दुष्काळीग्रस्त भागासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

    दिनांक  10-May-2019पाण्याच्या टँकरसाठी २०१८ची लोकसंख्या लक्षात घेतली जाणार


मुंबई : दुष्काळी भागात कोणतीही अडचण येणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत, असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीजच्या माध्यमातून उस्मानाबाद, बीड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अभियंते यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते.

 

पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ची लोकसंख्या लक्षात न घेता २०१८ची लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याचा पाणीपुरवठा करावा. जनावरांसाठीही याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे व दुष्काळग्रस्त भागातील प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

 

दुसरीकडे, सर्व जिल्ह्यांतील दुष्काळाचा आढावा संबंधित पालकमंत्र्यांनी घेतला असून दुष्काळी भागातील मागणी व सूचनेनुसार दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या निविदा प्रक्रियांच्या कामांना १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat