शीखविरोधी दंगली घडवण्यात राजीव गांधी यांचा हात?

10 May 2019 15:39:07



ज्येष्ठ वकील वकील हरविंदर सिंग फुल्का यांचा खळबळजनक खुलासा


नवी दिल्ली : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात उसळलेल्या शीखविरोधी दंगली विषयी ज्येष्ठ वकील वकील हरविंदर सिंग फुल्का यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. या दंगलीनंतर शिखांची कत्तल करण्याचे आदेश थेट पंतप्रधान कार्यालयातूनच देण्यात आल्याचा दावा फुलका यांनी केला. याबाबत आपल्याकडे अनेक ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले.

 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना फुल्का म्हणाले, १९८४ मध्ये भारतात शीखविरोधी वातावरण असताना शीख नागरिक दिसतील तिथेच त्यांना ठार मारण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयातून देण्यात आले होते. तसेच या काळात लष्कराला हस्तक्षेप करू न देण्याचे आदेशही देण्यात आल्याचा दावा फुलका यांनी केला. हरविंदर सिंग फुल्का हे मागील ३५ वर्षांपासून शीख विरोधी आरोपींच्या विरुद्ध लढा देत आहेत. शीख दंगलीवर आधारित When A Tree Shook Delhi या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे बोलले जात आहे.

 

राजीव गांधींचा हात

 

शीख विरोधी दंगली या केंद्र सरकारच्या पुढाकाराने झाल्या असल्याचा सीबीआयने अहवाल सादर केला होता. यात राजीव गांधी यांनी या दंगली भडकावण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना पत्रकारांनी विचारले असता, "जब एक बड़ा पेड़ गिरता है, तब पृथ्वी भी हिलती है" असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

 

१९८४ची शीख विरोधी दंगल का भडकली?

 

३१ ऑक्टोबर १९८४ साली इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या झाली. हा अंगरक्षक शीख होता म्हणून दिल्ली आणि देशाच्या काही भागात दुसऱ्याच दिवशी शिखांच्या विरोधात दंगली भडकल्या. इंदिरा गांधींच्या हत्येच्या प्रत्युत्तरात या सर्व दंगली झाल्या. या दंगलींमध्ये ३००० हून अधिक जणांचे मृत्यू झाले होते तर अनेक जण बेघर झाले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0