मृत्यूनंतरही जीवदान : अवयवदान श्रेष्ठदान

    दिनांक  14-May-2019   ११ मे रोजी नाना पालकर स्मृती समितीच्या इमारतीमध्ये अवयवदान क्षेत्रातील तज्ज्ञ समाजसेवक अनिरूद्ध कुलकर्णी यांचे ‘अवयवदान’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अवयवदान हा विषय तसा गंभीरच. या व्याख्यानामध्ये काय असेल बरं... असा अंदाज घेत असताना वाटले की, मृत्यू, त्यानंतरची नातेवाईकांची होरपळ, अवयवदान म्हणजे काय? किंवा मृत्यू आणि कायद्याची जड गंभीरता या व्याख्यानामध्ये नक्की असेल असे वाटले. पण हे व्याख्यान म्हणजे मानवाच्या मृत्यूनंतरही त्याला लाभलेल्या जीवदानाच्या अद्भुत शक्तीविषयीचे सकारात्मक प्रसन्न विवेचन होते. होय! प्रसन्न विवेचनच. मृत्यूनंतर काय? तर ‘मृत्यूनंतरही जीवदान’ अशी प्रेरणा देणारे अनिरूद्ध कुलकर्णी यांचे अवयवदानावरचे व्याख्यान...

 

समजा, अनिरूद्ध कुलकर्णी घरी आले, सोफ्यावर बसले आणि स्वयंपाकघरात सौंना म्हणाले, “चहा दे गं.” मात्र, स्वयंपाकघरातून चहा येण्याआधीच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे ‘रामनाम सत्य’ झाले तर... मृत्युपूर्वी त्यांची अवयवदान करण्याची कितीही इच्छा असली तरी, त्यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या मृत शरीरातील अवयवांचे दान होऊच शकत नाही. हो! मात्र, अशा मृत्यूंमध्ये डोळ्याच्या बाहुल्यांवरचा पारदर्शक पडदा किंवा त्वचा दान करता येते. मात्र, हृदय, फुप्फुस, पित्ताशय, किडनी, त्वचा यांचे अवयवदान तेव्हाच होते ज्यावेळी मेंदू मृत होऊन मृत्यू होतो,” अनिरूद्ध कुलकर्णी सहजपणे बोलत होते. स्वत:चा मृत्यू कल्पून दुसर्‍याच्या आयुष्यावर बोलू काहीचे त्यांचे बोलणे उपस्थित श्रोत्यांच्या हृदयात, मेंदूत पक्के रूजले, इतके नक्की. सारांश, डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा आणि पाठ आणि पायावरची त्वचा ही हृदयविकाराने झालेल्या मृत्यूमध्ये घेता येते, तर ‘मेंदू मरणे’ अर्थात, मेंदू काम करणे बंद करतो, तेव्हाच इतर अवयवांचे दान करता येते हा तो संदेश. कदाचित सुज्ञ आणि ज्यांचे सामान्यज्ञान चांगले आहे, त्यांना ‘अवयवदान’ आणि ‘देहदान’ या दोन चळवळी वेगळ्या आहेत, हे माहिती असते. पण आजही जर सामान्य जनतेच्या मते देहदान म्हणजे शरीर दान करणे. मग त्यातील पाहिजे ते उपयोगी अवयव दुसर्‍या गरजू व्यक्तींना दान केले जातात. त्यानंतर ते शरीर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये भावी डॉक्टर शस्त्रक्रिया सरावासाठी वापरतात, असा भयंकर समज भयंकर मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आहे. त्यामुळे ‘अवयवदान’ आणि ‘देहदान’ या दोन वेगळ्या चळवळी आहेत आणि या दानाचे महत्त्व काय, याबाबत समाजामध्ये जागृती करण्याची खूप खूप गरज आहे हे नक्की. हाच पैलू लक्षात घेऊन नाना पालकर स्मृती समितीने या विषयाचे व्याख्यान आयोजित केले असावे.

 

तसे पाहायला गेले, तर वर्तमानपत्रामध्ये अवयवदानासंबंधीच्या बातम्या येत असतात. अर्थात, त्यांचे प्रमाण नगण्यच असते. आपण त्या बातम्या वाचलेल्याही असतात, जसे दोन वर्षे वयाच्या पुण्याच्या चिमुरड्याला ‘ब्रेनट्युमर’ झाला. पण सहा महिन्यांच्या कालावधीने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आईवडिलांनी त्याचे अवयवदान करण्याचे ठरवले. या बालकाच्या अवयवदानाने सहा गंभीर रुग्णांचे प्राण वाचले. त्यांना जीवदान मिळाले. ८२ वर्षे वयाचे वृद्ध गृहस्थ वारले. त्यांच्या अवयवदानाने दोघांना जीवदान मिळाले. वगैरे... वगैरे... या बातम्या वाचून कदाचित अवयवदानाच्या पुण्यदानाची कल्पना तितकीशी येत नाही. पण किडनी खराब झाल्यामुळे आठवड्यातून तीनदा डायलेसीस करणारे रुग्ण, हृदय, पित्ताशय, फुप्फुस खराब झाल्याने तीळतीळ मृत्युपंथाला जाणारे रुग्ण, पाहू शकत नसल्यामुळे परावंलबी जगणारे रुग्ण, आगीत होरपळून, जळून ज्यांच्या शरीरावरची त्वचा जळलेली असते असे रुग्ण... या सार्‍यांसाठी अवयवदानाची काय अमूल्य किंमत असते हे ते रुग्ण आणि त्यांचे आप्तच जाणो. मात्र, कोणाही संवेदनशील व्यक्तीलाही अवयवदानाची संकल्पना तितकीच महत्त्वाची वाटते. या सार्‍यांचा वेध घेत अनिरूद्ध कुलकर्णी यांनी ‘अवयवदान’ या प्रक्रियेतील अनेक किचकट टप्पे अतिशय सोप्या पद्धतीने उलगडून सांगितले. आपल्या देशातच नव्हे, तर जगभर अवयव खराब झाले म्हणून मृत्यूच्या दाढेत जाणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. या सार्‍यांना जर त्यांच्या रक्त आणि इतर आवश्यक वैद्यकीय संकल्पनेतले साम्य असणारे अवयव मिळाले, तर ते वाचू शकतात, ते जगू शकतात. मात्र, जगभरात अवयवदानासंबंधी उदासिनता दिसून येते, असे अनिरूद्ध कुलकर्णी म्हणाले. आपण भारतीय लोक दानधर्मावर विश्वास ठेवतो. किंबहुना दान करण्याची इच्छा वारसारूपाने आपल्यामध्ये आलेली असते. आपले सगळे सण-उत्सव, आनंद आणि दु:खाचेही क्षण दान केल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. मात्र, अन्न, पैसे, वस्तू, प्राणी वगैरे यांच्या पलीकडे दानाची संकल्पना कधी कधी जाते. रक्तदान श्रेष्ठ दान आहेच, पण अवयवदान हे श्रेष्ठतम दान आहे, अशी स्पष्ट संकल्पना व्यक्त करत अनिरूद्ध यांनी आपल्या मार्गदर्शनामधून श्रोत्यांना अवयवदानाची प्रक्रिया समजून सांगितली.

 

त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी स्पष्ट केले की, लौकिक अर्थाने मेंदू मृत घोषित करण्यासाठी ‘अवयवदान कायदा २०११’च्या अनुसार जे डॉक्टर पात्र आहेत तेच डॉक्टर लौकिक अर्थाने मृत पावलेल्या व्यक्तीचा मेंदू मृत आहे असे घोषित करतात. त्यासाठी लौकिक अर्थाने मृत पावलेल्या व्यक्तीची ‘अपनेया टेस्ट’ केली जाते. साधारणत: कोणतीही घटना घडली की, आपल्या शरीराकडून तत्काळ त्याला अनुसरून कृती क्षणार्धात केली जाते. मेंदू मृत पावला असेल, तर व्यक्ती अशी प्रत्युत्तर क्रिया करत नाही. मेंदू संदेश देण्यास जीवंतच नसतो. मात्र, शरीराचे अवयव व्हेटिंलेटरच्या साहाय्याने कृत्रिमरीत्या काम करत असतात. या ‘अपनेया टेस्ट’मध्ये डोळ्यांवर प्रखर उजेड असलेला बॅटरी धरली जाते. जर मेंदू मृत असेल, तर या अचानक आलेल्या प्रकाशझोतानेही त्या व्यक्तीची बुबुळे हलत नाहीत, पापण्यांची हालचाल होत नाही, डोळ्यांची जराही हालचाल होत नाही. पुढे छाती दाबली असता काहीही प्रतिक्रिया आली नाही, हाताचे कोपरे,पायाचे गुडघे यावर दाब येईल असे मारले तरी काहीच हालचाल झाली नाही, व्हेटिंलेटर काढल्यावर श्वास घेण्यासाठीचा प्राणांतिक प्रयत्न झाला नाही आणि शेवटी कानामध्ये थंड पाणी ओतले तरी काहीच प्रतिक्रिया आली नाही, तर ती व्यक्ती मृत असून त्याचा मेंदू मृत (ब्रेनडेड) असू शकतो, असे मानले जाते. ही शक्यता का? तर सहा तासांनी पुन्हा ही चाचणी केली जाते. जर त्यावेळीही याच प्रकारे कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, तर पात्र आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्या व्यक्तीस ‘ब्रेनडेड’ घोषित केले जाते. यानंतर या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अवयवदानाविषयी सांगितले जाते. पण नुसते सांगितले जाते, यात सूचना किंवा आदेश नसतो. डॉक्टर किंवा कोणीही मृतव्यक्तीच्या नातेवाईकांस मृतव्यक्तीचे अवयव दान करा, असा दबाव आणू शकत नाही.

 

जर मृतव्यक्तीचे जवळचे नातेवाईक म्हणजे आईवडील किंवा अपत्य यांनी अवयवदान करण्यासाठी कायदेशीररीत्या संमती दिली, तरच अवयवदानाची प्रक्रिया पुढे सरकते. मात्र, या अवयवदानाच्या बदल्यात त्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या खर्चामध्ये सवलत किंवा काही मोबदला देता येणार नाही. कारण, अवयवदान हे ऐच्छिक असते, व्यावसायिक नसते. तसेच हे अवयवदान जरी केले तरी, ते अवयव कोणाला दान द्यायचे आहेत, हे त्या मृतव्यक्तीचे नातेवाईक किंवा डॉक्टर ठरवू शकत नाहीत. त्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य विभागाची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. जी केंद्रीय असून राज्यस्तरीयही आहे. या व्यवस्थेकडे त्या त्या स्तराच्या रुग्णालयातील अवयव मिळण्याची गरज असलेल्या रुग्णांची यादी असते. रुग्णांच्या नोंदणी ज्येष्ठतेवरून आणि संबंधित सर्व प्रकिया पूर्ण करण्याच्या अटीवरून जे रुग्ण पात्र आहेत, त्यांनाच अवयवदान करण्यात येते. या सर्व प्रकियेत अवयवदान या क्षेत्रातील तज्ज्ञांची भूमिका मोलाची असते. कारण, अवयवदान करून एखाद्याला जीवदान देणे हे दैवीच कार्य असते. अनिरूद्ध कुलकर्णी सहजपणे तळमळीने विषय मांडत होते. त्यांच्या हृदयाची तळमळ उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांच्या मनात अलगद उतरली. हेच या व्याख्यानाचे फलित आहे.

 

(९५९४९६९६३८)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat