धार्मिक उत्सवाचे सामाजिकीकरण

    दिनांक  14-May-2019सोप्या शब्दांत डॉक्टर सतीश नाईक मधुमेह आणि तत्संबंधित गोष्टी समजावून सांगत होते. कशाप्रकारे विविध ठिकाणी जाऊन तेथील व्यक्तींचा मानसिक, शारीरिक आणि त्यांच्या व्यवसायाचादेखील अभ्यास करून मधुमेहाची कारणे आणि त्यासंबंधीचे त्यांचे चाललेले संशोधन सांगत होते. त्यांनी एक रस्त्यावरील दगड फोडणार्‍या जमातीच्या लोकांचादेखील अभ्यास केला आहे. डॉक्टर म्हणाले, “कठोर मेहनत करणार्‍या या कामगारांनादेखील मधुमेह असल्याचे मला दिसून आले आहे. विचार, आहार आणि व्यवहार इ. सर्व गोष्टींवर आपल्या आजाराची विविध लक्षणे अवलंबून असतात. मागील पिढीतील काही आजारदेखील समान गुणसूत्रांमुळे पुढील पिढीत येऊ शकतात. जर सुरुवातीस संबंधित आजारांची काळजी घेतली, तर ते टाळतादेखील येऊ शकतात, असे ते म्हणाले. परंतु, नियमित आहार व औषध याची वेळेतच सुरुवात करावयास हवी.” गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांनी फक्त ‘मधुमेह’ या विषयावर सखोल चिंतन सुरू आहे असं समजलं. विविध वृत्तपत्रांमध्ये, नियतकालिकांत डॉक्टरांचे ‘मधुमेह’ या विषयाचे लेख प्रसिद्ध होतात, पण प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडूनच समजून घेण्याचं भाग्य काही औरच...

 

डॉक्टर विविध ठिकाणी जाऊन निःशुल्क ‘मधुमेह’ या विषयावर व्याख्यानं देतात, असे सहज बोलून गेले. यांचा आपण कोठेतरी कोणाला तरी कार्यक्रम घेण्यास सुचवू शकतो, हा विचार मनात चमकलाच. एकदा आमच्या शेजारी साईबाबा मंदिराचे कार्यकर्ते भंडार्‍याची वर्गणी मागायला माझ्याकडे आले. भंडार्‍यासारख्या आयोजनासोबत इतरही विधायक कार्यक्रम व्हायला हवेत, असं मला नेहमीच वाटतं. ‘साई मित्र मंडळा’च्या साई मंदिराच्या भंडार्‍याला यंदा २५ वर्षे पूर्ण होत होती. म्हणून जरा धडाक्यात उत्सव करण्याचा कार्यकर्त्यांचा उत्साह होता. लगेच डॉ. नाईक यांच्या विषयाची आठवण होऊन तो विषय मांडण्याचा घाट घातलाच. म्हटलं असे एक डॉक्टर आहेत की, जे मधुमेह या विषयावर व्याख्यान देतात आणि त्यांचा कार्यक्रम करूया का ? सगळ्यांनी होकार दिला.

 

कार्यक्रमाला डॉक्टर वेळेवर आले. फार श्रोते जमले नव्हते. मी आणि डॉक्टर मंदिरात जाऊन बसलो. एक दोघेजण तपासून घ्यायला आले. कारण, त्यांना कार्यक्रमाच्या स्वरूपाची कल्पना नाही, असे लक्षात आले. पण डॉक्टरनी लगेच सर्व सूत्रं आपल्या हातात घेऊन आलेल्या मंडळींच्या सोबत गप्पांच्या स्वरूपात मधुमेहाची माहिती सांगायला सुरुवात केली. दोन, चार म्हणता म्हणता साधारण चांगलाच जमाव जमला. काहीजणांनी चर्चेत सहभाग घ्यायला सुरुवात केली. अगदी साध्या-सोप्या भाषेत डॉ. सतीश नाईक सर्वांचे नीट ऐकून घेऊन समजावून सांगत होते. कशाप्रकारे गुलाबजामचा साखरमिश्रित घट्ट पाकाचा प्रवाह संथ गतीने प्रवास करतो त्याच कल्पनेने जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्ताचा पातळपणा कमी होऊन, शरीराला रक्तपुरवठा होण्यास अडथळे निर्माण होतात व त्या अनुषंगाने कोणकोणते आजार निर्माण होऊ शकतात, हे वेगवेगळ्या उदाहरणातून सांगत होते.


जाता जाता सर्व मित्रांना एक साईबाबांचीच गोष्ट सांगण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांना म्हटलं, मी कोठेतरी वाचलं आहे की, एकदा कोणता तरी मोठा आजार शिर्डी गावात येणार आहे म्हणून गावाच्या वेशीवर बाबांनी एका पिठाची रांगोळी काढावयास सांगितली होती. त्याच दृष्टीने साईबाबांच्या उद्देशाने दूरदृष्टी ठेवून भविष्यात येणार्‍या संकटांना तोंड देण्यासाठी डॉ. सतीश नाईक यांच्यासारखी मंडळी आपला अमूल्य वेळ देऊन अनमोल कार्य करीत आहेत. सद्यस्थितीत बदलत्या राहणीमानानुसार मधुमेहासारख्या आजाराचा विळखा तरुणाईलाही नकळत पोखरत जातो. तसं मधुमेह तपासणी केल्याशिवाय सहजपणे लक्षात येत नाही, पण तो असुर झाल्यावर त्याचे भयानक आजारात रूपांतर होऊन जीवघेणा होतो. ही वेळ येण्याच्या अगोदर समाजाला जागृत करणे हेदेखील साईबाबांनी गावाच्या वेशीबाहेर रोगराई थांबविण्याचा दृष्टीने काढलेल्या रांगोळीप्रमाणेच आहे. दोन क्षण सर्वजण स्तब्ध झाले होते. त्यात भविष्यातील धार्मिक उत्सवाकडे वस्तीत एक वेगळी दृष्टी मिळण्याची नांदी दिसत होती.

- दयानंद सावंत

(९८६९६१९७०४)


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat