जाणीव असू दे 'स्व-संकल्पने'ची

    दिनांक  13-May-2019
'स्व-संकल्पना' म्हणजे स्वत:बद्दलचे मूल्यनिर्धारण करणे. स्वत:विषयी तटस्थ आकलन करता येणे, खूप कठीण आहे. आपण जगाकडे पाहतो, तेव्हा आपण स्वत:च्या दृष्टिकोनातून पाहत असतो. आपण केंद्रस्थानी राहून जगाविषयी व इतर माणसांबद्दल परीक्षण करत असतो. ते खूप सोपे काम आहे, पण ते वस्तुनिष्ठ नक्कीच नाही. कारण, दुसर्‍यांचे परीक्षण शेवटी आपल्या मतांवर वा कधीकधी आपल्या सोयीनुसारच आपण करत राहतो. त्यात न्यायाचे पैलू असतील असे नाही. म्हणूनच सर्वप्रथम माणसाला 'स्व-संकल्पने'ची स्पष्टता समजली पाहिजे.

 

आपण सर्वसामान्यपणे दुसरी माणसे कशी वागतात, त्यांचे स्वभाव कसे आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काय समस्या आहेत, याबद्दल अनेक टिपण्या करीत असतो. पण, खरंच गंभीररित्या विचार करा की, तुम्ही स्वत:ला किती चांगले ओळखता? तुम्हाला तुमचे गुणधर्म माहीत आहेत का? तुम्ही काल जसे होता, तसे आज आहात का? का तुम्ही बदलला आहात? कालानुरूप वा तुमच्या वैयक्तिक अनुभवांमुळे तुमच्या वृत्तीत बदल घडले आहेत ना! तसे पाहिले, तर आपल्यापैकी काहींना स्वत:बद्दल विशद कल्पना आहे. पण, अनेक लोकांना मात्र स्वत:विषयी काहीच कल्पना नाही.

 

स्वत:बद्दलची मोकळी संकल्पना जाणण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेक गोष्टी माणसाविषयी कळल्या पाहिजेत. या विषयावर मानसशास्त्रज्ञांनी खूप संशोधन केले आहे. स्वत:विषयी चांगले किंवा वाईट वाटणे किंवा त्या गोष्टीबद्दल काथ्याकूट करणे म्हणजे 'स्व-संकल्पना' नव्हे. 'स्व-संकल्पना' म्हणजे स्वत:बद्दलचे मूल्यनिर्धारण करणे. स्वत:विषयी तटस्थ आकलन करता येणे, खूप कठीण आहे. आपण जगाकडे पाहतो, तेव्हा आपण स्वत:च्या दृष्टिकोनातून पाहत असतो. आपण केंद्रस्थानी राहून जगाविषयी व इतर माणसांबद्दल परीक्षण करत असतो. ते खूप सोपे काम आहे, पण ते वस्तुनिष्ठ नक्कीच नाही. कारण, दुसर्‍यांचे परीक्षण शेवटी आपल्या मतांवर वा कधीकधी आपल्या सोयीनुसारच आपण करत राहतो. त्यात न्यायाचे पैलू असतील असे नाही. म्हणूनच सर्वप्रथम माणसाला 'स्व-संकल्पने'ची स्पष्टता समजली पाहिजे.

 

त्यासाठी काही गोष्टींचा आपण परामर्श घेतला पाहिजे. स्वत:ला जाणून घेताना आपल्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू वा स्वभाववैशिष्ट्य, मग ते सकारात्मक असतील किंवा नकारात्मक असतील, आपल्याला त्याची खात्री असली पाहिजे. आपण थोडेसे रागीट आहोत वा हळवे आहोत, याची पक्की जाणीव असायला हवी. म्हणजेच आपल्याच श्रद्धा एकमेकांशी विसंगत असून चालत नाही. विचारसरणीत तफावत असून चालत नाही. एखादा धर्म मानत नाही, असे म्हणून धार्मिक आचारपद्धतीचे काटेकोर पालन करीत असल्यास त्या व्यक्तीला स्वत:बद्दल खरे काही ज्ञान नाही असे सिद्ध होते. यापलीकडे जाऊन एखाद्याची श्रद्धामूल्ये (अर्थात अंधश्रद्धा नव्हे) व जगण्याची मूल्ये दृढ असतील, अचल असतील, तर नक्कीच ही व्यक्ती स्वत:ला व स्वत:च्या तत्त्वज्ञानाला प्रगल्भपणे जाणते. अशा व्यक्ती या त्यांच्या ऐहिक आयुष्यात कित्येक चढउताराच्या प्रसंगीसुद्धा आपला आत्मसंयम सोडत नाहीत.

 

एकूण काय तर, काही माणसांना स्वत:बद्दल खास जाणीव आहे. ते स्वत:चे स्वभाव व अस्तित्व प्रगल्भपणे समजून घेतात, म्हणून त्यांच्या आयुष्यात स्थैर्य असते. सुसंगती असते. याच्या अगदी उलट अस्थिर असलेली, वारंवार डगमगणारी माणसे स्वत:ला नीट ओळखत नाहीत, जाणून घेत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या प्रतिक्रिया या आयुष्यातील घडणार्‍या घटनांप्रमाणे व भेटणार्‍या माणसांप्रमाणे बदलत राहतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तत्त्वज्ञान खरेतर त्यांनाच कळलेले नसते.म्हणूनच स्वत:बद्दलची संकल्पना, प्रांजळ संकल्पना खूप महत्त्वाची आहे.

 

त्या व्यक्तींना स्वत:च्या विचारधारेची, मूल्यांची जितकी उत्तम ओळख असते, तितका त्यांचा आत्मसन्मान खंबीर असतो. त्यांची निर्णयक्षमता वस्तुनिष्ठ व भक्कम असते. या व्यक्तींची आंतरिक क्षमता व प्रसंगानुरूप स्वत:चे सिंहावलोकन करण्याची क्षमता परिणत असते. त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा वा यशापयशाच्या परिणामाला या व्यक्ती अंतर्मनातूनच हाताळत असतात. जगाशी यांची नातीसुद्धा तितकीच स्पष्ट असतात. याचे कारण स्वत:शी जितक्या स्पष्टपणे वस्तुनिष्ठपणे व प्रगल्भतेने जुळलेल्या या व्यक्ती जगाबरोबरसुद्धा तितक्याच खंबीरपणे जोडलेल्या असतात. स्वत:ला गंभीरपणे जाणून घेणार्‍या लोकांमध्ये निराशा, साशंकता, अविश्वास व क्रोध या गोष्टी कमी प्रमाणात आढळतात. स्वत:ची उत्तम जाण असणार्‍या व्यक्तींमध्ये समाधानाचे व आत्मसंतुष्टपणाचे भाव बळकट असल्याने त्यांच्यात दुसर्‍याबद्दलची द्वेषाची व आक्रमकपणाची भावना कमी दिसून येते. त्यामुळेच या व्यक्ती शांतचित्त व स्वस्थचित्त असतात व सुदृढ नाती उपभोगतात.

 

तथापि स्वत:ला जाणून घेणार्‍या व्यक्ती देव नाहीत, ती सर्वसामान्य माणसेच आहेत. 'मी स्वत:ला चांगले जाणतो,' असे म्हणणार्‍या व्यक्ती खरंच प्रांजळपणे वा प्रगल्भपणे स्वत:ला जाणतात का, हे महत्त्वाचे आहे. त्यांची स्वत:बद्दलची जाण जर तथ्यावर आणि सत्यावर आधारित असेल, तरच त्यांना स्वत:ला ओळखून जगालाही ओळखण्याची किमया साधता येईल.

 
 - डॉ. शुभांगी पारकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat