस्थितीत आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशला जी आघाडी विशेष दर्जा देईल, त्यांच्याबाबत आम्ही विचार करू, अशी भूमिका घेतली आहे. नवीन पटनाईक यांनी तर कुठलेही मत न व्यक्त करता संदिग्धता कायम ठेवली आहे. त्यामुळे २३ मेच्या निकालानंतरच कोणता पक्ष कोणत्या आघाडीची वाट धरणार, हे पाहणे महत्त्वाचे औत्सुक्याचे ठरेल.

 

गोमंतकीय गुंता

 

देशवासीयांचे लक्ष जरी लोकसभेच्या निकालाकडे असले तरी गोमंतकीयांचे डोळे मात्र विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालाकडे लागले आहेत. शिरोडा, मांद्रे, म्हापसा व पणजी या चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच लागणार आहे. दक्षिण गोव्यातील शिरोडा आणि उत्तर गोव्यातील मांद्रे व म्हापसा या तीन मतदारसंघांमध्ये २३ एप्रिल रोजी मतदान झाले, तर राजधानी पणजीत येत्या १९ मे ला मतदान होणार आहे. ४० आमदारांच्या गोवा विधानसभेत भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी १४ आमदार आहेत. सध्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन व अपक्ष तीन आमदारांच्या पाठिंब्यावर भाजप सरकार तरले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून फुटून गेलेले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पावसकर यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने या पोटनिवडणुकीचा निकाल सकारात्मक लागणे भाजप सरकारच्या स्थिरतेसाठी गरजेचे आहे. गोव्याचे नवे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वासाठी ही पोटनिवडणूक म्हणजे सत्त्वपरीक्षा आहे. या चारपैकी किमान तीन ठिकाणी भाजप जिंकेल, अशी स्थिती आहे. ज्या मतदारसंघात अजून मतदान व्हायचे आहे, तो पणजी मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक होईल. ३५ टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या या राजधानीच्या मतदारसंघातून १९९४ पासून २०१७ पर्यंत मनोहर पर्रिकर निवडून आले होते. पण, भाजप व संघामधून सवतासुभा करून बाहेर पडलेल्या सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंचामुळे येथे भाजपसमोर काहीशा अडचणी निर्माण झाल्या. पण, काँग्रेसने बाबुश मोन्सेरात यांना उमेदवारी दिल्याने भाजपने राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा गोमंतकवासीयांसमोर आणला आहे. ऐन निवडणुकीत मोन्सेरात यांच्यावरील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचे कथित प्रकरण पुढे आल्याने व न्यायालयाने याप्रकरणी येत्या ३ जून रोजी सुनावणी ठेवल्याने काँग्रेस कोंडीत सापडली आहे. एकूणच या चार जागांच्या निकालावर गोव्यातील पुढची राजकीय गणिते अवलंबून आहेत.

 
- शाम देऊलकर  
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat