महासत्तांचे मनोमिलन ?

    दिनांक  15-May-2019   जागतिक राजकारणाचे दोन ध्रुव म्हणजे अमेरिका आणि रशिया. भौगोलिकदृष्ट्या जरी दोन्ही बलाढ्य देश उत्तर गोलार्धात असले तरी राजकीयदृष्ट्या अगदी परस्परविरोधी विचारसरणी आणि कृती. भांडवलशाहीला कुरवाळणारा अमेरिका आणि साम्यवादाची कास धरणारा सोव्हिएत रशिया. १९९१च्या युएसएसआरच्या विघटनानंतर रशियाचे तुकडे झाले, रशिया आता संपला, शक्तिहीन झाला, असा एक जागतिक विचारप्रवाह रुढार्थाने पुढे आला. परंतु, जसजशी वर्षे पुढे सरत गेली, तसतसे रशियाने आपले जागतिक राजकारणातील नाणे किती खणखणीत आहे, याची जगाला वेळोवेळी प्रचिती दिली.

 

दोन्ही भीषण महायुद्धांनंतर सुरू झाला तो शीतयुद्धाचा काळ. थेट एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा विविध राष्ट्रांना आपल्या पंखाखाली घेऊन अमेरिका आणि रशिया या दोन्ही बलाढ्य राष्ट्रांनी शक्तिप्रदर्शनाची एकही संधी दवडली नाही. परिणामी, जागतिक राजकारणाचे हे दोन ध्रुव अधिक दृढ होत गेले आणि आजही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या तीच परिस्थिती कायम आहे. खरंतर शीतयुद्धाच्या समाप्तीची घोषणा १९८९ साली गोर्बाचेव्ह आणि जॉर्ज बुश यांनी मालताच्या परिषदेत केली असली तरी, पडद्यामागे सगळे काही आलबेल तेव्हाही नव्हते आणि आजही नाही. अमेरिका-रशिया दरम्यान प्रत्यक्ष संघर्षाचे काही क्षुल्लक प्रसंग उद्भवले असले तरी रशियाची ‘केजीबी’ आणि अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ यांचे अंतर्गत हाडवैरही काही लपून राहिलेले नाही. पण, वरकरणी मात्र दोन्ही राष्ट्रांचे परराष्ट्र संबंध, व्यापारी संबंध समाधानकारकच राहिले आहेत.

 

ओबामा यांच्या शासनकाळातही अमेरिका-रशियामध्ये विविध मुद्द्यांवरून मतभिन्नता चव्हाट्यावर आली. मग तो मुद्दा युक्रेनचा असो वा क्रीमिआचा, अमेरिकेने रशियाच्या या कृत्यांवर तीव्र आक्षेप नोंदवला. सीरियामध्येही असद सरकारला, तर सध्या व्हेनेझुएलामध्ये मादारोंना दिलेल्या पाठिंब्यामुळेही अमेरिका-रशिया यांचे संबंध काहीसे तणावपूर्वक राहिले. पण, या सगळ्यांनी कहर केला तो डोनाल्ड ट्रम्प यांच्या २०१६च्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीने. अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्ष, माध्यमे यांनी ट्रम्प यांच्या निवडणुकीत थेट रशियाचा हात असल्याचा आरोप केला. ट्रम्प यांचे पुतीन यांच्याशी असलेले सौहार्दाचे संबंध पाहता, त्यावरून मोठा वादंगही निर्माण झाला. अखेरीस या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आणि रॉबर्ट मुलर यांनी या संदर्भातील गोपनीय अहवालही तयार केला आणि या अहवालात डोनाल्ड ट्रम्प यांना क्लीनचिटही देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिका-रशिया संबंधांना नवीन कलाटणी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चिली जात आहे.

 

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांचा नुकताच संपन्न झालेला रशिया दौरा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतो. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत पॉम्पिओ यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचीही भेट घेतली. या भेटीमध्ये पुतीन यांनी मुलर यांच्या अहवालाचे कौतुक करत अमेरिका-रशिया संबंध पुन्हा एकदा नवीन वळणावरून सुरू होतील, अशी सकारात्मक अपेक्षाही व्यक्त केली. परिणामी, रशियन माध्यमांनीही या भेटीमुळे अमेरिका-रशिया संबंधातील तणाव निवळून, सगळे आलबेल होईल, असे चित्र रंगवायला सुरुवात केली. परंतु, ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी निश्चितच नाही. कारण, दुसरीकडे अमेरिका-इराणमध्ये संघर्षाची ठिणगी पेटली आहे. त्यात इराण हा रशियाच्या गोटातला देश. पण, अमेरिकन निर्बंधांमुळे आता इराणही इरेला पेटला आहे. पॉम्पिओ यांनी इराणबरोबर युद्धपरिस्थितीची शक्यता नाकारली असली तरी अमेरिका इराणवर कठोर कारवाई करू शकते. त्यामुळे पुतीन यांना भेटून पॉम्पिओ यांनी एकप्रकारे इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले जाते. त्यामुळे आगामी काळात अमेरिका-इराण संघर्षावर रशियाची भूमिका काय असेल, ते स्पष्ट होईलच. पण, त्यानंतर अमेरिका-रशिया यांच्या संबंधात मिठाचा आणखी एक खडा पडेल, हे निश्चित.

 

पुढील महिन्यात जपानमध्ये होणार्‍या ‘जी-२०’ देशांच्या परिषदेत ट्रम्प-पुतीन यांची भेट होऊ शकते. पण, तोपर्यंतची परिस्थिती कशी असेल, त्यावर ही भेट निर्भर करते. ट्रम्प यांचा हेकेखोर स्वभाव, तर पुतीन यांचा कूटनीतीचा प्रदीर्घ अनुभव यामुळे या प्रकरणानंतर दोन्ही नेत्यांची समीकरणे पुन्हा कितपत जुळून येतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे एकूणच या दोन्ही महासत्तांचे मनोमिलन होणे, ही जागतिक आदर्श परिस्थिती समजली पाहिजे. त्यामुळे वर्तमानात, भविष्यात तसे होण्याची शक्यताही तशी धूसरच!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat