एक है रजनी...

    दिनांक  13-May-2019   
मरू घातलेले जगणे, जीत्त सपान झालं माय, रडू नको, लढ आता’ सांगणारी चित्तरकथा अशी रजनी कर्डक झाली की गं माय...

 

मुळचे इगतपुरीचे, पण नंतर मुंबईच्या मुलुंड उपनगरात स्थायिक झालेल्या गौतम कर्डक आणि मंदा कर्डक यांची रजनी चौथी मुलगी. त्यानंतर कर्डक कुटुंबात काही दुर्दैवी घटना घडल्या. रजनीचा भाऊ न्युमोनियाने आजारी पडला. आत्याला नवर्‍याने सोडले, ती कायमची माहेरी म्हणजे गौतम कर्डकांकडे आली. वर कडी म्हणजे गौतम कर्डक हे जिथे काम करायचे, ती कंपनीही बंद पडली. घरातल्या वरिष्ठांनी आणि नातेवाईकांनी याचे खापर छोट्या दूधपित्या रजनीवर फोडले. रजनीचा पायगुणच वाईट, ‘पांढर्‍या पायाची’ म्हणून घरात असे झाले म्हणत जन्मल्यापासूनच रजनीच्या उपेक्षांना सुरुवात झाली.

 

गरिबीमुळे रजनीने बारावीनंतर शिक्षण सोडले. ‘वाईट पायगुणाची’ या भावनेने मोठ्या होत असलेल्या रजनीला तिच्या भावाच्या जिवलग मित्राने लग्नासाठी विचारले. रजनीला तोपर्यंत स्वत:चे असे काही मतच नव्हते. तिने त्याला “माझ्या भावाला विचार,” असे सांगितले. त्याने रजनीच्या भावाला विचारले. रजनीच्या भावाने त्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तर रजनीचे आयुष्य आणखीनच बंधनग्रस्त झाले. ‘गल्लीतला पोरगा हिला विचारतोच कसा? जो येईल त्या माणसाशी हिचे लग्न करा, नाहीतर जाळून टाका हिला,’ अशी वाक्यं तिच्या वाट्याला येऊ लागली. रजनी घाबरली. त्यातूनच त्याच भावाच्या मित्रासोबत तिने न्यायालयात लग्न केले. मात्र, त्याच दिवशी तिच्या नवर्‍याने बेदम मारहाण करत तिला सुनावले, “तुझ्या भावाने माझी बेइज्जती केली. तुला मी आताच्या आता सोडून देतो. मोठा इज्जतीचा आहे ना तो!” रजनीसाठी हे अनपेक्षित होते.

 

त्यानंतर दुसरा धक्का होता की, मुलगा कामधंदा काहीच करत नव्हता. केवळ तो दिसायला देखणा होता. तो रजनीला हिणवे, “तू कुरूप दिसतेस. तू माझ्या लायकीची नाहीस.” दररोजचा मार, शिव्या आणि ‘घर सोडून जा’ हेच पुराण. दारू पिणे, रजनीवर लैंगिक अत्याचार करणे आणि मिळेल त्या वस्तूने मारझोड करणे, यातच मश्गूल. घर आणि वस्तीसोडून कधीही बाहेर न गेलेल्या रजनीने सगळे मुकाट सहन केले.

 

मात्र, पुढे महिलेच्या छेडछाड प्रकरणात तिच्या नवर्‍याला पोलिसांनी अटक केली. नवर्‍याला सोडवण्यासाठी गेलेल्या रजनीसोबत तेथील एका पोलिसाने अश्लिल वर्तन करण्याचा प्रयत्न केला. अपमान पचवत ती घरी आली. सुटून आलेल्या नवर्‍याने तिला सांगितले, “त्या पोलिसाने माझा मोबाईल घेतला आहे. तू त्याच्या पाया पड, तो मोबाईल देईल.” हे ऐकून पहिल्यांदाच रजनीला वाटले, आपण का जगतोय? आपणच कामधंदा करायचा, आपणच संसार चालवायचा.कशासाठी या नवर्‍यासाठी? लग्नाला चार वर्षे होत आली. पण, रजनीचा दररोजचा मार चुकत नव्हता. तिने तीनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, त्यातून ती अनपेक्षितरीत्या वाचली.

 

पुढे मुलुंडच्या डम्पिंग ग्राऊंड परिसरामध्ये ‘पुकार’ संस्थेद्वारा संशोधन करणार्‍या स्मिता वाघमारेंशी रजनीची ओळख झाली. रजनी त्यांच्या संशोधनगटात सामील झाली आणि तिला लिंगभेद, महिला हक्क कायदा याची ओळख झाली. याच दरम्यान नवर्‍याचे एक नवीन प्रेमप्रकरण सुरू झाले. “मला दुसरे लग्न करायचे आहे. तू मर नाहीतर घर सोड,” असे म्हणत रजनीच्या नवर्‍याने तिचा गळा दाबला. कसेबसे तिने स्वत:ला सोडवले. हे दररोजचेच होऊ लागले. असह्य होऊन रजनीने कौटुंबिक हिंसाचारांतर्गत नवर्‍यावर खटला दाखल केला. तिथे त्याचे समुपदेशन करण्यात आले. तो काही दिवस व्यवस्थित राहत असे आणि ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या.’ आतातर रजनीवर अत्याचाराचे दररोज नवनवीन प्रकार तो शोधे. रजनीला वाटे हे कुठे तरी बदलले पाहिजे.

 

पण, हे सगळे कसे बदलणार? अर्धवट शिक्षण, तुटपुंज्या पगाराची नोकरी. त्यामुळे रजनीने पुढे शिक्षण घ्यायचे ठरवले. तिने निर्मला निकेतन येथे ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’ला प्रवेश घेतला. पण, रजनीने महाविद्यालय सोडावे म्हणून तिच्या नवर्‍याचे अत्याचार आणखीन वाढले. मात्र, ‘समाजसेवा’ या विषयात त्यांनी पदवी संपादन केली. ही पदवीची तीन वर्षे फारच खडतर गेली. एकवेळ अशी आली की, तिला बेघर व्हावे लागले. अनाथाश्रम, खाजगी बेगर्स होममध्ये तिला विनवणी करत राहावे लागले. तिने टाटा इन्सिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये समाज सेवा या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. ‘टिस’तर्फे ‘स्टुडंटस एक्सचेंज प्रोग्राम’मध्ये विद्यार्थ्यांना स्वीडनमध्ये तेथील समाजाच्या अभ्यास करण्यासाठी मुलाखती आणि परीक्षा होती. ‘मला स्वीडनला का जायचे आहे,’ या प्रश्नावर रजनी यांनी लिहिले,‘स्वीडन प्रगत देश आहे. तिथे लिंगभेद असेल, तर तिथे त्यावर काय उपाययोजना करतात, याचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मला स्वीडनला जायचे आहे.’ स्वीडनला महिलांविषयक अभ्यास करण्यासाठी रजनी यांची निवड झाली. शिक्षक, सहाध्यायी, काही मैत्रिणी यांच्या मदतीने त्या स्वीडनला गेल्या. पुढे ‘समाजसेवा’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आज त्या एका नामांकित स्वयंसेवी संस्थेमध्ये ‘डेप्युटी प्रोग्राम मॅनेजर’ आहेत. त्यांची स्वत:चीही स्वयंसेवी संस्था आहे. ज्या वस्तीपातळीवर लिंगभेद निर्मूलन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यावर काम करते. एकटी ‘स्त्री’ म्हणून दुखावल्या गेलेल्या रजनी आज आज त्या परिसराची ‘ताई’ झाल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat