गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी

13 May 2019 13:38:02


 

 

मक्कल निधी मियाम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांचे वादग्रस्त विधान


तामिळनाडू : अभिनेता व मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हसन सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महात्मा गांधींची हत्या करणारा नथूराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. तामिळनाडूतील अरिवाकुरिची येथील एका प्रचार सभेत त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.

 

अरिवाकुरिची येथे होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत हसन यांच्या पक्षाकडून एस. मोहनराज हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरिवाकुरिची हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना 'हिंदू' दहशतवादाचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले, स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. त्याच नाव नथुराम गोडसे आहे. त्यानंतरच भारतामध्ये दहशतवादाला सुरूवात झाली."

 

हसन यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावरही हसन यांना ट्रोल करण्यात येत आहे. यावर अभिनेता विवेक ओबेरॉयने हसन यांना उद्देशून ट्विट केले आहे. यामध्ये त्याने तुमच्या राजकीय फायद्यासाठी देशांमध्ये दंगे घडवू नका असे आवाहन केले. या ट्विटमध्ये विवेक ओबेरॉय म्हणाला, "कमल सर, तुम्ही एक महान कलाकार आहात. कलाकारांना जात-धर्म नसते, तसेच दहशतवादालाही जात-धर्म नसतो. तुम्ही गोडसे हा दहशतवादी असल्याचे म्हणालात खरे पण यात तुम्ही हिंदू शब्दावर जोर द्यायला नको होता."

 

या पूर्वीही हसन यांनी हिंदू धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान, हसन यांच्या आजच्या हिंदू दहशतवादावरच्या वक्तव्यानंतर त्यांचा सोशल मीडियावरही जोरदार समाचार घेतला जात आहे. गोडसे जरी दहशतवादी असला तरी तुम्ही धर्माला का लक्ष करता. कारण तुमचे विचार विखारी आहेत, तुम्हाला देशात अराजकता निर्माण करायची असल्याचा आरोपही अनेकांनी केला. त्यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0