मायावतींची संघ अभिव्यक्ती

    दिनांक  10-May-2019   रा. स्व. संघांचे तप खरेच महान म्हणायला हवे. कारण, संघाचे नाव घेतल्याखेरीज मायावतींसारख्या कित्येकांचे पोटपाणी भरत नाही. तसेही, रा. स्व. संघासारख्या तत्त्वनिष्ठ संघटनांना बळे बळे खेचले की, मायावतींसारख्या जातीयवाद्यांना धन्य धन्य वाटते. मायावतींनी पुन्हा एकदा रा. स्व. संघाचे नाव घेत स्वतःला धन्य करून घेतले आहे. त्या म्हणाल्या, “मोदी जर मागासवर्गीय असते, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना पंतप्रधान केले नसते.” देशातले संवैधानिक पद रा. स्व. संघ ठरवते, असे मायावतींना वाटते. यावर काय बोलावे? मायावतींचे सामान्य ज्ञान मात्र कच्चे नव्हे तर शून्य आहे, हे मात्र नक्की. कारण मोदींना पंतप्रधान बनवायला रा. स्व. संघ काही राजकीय संघटना नाही. दुसरे असे की, समजा रा. स्व. संघ जातीयतेतून नाही, तर देशहित आणि समाजकल्याणाच्या दृष्टिकोनातूनच निर्णय घेत असतो. बरं, समजा मायावतींच्या विधानानुसार मोदी मागासवर्गीय नाहीत म्हणजे उच्चवर्णीय आहेत म्हणून रा. स्व. संघाने त्यांना पंतप्रधान बनवले, असे समजावे, तर मग राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल मायावतींचे काय म्हणणे आहे? अर्थात, देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांनाही जातीपातीचे कुंपण लावणाऱ्या मायावती याच खऱ्या जातीयवादी आहेत. पंतप्रधानांची भूतकाळातली कारकीर्द, व्यक्तिमत्त्व, लोकप्रियता या सगळ्यापलीकडे मायावतींना दिसले काय तर पंतप्रधान मोदींची जात. समज-गैरसमजाची पण काही सीमा असते आणि किती बरळावे, यालाही काही मर्यादा असते. अर्थात सीमा म्हणा मर्यादा म्हणा यांचे आणि बहनजी मायावतींचे तसेही काही घेणेदेणे नाहीच. स्वतःचे पुतळे मोक्याच्या जागी बांधणे आणि ‘तिलक-तराजू-तलवार’ वगैरे वगैरे करत जातीयतेचे विष पसरवणे, हीच या बहनजींची आयुष्यभराची कमाई. बहनजी म्हटल्या की, ‘मै पिछडी तू अगला, मै शोषित तू सवर्ण’ वगैरे वगैरे मर्यादित शब्दांचा वापर अमर्याद होणार, हे नक्कीच. कारण, रा. स्व. संघ संविधान मानणारा आहे. त्यामुळे मायावतींचे संघाबाबतचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य संघ नक्कीच मानत असेल. तसेच मायावती काहीही म्हणाल्या तरी रा. स्व. संघाला याचे काही सोयरसुतकही नसेल. कारण, मत्सरग्रस्त बोलून तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा समरसतापूर्ण वागून देश घडवण्यामध्ये संघ दक्ष आहे.

 

ममता-माया दोघी बहिणी...

 

ममता आणि माया... दोन्ही शब्दांचा अर्थ मानवी जीवनाला संजीवनी देणारा. पण, भारतीय राजकारणात ममता-मायांचे अस्तित्व पाहिले की जाणवते की, उगाच भगवद्गीतेमध्ये माया-ममता किंवा तत्सम प्रकारांना त्यागण्याचे सांगितले नसेल. उत्तर प्रदेशमध्ये माया आणि प. बंगालमध्ये ममता. पूर्वी कुंभमेळ्यात हरवणे बिछडणे वगैरे प्रकरणं भरपूर व्हायची. ममता आणि माया या दोघींच्या वृत्तीसाधर्म्यामुळे वाटते की, या दोघी बहिणी कुंभमेळ्यात तर हरवल्या नसाव्यात ना? ममता जे बंगालीमिश्रीत हिंदीत बोलतात, तसेच काहीसे मायावती आपल्या उत्तर प्रदेशच्या हिंदीमधून बोलत असतात. मायावतींना मोदींचे वावडे तर ममतांनाही मोदींबद्दल अपार द्वेष. मायावतींनी आपली मागासवर्गीयची अस्मिता जपत राजकारण केले, तर ममतांनी राजकीय स्वार्थासाठी बंगाली अस्मिता जपण्याचे नाटक केले. मायावतींनाही तसा हिंदू धर्माबद्दल फार काही आपलेपणा नाही आणि याबाबत तर ममतांकडे आनंदीआनंदच आहे. थोडक्यात, ममता आणि मायावती या दोघी बहिणी आहेत. यावर काही नतद्रष्ट लोक म्हणाले, “नाही काही, त्या बहिणी नाहीत तर दोघी भाऊ आहेत. कारण, त्या राहू-केतूसारख्या आहेत. सत्तेच्या साठमारीमध्ये स्थिर, लोकप्रिय आणि समाजकेंद्री राष्ट्रनिष्ठ सरकार असू नये यासाठी मनातल्या मनात चरफडणाऱ्या त्या राहू केतू आहेत.” असो, ममता आणि माया एकमेकांच्या बहिणी असोत की भाऊ. पण, या दोघींचेही अज्ञान अफलातून आहे. दोघांचेही राजकीय स्वार्थ आणि त्यासाठी पोसलेला धार्मिक जातीयवाद एकसारखाच आहे. तसेच दोघींचीही आवड एकच आहे. या दोघींनाही रा. स्व. संघ खूप आवडतो. रा. स्व. संघातल्या लोकांनी त्यांचे नाव घेवो न घेवो, या दोघी मात्र कायम संघाबाबतच बोलत असतात. यावर कडी म्हणजे ममता आणि मायावती या दोघींची इच्छाही एकच आहे. हो ना, या दोघींनाही पंतप्रधान बनायचे आहे. गंमत म्हणजे, या दोघींच्या इच्छेची परिणीतीही सारखीच होणार आहे. या दोघींनाही निवडणुकीनंतर सत्ताकेंद्री राहण्यासाठी किमान त्या शर्यतीत कुठेतरी लुडबुडण्यासाठी मारामारी करावी लागणार आहे. ममता आणि मायामध्ये साम्य साम्य म्हणजे किती साम्य असावे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat