लोकसभेनंतर राज्यात पोटनिवडणुकांची रणधुमाळी

    दिनांक  12-May-2019मुंबई : मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांमधील रिक्त झालेल्या २० नगरसेवकांच्या जागेवर लवकरच पोटनिवडणुका होणार आहेत. याबाबतची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच जारी केली आहे. आयोगाने पोटनिवडणुकीची अधिसूचना काढली असली तरी या निवडणुका कधी होणार याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, १७ मे रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

 

बृहन्मुंबई, उल्हासनगर, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, चंद्रपूर आणि कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांमधील २० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यानुसार पुणे महानगरपालिकेच्या ४२अ, ४२ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), २४ब आणि १अ, उल्हासनगर महानगरपालिकेच्या १ब आणि ५अ, नाशिक महानगरपालिकेच्या १० ड, परभणी महानगरपालिकेच्या ११अ आणि ३ड, मालेगाव महानगरपालिकेच्या ६क, चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६ब आणि १३ब, कोल्हापूर महानगरपालिकेच्या २८ आणि ५५, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या २६, नवी मुंबई महानगरपालिकेच्या २९ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ३२, २८, ७६, ८१ या प्रभागामध्ये पोटनिवडणूक होणार आहे.

 

नव्याने स्थापित चंदगड (जि. कोल्हापूर) नगरपंचायत आणि बुटीबोरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक; तसेच २२ विविध नगरपरिषदा व नगरपंचायतीतील २४ सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी आणि मानवत (जि. परभणी) नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील विविध ७ जिल्हा परिषदांमधील ९, तर १२ पंचायत समित्यांमधील १६ रिक्तपदांसाठीही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat