यंदाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत हिवाळी नागपूरला

    दिनांक  11-May-2019मुंबई : पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेऊन नवा पायंडा पाडणाऱ्या सरकारने यंदाचे पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागपुरातील गेल्या पावसाळी अधिवेशनात पावसाचा दणका बसला होता. त्यामुळेच सरकारने यावेळी १७ जूनपासून मुंबईत अधिवेशन भरविण्याचा निर्णय घेतला असून राज्यपालांनी तशी अधिसूचनाही काढली आहे. सालाबादप्रमाणे यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रहाने पावसाळी अधिवेशन नागपूरला घेतले होते. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी असतो, निधीही संपलेला असतो. त्यामुळे वैदर्भीयांना न्याय देता येत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला होता. विरोधकांनी मात्र मोर्चे, आंदोलनाला सरकार घाबरत असल्याचे म्हटले होते. मुंबईतील मनोरा आमदार निवास पाडणार असल्याने आमदारांची गैरसोय होईल असाही तर्क लावला जात होता. गेल्यावर्षी चार जुलैपासून अधिवेशनास प्रारंभ झाला होता. मात्र, पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने नागपुरात धुमाकूळ घातला. विधानसभेच्या इमारतीत पाणी घुसले. वीज यंत्रणा असलेल्या खोलीत पाणी घुसले. त्यामुळे वीज पुरवठा खंडित करावा लागला. या सर्व गोंधळामुळे संपूर्ण दिवसाचे कामकाज बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. त्यामुळे सरकार यावेळी कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समजते. त्यामुळेच यंदा पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत घेण्यात येणार आहे.

 

नागपूरमध्ये आतापर्यंत ५५ अधिवेशने

 

नागपूर करारानुसार दरवर्षी विधानमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घेणे आवश्यईक आहे. आतापर्यंत ५५ अधिवेशने नागपूरमध्ये पार पडली आहेत. राज्याच्या निर्मितीनंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९६१ मध्ये पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडले होते. १९६० पासून तीन वेळा पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेण्यात आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat