सोलारमॅन!

    दिनांक  16-May-2019सचिनने पाड्यांमध्ये सौरउर्जेवर चालणारी उपकरणे आणि दिवे लावण्यास सुरुवात केली. या कामामुळे त्यांची ओळख आता 'सोलारमॅन' अशी झाली आहे.

ज्या रंजल्या-गांजल्या लोकांनी आपल्या उभ्या आयुष्यात कधी विजेच्या दिव्याचा प्रकाश पाहिला नाही, अशा शेकडो लोकांचे आयुष्य सौरउर्जेने प्रकाशित करणारा तरुण म्हणजे सचिन शिगवण. दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत काही सामाजिक संस्था वनवासी पाड्यांमध्ये जाऊन तेथील मुलांना पुस्तक, कपडे किंवा फराळाचे वाटप करतात. मात्र, त्यातून भरीव असे काही होताना दिसत नाही. म्हणूनच या गोष्टींऐवजी सचिनने पाड्यांमध्ये सौरउर्जेवर चालणारी उपकरणे आणि दिवे लावण्यास सुरुवात केली. या कामामुळे त्यांची ओळख आता 'सोलारमॅन' अशी झाली आहे.

 

११ फेब्रुवारी, १९८३ रोजी विलेपार्ल्यातील सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात सचिन यांचा जन्म झाला. साने गुरुजी आरोग्य विद्यामंदिरामध्ये त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. पुढे कमला मेहता व्हीडब्ल्यूए महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूूर्ण केले. महाविद्यालयीन वयातच त्यांनी 'रोट्रॅक्ट क्लब'च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सामाजिक क्षेत्रामध्येच काम करण्याची उमेद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. या दरम्यान २०१० सालच्या दरम्यान त्यांनी क्लबच्या एका प्रकल्पाअंतर्गत वानगाव या गावाला भेट दिली. गावात वीज नसल्याने त्यांनी या समस्येवर काम करण्याचे ठरविले. यासाठी ५०० ग्रामस्थांना त्यांनी सौरदिवे उपलब्ध करून दिले आणि खर्‍या अर्थाने 'सोलारमॅन'च्या प्रवासाला सुरुवात झाली.

 

या प्रकल्पानंतर सचिन यांना 'प्रोफेशनल सिटिझन कर्मवीर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळे पुढे सामाजिक क्षेत्रामध्येच आणि खास करून सौरऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात काम करण्याचे त्यांनी नक्की केले. आईच्या ओळखीने त्यांची भेट गुजरातमधील दीपक घढिया यांच्याशी झाली. घढिया यांनी थर्मल सोलारवर उत्कृष्ट काम केले होते. 'सामाजिक उद्योजकता' याविषयासंबंधीचे मार्गदर्शन त्यांनी सचिन यांना दिले. सामाजिक ध्येय पार पाडण्याबरोबरच त्यातून आपले अर्थार्जन कसे करावे, याचे धडे सचिन यांनी घढिया यांच्याकडून गिरवले. त्यामुळे सुरुवातीला खासगी कंपनी काढून सचिन यांनी या कामाला सुरुवात केली. त्या कंपनीचे नाव होते, 'ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड.' या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी एका दुसर्‍याच गावामध्ये सौरउर्जेसंबंधित काम केले. मात्र, खर्‍या अर्थाने त्यांच्या कामाला सुरुवात झाली ती २०१५ पासून.

 

दुर्गम भागातील आदिवासी पाड्यात वीज पोहोचावी, या उद्देशाने सचिन यांना पछाडले. मात्र, ऊर्जा पर्यावरणपूरक आणि शाश्वत असण्याकडे त्यांचा कल होता. शिवाय गावांमध्ये सामाजिक विकासाच्या दृष्टीने काही ठोस व्हावे, असा त्यामागील हेतू होता. म्हणूनच २०१५ साली त्यांनी 'दि ग्रीन आय इनिशिएटिव्ह फाऊंडेशन' नावाच्या सामाजिक संस्थेची नोंदणी केली. फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरुवातीला पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील गावे आणि आदिवासी पाड्यांना भेटी देण्यास सुरुवात केली. गावे आणि पाड्यांचा मूळ प्रश्न जाणून घेण्याचा त्यांचा उद्देश होता. या शोधाच्या केंद्रस्थानी प्रमुख समस्या होती ती विजेची. गाव-पाड्यांमध्ये वीज नसल्याने आदिवासींचे आयुष्य अंधारले होते. विकास खुंटला होता. या गावातील कित्येक पिढ्यांनी विजेच्या दिव्यातून निघणारा प्रकाश पाहिलाच नव्हता. त्यामुळे अशा गावांमध्ये सचिन यांनी सौरदिवे, पथदिवे आणि सौरउर्जेवर चालणारे पाण्याचे पंप बसविण्यास सुरुवात केली.

 

रस्त्यांवर सौरदिव्यांचे खांब उभारले गेले. त्यात बसविलेला ९ मेगावॅट क्षमतेचा प्रत्येक दिवा ३०० चौरस मीटरचा भाग प्रकाशमान करतो आणि हे सगळे स्वयंचलित, कोणतेही बटण न दाबता. गेल्या साडेचार वर्षांमध्ये सचिन यांच्या संस्थेने पालघर, शहापूर, ठाणे, बदलापूर, पनवेल आणि पेणपर्यंत आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे, तर २५० पेक्षा अधिक सौरपथदिवे, ५०० हून अधिक सौरदिवे, १० सौरवॉटरपंप आणि काही शाळांमध्ये सौर बॅटरी बँक बसविल्या आहेत. या कामांसाठी अर्थसाहाय्य करणार्‍या संस्थांचे सचिन आभार मानतात

 

सचिन यांच्या या कामाला सुयोग गंगावणे, स्वप्निल पाठक, हर्षल भोईर, यश डांगे, शशिकांत पुजारी, गौरव राजवडकर आणि ऋषभ वासा या सहकार्‍यांचे मोठे पाठबळ लाभले. भविष्यात या कामाची व्याप्ती विस्तारून महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात ज्या ठिकाणी लोक विजेपासून वंचित आहेत, त्याठिकाणी सचिन यांना सौरऊर्जा पोहोचवायची आहे. त्यांच्या या कामाला दै. 'मुंबई तरुण भारत'कडून शुभेच्छा!

- अक्षय मांडवकर 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat