सुप्रजा भाग-१०

    दिनांक  13-May-2019गर्भवतीमध्ये गर्भावस्थेत विविध बदल सतत होत असतात. हे बदल फक्त शारीरिक नसून मानसिक व भावनिकही असतात. गर्भाच्या वाढीनुसार गर्भवतीचे शरीर स्वत:मध्ये बदल करीत असते. हे बदल घडत असताना काही त्रासदायक लक्षणे गर्भिणीला बेजार करतात. अशा त्रासांबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊया.

 

सर्वप्रथम गर्भधारणा झाल्यावर बहुतांशी वेळेस होणारा त्रास म्हणजे मळमळ आणि उलट्या. पहिल्या दीड-दोन महिन्यांमध्ये स्वाभाविकत: हा त्रास कमी होतो. पण, काही जणींमध्ये याची तीव्रता अधिक असते. काही विशिष्ट कालावधीपुरते मळमळते. (विशेषत: सकाळच्या वेळेस किंवा विशिष्ट अन्नपदार्थांचा, स्वयंपाकाचा वास आल्यावर) त्यासाठी काही चिकित्सेची गरज नसते. कोरडे ओकांबे असल्यास औषधोपचार करू नये. हल्ली प्रत्येक एका आरोग्याच्या तक्रारीवर एक औषधाची गोळी गर्भवती घेत असते, हे चुकीचे आहे. थोडी सहनशक्ती वाढवणे, थोडा धीर धरणे आणि घरगुती उपाय आधी करून बघणे, हे महत्त्वाचे आहे. कारण, काही औषधांचा पोटात असलेल्या गर्भावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे जेवढे होईल तेवढे औषधे घेणे टाळावेच. पण, औषधोपचार जर सुरू असतील, तर तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याशिवाय ती अचानक थांबवूही नयेत.

 

उलटी (तीव्र स्वरूपाची) असताना एक 'Golden Rule' लक्षात घ्यावा, जेव्हा घन आहार खाणार, त्यावेळेस द्रवाहार घेऊ नये आणि जेव्हा द्रवाहार घेणार असाल, तेव्हा घनाहार टाळावा. म्हणजे दोन्हीचे एकत्र सेवन टाळावे. द्रवाहार हा हळूहळू, थोडा-थोडा आणि थोड्या कालावधीने घेत राहावा. यावर दुसरा उपाय म्हणजे, सकाळी उठल्यावर उपाशीपोटी साळीच्या भाताच्या लाह्या खाव्यात. यामुळे मळमळ आटोक्यात येते. सकाळच्या वेळेस झोपून उठल्यावर तोंड न धुता चार-पाच चमचे साखर खावी वा तोंडात धरावी. त्याने मळमळ व उलट्या कमी होतात. तोंडात वेलची धरावी. उग्रवासांपासून दूर राहावे आणि सकाळी उद्यानात, बागेत हिंडावे. या सगळ्या उपायांमुळे मळमळ आणि उलट्या कमी होतात.

 

ज्या वासाने उलट्या होऊ लागतात, ते खाणे, बघणे व शिजवणे टाळावे. उलट्या आणि जुलाबांची तीव्रता पहिल्या एका महिन्यांत अधिक असते. तिसऱ्या महिन्यापर्यंत ही तीव्रता ९० टक्क्यांनी कमी होते किंवा बंद होते. इतर त्रासांसाठी औषधोपचाराची गरज भासू शकते. पण, औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे. प्रत्येक गर्भवतीत मळमळ आणि उलट्या होतीलच असे नाही. काहींच्या मनात ही भीती बसते की, उलट्या झाल्या नाहीत म्हणजे काहीतरी चुकतं आहे. काहीतरी समस्या आहे. पण, असे काही नसते. प्रत्येक शरीर भिन्न असते आणि प्रत्येक शरीराची गर्भधारणेला होणारी प्रतिक्रिया ही भिन्नच असणार. म्हणून उलट्या झाल्या की चांगले आणि नाही झाल्या म्हणजे वाईट, असे काही नसते.

 

गर्भवतीला होणारा दुसरा सामान्य त्रास म्हणजे मलबद्धतेचा आणि त्याचबरोबर मूळव्याध (piles) आणि भगंदर (fissures) चा. मागील लेखांमधून आपण बघितले की, जसजशी गर्भाची वाढ होत जाते, तसतसा गर्भाशयाचा आकार वाढत जातो. गर्भाशयाची स्त्रीशरीरातील स्थिती ही मूत्राशयाच्या मागे आणि मलाशयाच्या पुढे अशी असते. त्यामुळे गर्भाशयात गर्भ वाढू लागला की, गर्भाशयाचा दाब पुढे आणि मागे असलेल्या दोन्ही अवयवांवर पडतो. यामुळे थोड्या थोड्या वेळाने वारंवार मलप्रवृत्ती व मूत्रप्रवृत्ती (शौचास लागणे, लघवी होणे) होणे स्वाभाविक आहे. तसेच त्याचे प्रमाणही कमी असते. काहीवेळेस आहारातील बदल झोपेच्या पद्धतीमधील बदल, उलट्या-जुलाब इ. कारणामुळे आहाराची मात्रा कमी घेतली जाते. या सर्व कारणांमुळे शौचास कडक होणे, मलप्रवृत्तीच्या वेळेस ठणका लागणे आणि असे वारंवार होऊ लागल्यास मूळव्याध व भगंदरचा त्रास होऊ लागतो. ‘बरेचदा भरपूर पाणी प्या म्हणजे शौचास साफ होईल,' असा सल्ला दिला जातो. पण, हे खरं नाही. शरीरात ७० टक्के जलीय भाग नव्हे, तर द्रवभाग आहे. तहान लागणे म्हणजे हे प्रमाण कमी होण्याचे द्योतक आहे. जसे भूक लागल्यावर आपण जेवतो, तसेच तहान लागल्यावरच पाणी प्यावे. याचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार भिन्न असते. तसेच ऋतूनुसारही (उन्हाळ्यात अधिक आणि थंडीत कमी ) तहान लागण्याच प्रमाण बदलते. त्यामुळे जसे उन्हाळ्यात आपण स्वेटर घालत नाही, थंडीत रेनकोट घालत नाही, त्याचप्रमाणे सरसकट १२ महिने आठ-दहा ग्लास पाणी पिणे चुकीचे आहे. जे पाणी आपण पितो ते शरीरातून तसेच्या तसे बाहेर पडत नाही. पाणीही शरीराला पचवावे लागते आणि अतिपाणी पिणे म्हणजे वृक्कांवर (किडणी) अतिरिक्त भार घालण्यासारखे आहे. जेव्हा तहान लागेल,तेव्हा तहान भागेल इतकेचे पाणी प्यावे. अन्य द्रवाहारातून द्रवांश शरीराला मिळतोच, हे लक्षात ठेवावे.

मलबद्धतेसाठी घरच्या घरी करता येण्यासारखे काही उपाय आहेत. एक मूठभर काळ्या मनुका स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि पाच पट अधिक पाण्यात भिजत ठेवाव्यात. चार तासांत काळ्या मनुका व्यवस्थित फुलतात. तेव्हा त्या खाव्यात आणि मनुकांचे पाणीही प्यावे. तसेच अंजीर (सुका असल्यास भिजवून). या दोन्ही उपायांनी हिमोग्लोबिनही सुधारते. काळ्या मनुकांचे सूप ही मलबद्धता (constipation) कमी करण्यासाठी आणि रक्तवाढीसाठी उपयोगी आहे. यासाठी काळ्या मनुका स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्या मग तुपावरपरताव्यात. मग जिरं-मीठ साखर घालून मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. पाणी घालून एक उकळी काढावी आणि ते प्यावे किंवा थंड/साध्या पाण्यात वाटलेल्या मनुकांचे मिश्रण घालून सरबतासारखे प्यावे.

 

रोज संध्याकाळी कपभर गरम दूध (गायीचे दूध अधिक उत्तम) घ्यावे. त्यात एक-दोन चमचे साजूक तूप घालून प्यावे.दुधाऐवजी पाण्यातूनही तूप प्यायल्यास फायदा होतो. मांसाहार करणाऱ्यांनी गर्भावस्थेत त्याचे प्रमाण कमी करावे. या सगळ्या उपायांनी मलबद्धतेचा त्रास हमखास कमी होतो. याचबरोबर जेवणाच्या आणि झोपेच्या वेळांमध्ये दोन ते अडीच तासाचे अंतर अवश्य ठेवावेे. पचन नीट होत असल्यास मलबद्धतेचा त्रास विशेष होत नाही. मूळव्याधीचा त्रास बहुतेकवेळा मलबद्धतेमुळेच होतो. दुखणे, टोचणे, (गुदभागी) असह्य वेदना असणे अशा वेळेस पसरट ताटात/परातीत त्रिफळाचा काढा घ्यावा आणि त्यात बसावे. यालाच 'sitz bath' म्हणतात. त्रिफळ्याच्या काढ्याने वाढलेला कोंब (PILES) कमी होतो. सूज आणि वेदनाही कमी होतात. गुदद्वाराशी खोबरेल तेल, एरंडेल, शतधौत धृत, कैलास जीवन लावावे. याने ठणकाही कमी होतो आणि आग ही कमी होते. सुरणाच्या भाजीचे सेवन आठवड्यातून एक ते दोन वेळा करावे. ताज्या ताकात जिऱ्याची पूड घालून प्यावे आणि कडक आसनावर बसू नये. (fissures) मध्येही वरीलप्रमाणे शतधौत घृथ, कैलास जीवन, खोबरेल तेल लावावे. औषधी तेलाची बस्ती घ्यावी. यामुळे जखम भरून येण्यास मदत होते. रोज एक चमचा लोणी आणि खडीसाखर खाल्याने मूळव्याध व भगंदर या दोन्हीमध्ये आराम मिळतो. औषधोपचार करावे लागल्यास वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

 

(क्रमशः)

वैद्य किर्ती देव

[email protected]

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat