अफगाणिस्तानातील ‘अमंगल’

    दिनांक  13-May-2019   


 


अमेरिकेच्या तालिबानशी शांततेच्या वाटाघाटी सुरू असताना, एका अफगाणी माजी महिला पत्रकाराच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने महिलांच्या सुरक्षिततेचा, त्यांना मिळणार्‍या एकूणच दुय्यम वागणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


अशांतता
, अनागोंदी आणि अनाचाराच्या गर्तेत रुतलेला अफगाणिस्तान. दोन दशकांच्या कडवट तालिबानी राजवटीने या देशाला जागतिक स्तरावर जवळपास २० वर्षं मागेच खेचले. सध्या तालिबानची अफगाणिस्तानात हुकूमत नसली तरी त्यांची दहशत मात्र काही भागांत अजूनही कायम आहे. एकीकडे अमेरिकेच्या तालिबानशी शांततेच्या वाटाघाटी सुरू असताना, एका अफगाणी माजी महिला पत्रकाराच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येने महिलांच्या सुरक्षिततेचा, त्यांना मिळणार्‍या एकूणच दुय्यम वागणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानातील महिलांना स्वनिर्णयाचा कुठलाही अधिकार नव्हता. बुरख्याशिवाय, कुटुंबातील पुरुष सदस्याशिवाय घराबाहेर पडणेही दुरापास्त. शिक्षण, नोेकरी वगैरे म्हणजे तर थेट जहन्नुमचा मार्ग. परंतु, तालिबानच्या पाडावानंतर परिस्थितीत काही अंशी सुधारणा झाली. मुली शिक्षणासाठी घराबाहेर पडू लागल्या. सरकारी कार्यालयांमध्ये नोकरदार म्हणून रुजू झाल्या. पण, हे सगळंही अगदी इस्लामच्या चौकटीत. त्यापैकीच एक महत्त्वाकांक्षी महिला म्हणजे मेना मंगल. पश्तून वृत्तनिवेदिक म्हणून तिची कारकीर्द फार गाजली. त्यानंतर मेनाने ‘शमशाद’ या वृत्तवाहिनीतही वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला. पत्रकारितेबरोबर अफगाणिस्तानातील महिलांचे हक्क आणि मूलभूत अधिकार यासंबंधीही मेना आपली मते बेधडकपणे मांडू लागली. मोर्चे, आंदोलनांमध्येही तिचा सक्रिय सहभाग असायचा. इतकेच नाही, तर अफगाणिस्तानच्या कनिष्ठ सभागृहाच्या सांस्कृतिक सल्लागारपदी मेना कार्यरत होती. पण, ऐन रमझानच्या पवित्र महिन्यात मेना मंगलवर अनोळखी हल्लेखोरांनी गोळीबार करून तिचा आवाज कायमचा बंद केला.

राजधानी काबूलच्या पूर्व भागात शनिवारी लख्ख सूर्यप्रकाशात मेनाची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्या हत्येची जबाबदारी तालिबानने स्वीकारली नसली तरी संशयाची सुई मात्र तालिबानी कट्टरवाद्यांवरच वळते. दुर्देवी बाब म्हणजे, आपल्या जीवाला धोका असल्याचे मेनाने दोनच दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले होते. पण, तरीही सरकारतर्फे मेनाला कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. त्यावरूनही सध्या अफगाणिस्तान सरकारला महिला अधिकार कार्यकर्त्यांनी धारेवर धरले आहे. पण, आता फार उशीर झाला आहे. अफगाणिस्तानने आपली एक धडाडीची महिला पत्रकार, कार्यकर्ती गमावली आहे.

मेनावर ओढवलेले हे काही पहिलेच अमंगल नाही. यापूर्वीही तिचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांना नंतर अटकही झाली. मेनाने सुटकेचा मोकळा श्वासही घेतला. पण, पैसे चारून हे अपहरणकर्ते पोलिसांच्या कैदेतूनही सुखरूप सुटले. धमक्या, अपहरण, सामाजिक बहिष्कार या सगळ्याला न जुमानता ती महिलांच्या अधिकारांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी सदैव लढत राहिली. पण, महिलांची प्रगती डोळ्यात खुपणार्‍या कट्टरपंथीयांनी मेनाचा काटा काढला. खरंतर अशाप्रकारे मूलतत्त्ववाद्यांनी अफगाणिस्तानच्या शेकडो महिलांची कत्तल केली आहे. यामध्ये सरकारी उच्चपदस्थ महिला अधिकारी, महिला पोलीस, शिक्षिका, डॉक्टर, वकील, पत्रकार अशा विविध व्यवसायातील महिलांचा समावेश आहे.

कारण, महिलांसंबंधी काम करणारे कार्यकर्ते, सामाजिक संस्था या तालिबानच्या दृष्टीने पाश्चिमात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्‍या आहेत. महिलांनी पुरुषांची कामे न करता, कुठल्याही क्षेत्रात पुरुषांची बरोबरी करू नये, यासाठी तालिबानने महिलांच्या माध्यमिक शिक्षणावर सरसकट बंदीच घातली आहे. परिणामी, महिलांनी शिक्षणाचे बाळकडू घेऊच नये आणि समानता, सामाजिकता वगैरे मूल्ये त्यांच्या मनात कदापि रुजू नये, हा तालिबानचा अघोरी प्रयत्न. याच प्रयत्नांतून तालिबानने अफगाणिस्तानात देशी-विदेशी पत्रकारांचेही रक्त सांडले. ‘रिपोटर्स विदाऊट बॉर्डर्स’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, २०१८ हे वर्ष अफगाणिस्तानातील पत्रकारांसाठी रक्तरंजित ठरले. कारण, या एका वर्षात तब्बल १५ पत्रकारांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. पण, सरकारी पातळीवर याचा म्हणावा तसा विरोध किंवा कारवाई झाली नाही.

दुसरीकडे अफगाणिस्तानातील महिला अधिकार कार्यकर्त्यांच्या मते, अमेरिका-तालिबान चर्चेमध्ये महिलांच्या अधिकारांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी नाहीच. त्यातच अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य माघारी बोलावल्यास २००१ पूर्वीच्या किंवा त्यापेक्षा भयंकर परिस्थितीचा महिलांना सामना करावा लागू शकतो, याचीही टांगती तलवार आहेच. त्यामुळे मेना मंगलचे हे बलिदान व्यर्थ न जावो, एवढीच अपेक्षा!

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat