'आर्टिकल १५' चित्रपटाने लंडनमधील भारतीय चित्रपट महोत्सवाचे अनावरण

11 May 2019 17:17:36


 

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'आर्टिकल १५' या चित्रपटाला लंडनमधील भारतीय चित्रपट महोत्सवाचे अनावरण करण्याचा मान मिळाला आहे. विकी डोनर, दम लगाके हैशा, बढाई हो, अंधाधुन यासारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केल्यानंतर आणखी एका वेगळ्या रूपात आयुषमान खुराना आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तो या चित्रपटात एका पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका साकारत असून एका छोट्याशा गावात त्याची नियुक्ती झाली आहे आणि त्या गावातील ३ बेपत्ता मुलींची तपासणी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आता हे प्रकरण कसे सोडवतो हे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

 

चित्रपट महोत्सवाची सांगता फोटोग्राफ या नवाझुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटाने होणार आहे. फोटोग्राफ या चित्रपटाला समीक्षकांसहित बऱ्याच नामांकित व्यक्तींची प्रशंसा मिळाली आहे. त्याचबरोबर १९ व्या न्यूयॉर्क चित्रपट महोत्सवात देखील विशेष स्क्रीनिंगचा मान मिळाला आहे.

परप्रांतात भारतीय चित्रपट महोत्सवाला एवढा चांगला प्रतिसाद मिळणे ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असतानाच भारतीय चित्रपटांना मिळालेले हे मनाचे पुरस्कार म्हणजे सोन्याहून पिवळे असेच म्हणावे लागेल. हा लंडनमधील भारतीय चित्रपट महोत्सव येत्या २० जून ते ८ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0