मी संपत्ती जमावल्याचे सिद्ध करून दाखवा ; नरेंद्र मोदींचे विरोधकांना खुले आव्हान

15 May 2019 15:43:29


पटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना बिहारच्या पालीगंज येथील सभेत खुले आव्हान केले आहे. "मला शिव्या देण्यापेक्षा मी संपत्ती जमावल्याचे, बॅंकेत बेहिशोबी पैसा जमा केल्याचे सिद्ध करून दाखवा", असे आव्हान मोदींनी विरोधकांना दिले आहे.

 

नरेंद्र मोदी म्हणाले, "विरोधकांनी अपशब्द वापरण्याऐवजी हिंमत असेल तर मी मालमत्ता जमविल्याचे सिद्ध करा. माझे परदेशात कोठे खाते आहे का? महागडय़ा गाड्या खरेदी केल्या आहेत का?, हे दाखवून द्या. मी श्रीमंत होण्याचे स्वप्नही पाहिलेले नाही, गरिबांच्या पैशाची लूट केलेली नाही, असे पंतप्रधानांनी ठणकावले.

 

लष्कराला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले !

 

आता पाकिस्तानची व दहशतवाद्यांची घाबरगुंडी उडाली असून, ते आता लपून बसले आहेत. लष्कराला काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्याने लक्ष्यभेद करण्यात आला, त्यानंतर दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हा लष्कराला दिलेल्या स्वातंत्र्याचा परिणाम असल्याचेही ते म्हणाले.

 

माझ्यावर असभ्यपणे टीका करणाऱ्यांना मतदार उत्तर देतील !

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाचा उल्लेख त्यांनी महामिलावटी, असा एकदा केला. माझ्यावर असभ्यपणे टीका करणाऱ्यांना मतदारच उत्तर देतील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0