महिलांच्या आयपीएलवर सुपरनोव्हाची बाजी

    दिनांक  12-May-2019


 


जयपूर : सुपरनोव्हा संघाने महिलांच्या आयपीएलस्पर्धेचे विजेतेपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत सुपरनोव्हा संघाने व्हेलोसिटी संघावर चार विकेट्स राखून विजय मिळवत २०१९च्या महिला आयपीएलच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. हरमनप्रीत कौरने सुपरनोव्हा संघाने प्रतिनिधित्व केले तर व्हेलोसिटी संघाचे प्रतिनिधित्व मिताली राजकडे सोपवण्यात आले होते.

 

व्हेलोसिटी संघाने प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हा संघासमोर १२१ धावांचे लक्ष ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना सुपरनोव्हाचा दमछाक झाला. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अर्धशतक्याच्या जोरावर सुपरनोव्हाने अखेरच्या चेंडूवर विजयावर शिक्कामोर्तब केले. हरमनप्रीतने ३७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या. याच जोरावर तिला 'सामनावीर' हा पुरस्कार देण्यात आला. जमाइमा रॉडिग्र्स मालिकावीर घोषित करण्यात आले. तिने तीन सामन्यात १२३ धावा केल्या.

 

तत्पूर्वी, सुपरनोव्हा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. व्हेलोसिटीची सुरुवात अतिशय खराब झाली होती. ३७ धावांवर त्यांनी आपले पाच खेळाडू गमावले होते. त्यानंतर सुषमा वर्माच्या ४० व अमेलिया करच्या ३६ धावांच्या जोरावर व्हेलोसिटीने सुपरनोव्हासमोर १२१ धावांचे लक्ष ठेवले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat