‘विशेष’ मुलांसाठीची प्रेरणा

    दिनांक  13-May-2019   
सीबीएसई निकालांमध्ये राजहंस विद्यालय, अंधेरी पश्चिम या शाळेतून ममता नायक या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के गुण मिळवत घरच्यांसह सार्‍यांनाच सुखद धक्का दिला आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी...

 

छिन्नविमनस्कताहा मेंदूशी निगडित असलेला आजार. या आजारात स्पष्टपणे बोलण्याची किंवा व्यक्त होण्याची रुग्णाची क्षमता मुळातच नसते. या आजारात रुग्णाच्या मनात विचार एक असतो आणि कृती दुसरीच घडली जाते. शरीराच्या हालचालींना मेंदूची साथ नसते. त्यामुळे रुग्णाला स्वतंत्रपणे कृती करणे शक्य होत नाही. मेंदूचा पक्षघात जन्मापासूनच दुखणे घेऊन येणार्‍या मुलांचा सर्वसामान्य प्रवासही तसा अवघडच. मात्र, परिस्थितीवर मात करत अनेकांनी आपले कर्तृत्व गाजवून आजारालाही हरवल्याची उदाहरणे आहेत. नुकताच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) निकालांमध्ये राजहंस विद्यालय, अंधेरी (पश्चिम) या शाळेतून ममता नायक या विद्यार्थिनीने ९०.४० टक्के गुण मिळवत घरच्यांसह सार्‍यांनाच सुखद धक्का दिला आहे. या संघर्षाबद्दल शाळेतील शिक्षकांसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव तिच्यावर होत आहे. १७ वर्षीय ममताला दहावीत ५०० पैकी ४५२ गुण मिळाले आहेत. यातील गणिताच्या पेपरमधून तिला सवलत देण्यात आली होती. त्याऐवजी तिची तोंडी परीक्षा घेण्यात आली होती.इतर रुग्णांप्रमाणे तिलाही असाच संघर्ष करावा लागत होता. या सार्‍या गोष्टींवर ममताने नियमित औषधोपचार आणि व्यायामाद्वारे मात करत आपल्या कामगिरीने सार्‍यांनाच अवाक करून सोडले आहे. अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि तिच्यासारख्याच ‘विशेष’ मुलांसाठी तिने आदर्श समोर ठेवला आहे.

 

जन्मतःचसेलेब्रेल पॅल्सीया आजाराने ग्रस्त असलेल्या ममताला कळण्याच्या वयातच मोठ्या आव्हानांना पेलायचे होते. तिची आई रुपाली नायक यांनी तिला जवळच्या शाळेत दाखल करण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, ममताच्या आजाराचे कारण देत या शाळाने त्यांना नकार दिला. ‘विशेष’ मुलांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे कोणत्याही शाळेत शिक्षण घेण्याचा अधिकार असतानाही ममताला तिच्या परिसरातील अनेक शाळांतून त्यांना नकारघंटा ऐकावी लागली होती. अखेर अंधेरीतील ज्या शाळेत तिला प्रवेश मिळाला, त्या शाळेतून तिने ९० टक्के गुण मिळवत शाळेचेही नाव उज्ज्वल केले आणि तिला नाकारणार्‍या त्या सर्व शाळांसमोर तिने एक उदाहरण कायम ठेवले आहे. ममताला लिहिणे शक्य होत नाही. तिला काय लिहायचे ते ममता लेखनिकाला सांगते. पेपर कसा गेला, असे पालकांनी विचारल्यावर ‘मला आता छान वाटतंय...’ इतकीच प्रतिक्रिया तिने पालकांना दिली होती आणि त्यानंतर थेट निकालाद्वारे तिने सार्‍यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ममताला ‘इतिहास’ विषयाची विशेष आवड आहे. पुढे जाऊन शिक्षक व्हायची इच्छा पालकांकडे ती वारंवार बोलून दाखवते.

 

तिचे आई-वडील सांगतात, तिच्या संगोपनाची आणि पालनपोषणाची जिद्द आणि इच्छाशक्ती आम्हाला तिच्याकडून मिळते. दीड वर्षाच्या वयात तिला आकार ओळखता येत होते. दोन वर्षाची असताना तिला सारे रंग परिचित होते. तिसर्‍या वर्षापासून तिला अक्षर आणि अंकांची ओळख होऊ लागली. परिसरातील इतर मुलांना शाळेच्या गणवेशात दप्तर घेऊन जाताना पाहून तिलाही शाळेत जाण्याची इच्छा होत असे. पालकांनाही ममताने शिकावे, असे वाटत होते. सर्वसामान्य मुलांप्रमाणे ममताचे शिक्षण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, हे म्हणण्याइतके सोपे नव्हते, हे त्यांना शाळेत गेल्यावर समजत होते. पाच शाळांनी तिला प्रवेश देण्यास नकार दिला. ममताच्या आकलनशक्तीबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल तिच्या आईने सर्व शाळांमध्ये पोटतिडकीने समजावून सांगितले. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही.

‘आमच्याकडील जागा भरल्या आहेत, तुम्ही तिला पुन्हा बालवाडीत बसवा,’ असे कारण त्यावेळी देण्यात आले. परंतु, ममताने शिशुवर्गातील शिक्षण दोन वर्षात पूर्ण केले होते. त्यामुळे ममता इतरांहून अधिक सक्षमपणे शिकेल, अभ्यासक्रम पूर्ण करेल आणि शाळेत इतका वेळ थांबू शकेल, अशी खात्री तिच्या पालकांनाही होती. केवळ तिला थोड्याशा मदतीची गरज होती. ती करायला तिचे पालक सक्षम होते. ममतासह तिचे पालक अंधेरी पश्चिम येथील राजहंस विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना भेटल्यावर शाळेतील प्रवेशाचा प्रश्न मिटला. पहिलीतील नवा अभ्यासक्रम, नवीन शाळा, नवे मित्र यात ममताने स्वतःला लगेचच सावरून घेतले. अभ्यासात इतर वर्गमित्रांनी तिला कायम मदत केली. इतर सर्वसाधारण मुलांप्रमाणेच ती अभ्यास करत होती. त्यामुळे तिला वेगळे असल्याची जाणीवही कोणाच्या वागण्यातून झाली नाही. ममताच्या मदतीसाठी आईला शाळेतील ग्रंथालय, संगणक कक्ष, प्रयोगशाळा आदी ठिकाणी प्रवेश दिला जाई. काहीवेळा वर्गात शिकवताना आलेल्या अडचणी ममताची आई शाळा सुटल्यावर समजून घेत असे. त्यानंतर ममताला ती अडचण सावकाशपणे सोडवून देत असे.

 

ममताला सोशल मीडिया वापरण्याची परवानगी पालकांनी दिली नाही. मात्र, तिला वाचनाची आवड आहे. ‘एनिड ब्लायटन’ या तिच्या आवडत्या लेखिका आहेत. याशिवाय संगीत ऐकण्याचीही तिला विशेष आवड आहे. ती दिवसभर विविध प्रकारचे संगीत ऐकते. पुढील शिक्षणासाठी तिने मानसशास्त्र, इतिहास, भूगोल आदी विषयांचे पर्याय समोर ठेवले आहेत. आपल्या कर्तृत्वाने तिच्यासारख्या हजारो ‘विशेष’ मुलांना तिने आदर्श निर्माण केला आहेच. मात्र, समाजालाही ‘विशेष’ मुलांकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat