तारापूर एमआयडीसीत वायुगळती

    दिनांक  12-May-2019पालघर : बोईसरच्या तारापूर एमआयडीसीत एका रासायनिक कारखान्यात झालेल्या वायुगळतीमुळे तीनजणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांच्यावर उपचार करणाऱ्यांना डॉक्टरनांही वायुगळतीची बाधा झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पोलिसांनी सर्व कारख्यान्यांना खाली करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेत एक व्यवस्थापक, एक ऑपरेटर व एक हेल्परचा मृत्यू झाला आहे.

 

बोईसर एमआयडीसीत प्लॉट नं. एन ६० मधील स्क्वेअर केमिकल या रासायनिक कारखान्यात रविवारी रासायनिक प्रक्रियेची बाधा झाली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारी ३ वाजून ४५ वाजताच्या सुमारास कारखान्यातील ‘आरएम २’ या साठवणीच्या टँकमध्ये सोलवंट भरण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक टँक तुटल्याने रसायन बाहेर पडून विषारी धूर आणि विषारी वायूची बाधा कर्मचाऱ्यांना झाली.

 

यात कारखान्याचे व्यवस्थापक प्रभाकर खडसे, ऑपरेटर दत्तात्रय घुले व हेल्पर रघुनाथ गोराई या तिघांना विषारी वायूची बाधा झाली. यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेवेळी कारखान्यात चार कामगार कार्यरत होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, १० ते १५ दिवसांत बोईसर एमआयडीसीतील विविध कारखान्यांमध्ये विविध दुर्घटनांत विषारी वायुगळतीमुळे अनेकांना बाधा झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat