कैलासाचा वैश्विक वारसा

    दिनांक  16-May-2019   हिंदूंच्या तीर्थाटनामध्ये चारधाम यात्रा आणि कैलास-मानससरोवर यात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोट्यवधी हिंदूंना आयुष्यात एकदा तरी इथे जाऊन भगवंताचे दर्शन घ्यावेसे वाटते. हजारो वर्षांपासून, आपल्या पूर्वजांकडून चालत आलेला हा वारसा आपणही पुढे नेत आहोत, अशी भावनाही कित्येकांच्या मनात दाटून येते. चारधाम यात्रा वा कैलास-मानससरोवराची यात्रा केल्यानंतर पुण्य मिळते, मानसिक समाधात लाभते, अशी धारणा प्रत्येकच हिंदूच्या मनात विलसत असते. भगवंताचे निवासस्थान 'याचि देही-याचि डोळा' पाहायला मिळाल्याचा आनंदही सर्वांच्याच चेहर्‍यावर असतो. आता हिंदूंच्या पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या कैलास भू-क्षेत्राला 'युनेस्को'ने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने आपल्या अंतरिम यादीत सामील केले आहे.

 

कैलास भू-क्षेत्राला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत स्थान मिळाल्याने ही भारतासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, कैलास क्षेत्राला वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावात प्राकृतिक वारशासह सांस्कृतिक श्रेणींतर्गतही संरक्षित वारशाचा दर्जा मिळणार आहे. पवित्र कैलास भूक्षेत्र भारतासह चीन आणि नेपाळचा संयुक्त वारसा आहे. कैलासाला संरक्षित जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, या हेतूने चीन व नेपाळ या दोन्ही देशांनी यापूर्वीच आपला प्रस्ताव 'युनेस्को'कडे पाठवला होता. आता भारतानेदेखील या दिशेने पावले उचलत आपल्या ताब्यातील ७ हजार, १२० वर्ग किलोमीटरच्या क्षेत्रफळाला वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, अशी मागणी केली व 'युनेस्कोने'देखील त्याला प्राथमिक मंजुरी दिली आहे. अशाप्रकारे आता एकूण ३१ हजार, २५२ वर्ग किलोमीटरचा भाग 'युनेस्को'च्या अंतरिम यादीमध्ये सामील झाला आहे. हे काम उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये असलेल्या 'युनेस्को'च्या वर्ग-२ केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले. देहरादूनमधील या केंद्रावर आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांच्या प्राकृतिक वारशांना वैश्विक पटलावर ओळख देण्याची जबाबदारी आहे.

 

देहरादून येथील श्रेणी-दोन केंद्राचे व्यवस्थापक डॉ. व्ही. बी. माथूर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "नेपाळची आंतरराष्ट्रीय संस्था 'इसीमोड' आणि उत्तराखंड अंतराळ उपयोग केंद्रासह अन्य संस्थांनी महत्त्वाची भूमिका निभावली." माथूर पुढे म्हणाले की, "अंतरिम यादीमध्ये पवित्र कैलास भू-क्षेत्राला स्थान मिळाल्यानंतर नियमानुसार एक वर्षापर्यंत विभिन्न स्तरावर काम करावे लागते. त्यानंतर मुख्य प्रस्ताव तयार करून युनेस्कोला पाठवावा लागेल आणि पुढे कैलास भूक्षेत्राला वैश्विक वारशाचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेला अंतिम रूप दिले जाईल."

 

कैलास भू-क्षेत्राला जागतिक वारशाचा दर्जा मिळवून देण्यात उत्तराखंडमधील 'युसॅक'च्या 'सॅटेलाईट मॅपिंग'चे महत्त्वाचे योगदान आहे. उत्तराखंड अंतराळ उपयोग केंद्राचे (युसॅक) व्यवस्थापक डॉ. एम. पी. एस. बिष्ट याबाबत म्हणाले की, "पवित्र कैलास भूक्षेत्राच्या प्राकृतिक व सांस्कृतिक विविधता आणि त्यात होत असलेल्या बदलांबाबत उत्तराखंड अंतराळ उपयोग केंद्राने १४ उपग्रह नकाशे तयार केले आहेत. यातील तथ्यांच्या आधारावर 'युनेस्को'च्या वर्ग-दोन केंद्राला उत्तम प्रस्ताव मांडण्यात चांगली मदत झाली." अशाप्रकारे भारत, चीन व नेपाळ या तिन्ही शेजारी देशांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कैलास भू-क्षेत्राला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याची कसरत आता अंतिम टप्प्यावर आल्याचे दिसते. एकदा या भागाला असा दर्जा मिळाला की, या संपूर्ण क्षेत्राचा विकास होईल, इतकेच नव्हे तर कैलास-मानससरोवर यात्रादेखील उत्तमरित्या करता येईल.

 

'युनेस्को' वर्ग-दोन केंद्रासह भारतीय वन्यजीव संस्थेचे व्यवस्थापक असलेल्या डॉ. माथूर यांनी सांगितले की, "कैलास-मानससरोवराच्या यात्रामार्गाला प्राथमिक प्रस्तावात अंतिम रूप दिलेले नाही. तथापि, उत्तराखंडमधील पिथौरागड मार्गच सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे. तरीही यावर अधिक विचारविमर्श करून अंतिम रूप देण्यात येणार आहे." दरम्यान, कैलास-मानससरोवर यात्रेचा सर्वाधिक मार्ग भारतात असून त्याची लांबी एक हजार, ४३३ किमी आहे. यातील १२७ किमी पायी तर एक हजार, ३०६ किमीची यात्रा वाहनाने केली जाते. यासाठी १४ दिवस लागतात. दुसरीकडे चीन सीमेवर एकूण ४६४ किमीचा यात्रामार्ग असून त्यात ५३ किमी पायी व ४११ किमी वाहनाने यात्रा केली जाते. चीनमधील यात्रेला १२ दिवसांचा कालावधी लागतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat