उद्योजकतेचे बीज विद्यार्थीदशेतच...

    दिनांक  10-May-2019   विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच अर्थशास्त्राची आणि ‘उद्योजकता’ या विषयाची ओळख करून न दिल्याने केवळ ‘नोकरी’ हेच ध्येय त्यांच्यासमोर राहते. या पारंपरिक विचारांना छेद देत नितीन पोतदार (कॉर्पोरेटलॉयर) आणि अजिंक्य पोतदार (कॉर्पोरेटलॉयर आणि सीए) यांनी स्थापन केलेली ’मॅक्सप्लोर’ ही संस्था विद्यार्थ्यांना त्यांच्यातील उद्योजक गवसण्यासाठी मदत करत आहे. उद्योजक होण्याचे स्वप्न मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी आणि त्यांना कक्षेबाहेर विचार करण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या या 'मॅक्सप्लोर'विषयी...

 

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या अहवालानुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारतात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. या काळात बेरोजगारीचा दर हा ७.८ टक्के इतका होता.१९७२-७३ नंतर बेरोजगारीचे हे सर्वाधिक प्रमाण मानले जाते. त्यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, हा दर आता ७.६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’च्या (सीएमआयई) सर्वेक्षणातून ही माहिती नुकतीच उघड झाली आहे. मात्र, भारतात नव्याने उभ्या राहिलेल्या नव्या उद्योजकांच्या कंपन्यांची उभारणी आणि विस्तारही याच काळात झालेला दिसून येतो. ‘स्विगी,’ ‘झोमॅटो,’ ‘ओला,’ ‘उबर,’ ‘कार्स २४,’ ‘झुम कार,’ ‘नो ब्रोकर,’ ‘उबर इट्स’ आदी त्यापैकी प्रसिद्ध कंपन्या... त्यांच्या निर्मितीमागे प्रत्येकाची अशी संघर्षमय कहाणी असेलही. मात्र, अशा प्रत्येक उद्योगामागे एक नवीन संकल्पना आणि नवीन विचार दडलेला दिसतो. नेमका हाच अभाव शिक्षण व्यवस्थेत असल्याने विद्यार्थी हा ‘नोकरी देणारा’ न होता ‘नोकरी मागणारा’ होत जातो.


एमबीए, इंजिनिअर्स, पदव्युत्तर, पदवीधारक आदी नोकरीच्या शोधात स्वतःचाआत्मविश्वास गमावून बसतात आणि त्याहून कमी शिकलेल्या व्यक्ती किरकोळ व्यवसाय का होईना, तो उभारून त्याचा पसारा वाढवण्यासाठी धडपडतात. एमबीएच्या दुसर्‍या वर्षात ‘उद्योजकता विकास’ किंवा ‘उद्योजकता व्यवस्थापन’ असे पुढील अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध असतात. मात्र, त्याकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल तसा कमीच. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस दूरच, मात्र तसा विचार करण्याचीही तयारी एमबीएच्या विद्यार्थ्यांची दिसून येत नाही. मात्र, केंद्र सरकारतर्फे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांसाठी राबवल्या जाणार्‍या योजनांनंतर काहीशी परिस्थिती बदललेली दिसते. या समस्यांवर मात करण्यासाठी प्रसिद्ध कंपनी कायदेतज्ज्ञ नितीन पोतदार आणि त्यांचे पुत्र अजिंक्य पोतदार यांनी ‘मॅक्सप्लोर बिल्डिंग’ (ईआय) - ‘इंटरप्रेन्युर्शिप इंटेलिजन्स’ या पुस्तकाबाहेरील विश्व विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या साहाय्याने उलगडवून सांगणार्‍या संस्थेची निर्मिती केली. या संस्थेतर्फे इतरांप्रमाणे केवळ उद्योग उभा करणे आणि चालवणे याचे धडे न देता, नव्या उद्योगांसाठीची विचारसरणी मुलांमध्ये निर्माण करण्याचे काम ’मॅक्सप्लोर’ करत आहे.

व्यवसाय-उद्योग म्हणजे साधारणतः पाहायला गेल्यास त्यासंदर्भातील कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी याचा विचार आणि तो व्यवसाय विस्तार करण्यासाठी केलेले प्रयत्न हा एक भाग. मात्र, विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय करण्याबद्दलचा विचार बिंबवणे किंवा तसा कक्षेच्या बाहेर जाऊन त्यांना तसा विचार करायला लावणे, हे काम ’मॅक्सप्लोर’ करत आहे. ‘मॅक्सप्लोर’चे संस्थापक नितीन पोतदार यांच्या मते, “आमचा अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण शाळा या विद्यार्थ्यांच्या संकल्पनेवर काम पाहतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या तुलनेत शाळेतील विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती अधिक सक्षम असते.” विद्यार्थ्यांना त्यांच्याच भावविश्वात विचार करायला लावून त्यांच्याकडून व्यवसायाच्या संकल्पना तयार करून घेणे, पुढील आव्हाने व संधी ओळखून त्यावर काम करणे, असा अभ्यासक्रम ‘ई-लर्निंग’द्वारे विद्यार्थ्यांना शिकवला जातो.

 

‘उद्योजकता’ म्हणजे नेमके काय?

उद्योजकता (Entrepreneurship) म्हणजे केवळ व्यवसायाच्या संकल्पना मांडणे, त्यावर काम करणे आणि त्याचा विस्तार करणे इतकाच नव्हे, तर जगावेगळा विचार करून आपले उत्पादन जगातील सर्वश्रेष्ठ उत्पादन बनवणे हा होय. काही उदाहरणांचा उल्लेख केल्यास ‘वॉल्ट डिस्ने’ यांचा उल्लेख करता येईल. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी ’मिकीमाऊस’ हे लोकप्रिय कार्टून जगभरात पोहोचवले आणि जगभरातील मुलांच्या मनावर त्या कार्टूनने अधिराज्य गाजवले. त्यांच्या या योगदानाला २२ ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. इतरांप्रमाणे त्यांनीही पाहिलेल्या उंदरावर आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ’मिकीमाऊस’ हे पात्र कल्पित केले. गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणार्‍या न्यूटनची सफरचंदाची गोष्ट सार्‍यांना माहीतच आहे. त्यापूर्वीही सफरचंद जमिनीवर पडत होतेच. मात्र, न्यूटनच्या कल्पनाशक्तीने गुरुत्वाकर्षणाचा शोध जगासमोर आला. याच सफरचंदाकडे स्टीव्ह जॉब्स यांनी वेगळ्या पद्धतीने पाहिले आणि जगातील सर्वात मोठी कंपनी उभी राहिली. 

 
 

’मॅक्सप्लोर’चे कार्य

शाळेतील अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांच्या अर्थशास्त्र आणि इतर कौशल्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम ‘मॅक्सप्लोर’तर्फे केले जाते. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरीक्त छंद, आवडीनिवडी आणि इतर कौशल्याच्या कामांची तोंडओळख शाळेतील दहा वर्षांत क्वचितच होताना दिसते. विद्यार्थ्यांना एखादे काम शिकवणे तसे कमीपणाचे असल्याची मानसिकता आजही आहे. मात्र, त्यातूनच विद्यार्थ्यांच्या पुढील दिशा मिळण्याचीही दाट शक्यता असू शकते. ‘मॅक्सप्लोर’च्या पहिल्या कार्यशाळेच्या निमित्तानेही असाच प्रयोग सुरुवातीला घेण्यात आला होता. सुरुवातीला मुंबई आणि इतर परिसरातील शाळांमध्ये घेतलेल्या कार्यशाळेनंतर ‘मॅक्सप्लोर’ने या क्षेत्राचा विस्तार जगभर करण्याचा विचार केला. मुंबईतील एकूण ३२ शाळांतील विद्यार्थ्यांना उद्योगविषयक प्रकल्प तयार करून आणण्यास सांगितले होते. त्यासाठी मुलांना गटांनुसार जबाबदारी दिली होती. आठवडाभरानंतर विद्यार्थ्यांच्या संकल्पनांनी पोतदार पितापुत्र भारावून गेले होते. कोणाला फॅशन डिझायनिंग, कोणाला अंतराळवीर, तर कोणाला आणखी काही होण्याची इच्छा होती. मात्र, ही गोष्ट त्यांच्या पालकांना आजवर ठाऊक नव्हती, पालकांनीही मुलांच्या इच्छेला पाठिंबा दर्शवला आणि ‘मॅक्सप्लोर’चे अभिनंदन केले. एका विद्यार्थ्याने बुटांबद्दलची संकल्पना त्यांना दाखवली होती. बुटांचा सोल (तळाचा भाग) बदलून एकच बूट विविध ठिकाणी कसा वापरता येईल, याची संकल्पना मांडून दाखवली. या कार्यशाळेनंतर पोतदार यांचा दावा खरा ठरला. मुलांनी त्यांच्या दृष्टीने बुद्धीला चालना दिली आणि त्यांना व्यवसायाभिमुख विचार करायला चालना मिळाली.
 

 

’मॅक्सप्लोर’ आणि उद्योजगता

व्यवसायाने कंपनी कायदेतज्ज्ञ असलेल्या नितीन पोतदार यांना औद्योगिक क्षेत्रातला ३० वर्षांचा गाढा अनुभव आहे. त्या काळातील उदात्तीकरण, जागतिकीकरण आणि तत्कालीन सरकारच्या विविध अर्थविषयक योजनांचा जवळून अभ्यास करणार्‍यांपैकी एक म्हणून नितीन पोतदार यांची ओळख आहे. २०१३ सालापासून उद्योजक म्हणून उभे राहण्यासाठी आणि नवनवीन स्टार्टअप्स विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून उभे राहावेत यासाठी पोतदार यांनी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचे कारण बर्‍याचशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कल हा नोकरी करण्यावर असतो आणि तो आजही कायम आहे. त्यांना त्यांच्या बालपणात तसा विचार करण्यासाठीची सकारात्मक परिस्थिती तयारच झालेली नसते. नवीन व्यवसाय करण्याचा विचार करणारेही तसे कमीच. 'मला ९० टक्के गुण शालांत परीक्षेत मिळाले की, अभियांत्रिकी किंवा अन्य क्षेत्रातील उच्च शिक्षण आणि त्यानंतर चांगली नोकरी,' अशीच विचारसरणी अजूनही सर्वसामान्य विद्यार्थ्यांची आहे. मात्र, तुम्हाला ‘नोकरी मागणारा’ बनण्यापेक्षा ‘नोकरी करणारा’ व्हायचे असेल, तर त्यासाठी सुरुवातीपासूनच तशाप्रकारच्या शिक्षणाची गरज असते. त्यासाठी ’मॅक्सप्लोर’ने २०१५ साली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. आत्मनिरीक्षण, कल्पना आणि अंमलबजावणी (Introspect, Ideate , Implement - ३ I's ) ही संकल्पना मांडली. त्यानंतर या संकल्पनांच्या आधारे ‘मॅनेजमेंट’च्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसांचा अभ्यासक्रम तयार केला. मात्र, पोतदार यांना त्याचे समाधानकारक निकाल मिळाले नाहीत. त्यामुळे एक प्रयोग करण्याचा विचार त्यांनी केला. त्यांनी राज्यभरातील मुंबई ते फलटण या ठिकाणच्या १३ शाळांची निवड केली. त्यांना ४५ मिनिटांचे व्याख्यान दिले. यामध्ये उद्योजकता म्हणजे काय? उद्योग उभारणीसाठीच्या आवश्यक गोष्टी, वेगळ्या संकल्पना मांडण्याबद्दलचे उपक्रम त्यांना देण्यात आले. व्यवसाय आणि उद्योजकता या विषयांवर प्रकल्प तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आवडीविषयक प्रकल्प तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले. ‘भविष्यात मला कशात करिअर करता येईल, यापेक्षा मी नेमके काय करणार आहे,’ याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन तयार झाला होता. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघटन कौशल्य, सर्जनशीलता, व्यक्तिमत्त्व विकास आदी गुणांना चालना मिळाली. या उपक्रमानंतर ’मॅक्सप्लोर’ने या विषयात आणखी शिरण्याचा निर्णय घेतला आणि ’कलर्ड ग्लास थेअरी’ची निर्मिती करण्यात आली.कलर्ड ग्लास थेअरी’ म्हणजे नेमके काय?

‘कलर्ड’ म्हणजे रंगीबेरंगी आणि ‘ग्लास’ म्हणजे चश्मा! अर्थात, उद्योजक म्हणून जगाकडे पाहतानाचा वेगळा दृष्टिकोन या सिद्धांतामधून मांडण्यात आला आहे. हा सिद्धांत कॉर्पोरेटलॉयर आणि सीए असलेल्या अजिंक्य पोतदार यांनी केलेल्या दोन वर्षे संशोधनातून मांडला आहे. उद्योजक बनणे आणि त्यादृष्टीने विचार करणे यासाठी जगभरात असा वेगळा विशेष अभ्यासक्रम नाही. उद्योजकता म्हणजे समोर असलेल्या प्रश्नांची उकल करून उपाय शोधणे होय. यासाठीची असलेली एक प्रक्रिया म्हणजेच ‘कलर्ड ग्लास थेअरी’ होय.
 

 

अजिंक्य यांनी तयार केलेल्या ‘कलर्ड ग्लास थेअरी’द्वारे विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी नेमका आवश्यक असा अभ्यासक्रम मांडला आहे. सीए, कॉर्पोरेट लॉयर आणि 'इएनव्हाय' या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अजिंक्य पोतदार यांनी दोन वर्षांच्या संशोधनाच्या मेहनतीनंतर विद्यार्थ्यांसमोर ही थेअरी मांडली आहे. 'कलर्ड ग्लासेस थेअरी' विद्यार्थ्यांना कॅम्प्स (कार्यशाळा), क्लब्स (विस्तृत अभ्यासक्रम) शिकवला जातो. कल्पनेपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया, त्यातील चुका, आव्हानांचा शोध, सर्जनशीलता आणि अंतर्गत संकल्पना ('process of ideation' via problem identification, creativity and lateral thinking) याचा अंतर्भाव करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेत उत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांना भरघोस पारितोषिके आणि पाच दिवसांची अभ्यासिका सहल मोफत दिली जाते. त्याला ‘युरेका ज्युनिअर १८’ (EUREKA JUNIOR 18) असे म्हणतात. 

 

काय आहेयुरेका ज्युनिअर 18’?

विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग आणि प्रतिसाद मिळाल्यानंतर आयआयटी मुंबईने ‘मॅक्सप्लोर’कडे अशाप्रकारच्या स्पर्धेची मागणी केली होती. मात्र, पोतदार यांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबद्दल सुचवले. हे प्रशिक्षण ‘मॅक्सप्लोर’तर्फे देण्यात आले. सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच्या या स्पर्धेतून मुलांमध्ये दडलेला एक उद्योजक समोर आणणे हे यामागचे ध्येय होते. ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ पर्यंत आयआयटी मुंबई येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. प्रत्येकी साठ विद्यार्थ्यांच्या एका वर्गाला ९० मिनिटांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनाही चार जणांच्या गटात या कार्यशाळेत सहभागी व्हायचे होते. प्रत्येक गटाला त्यांची उद्योगाची संकल्पना मांडण्यासाठी पाच मिनिटे देण्यात आली होती, त्यानंतर पुढील पाच मिनिटे त्यावर प्रश्नोत्तरे विचारली जात होती. या स्पर्धेची पारितोषिके ५० हजार इतकी होती. १ लाखांचा अभ्यासक्रम आणि ई-समिट २०१९ साठी विनामूल्य प्रवेश असे स्वरूप होते. या कार्यशाळेद्वारे त्यांना ‘एक्सप्लोर इंटरप्रेन्युर्शिप इंटेलिजन्स’ समजावणे, विद्यार्थ्यांना स्वतंत्र उद्योजक म्हणून विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे हे या कार्यशाळेचे प्रमुख ध्येय होते.
 

 

प्रत्येक मुलामधील ‘उद्योजक’ ओळखणे गरजेचे

प्रत्येकाची विचार करण्याची वेगवेगळी कक्षा आणि विद्यार्थ्यांचे आपापले भावविश्व आहे. ‘मॅक्सप्लोर’ने तयार केलेल्या या नव्या संकल्पनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उद्योजक म्हणून विचार करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. त्यांना मिळालेल्या संकल्पनेच्या आधारे विद्यार्थी आपल्या कल्पना आत्मविश्वासाने जगासमोर मांडू शकत आहे. शाळेत असतानाच पुढील वाटचाल, ध्येय ठरवण्याचा आत्मविश्वास त्यांना सापडू लागला आहे. मात्र, नितीन पोतदार आणि अजिंक्य पोतदार यांनी उद्योजकता-‘इंटरप्रेन्युर्शिप इंटेलिजन्स’ ही जगभरात पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी शाळांना सोबत घेऊन पुढील पिढी घडवण्यासाठी ‘मॅक्सप्लोर’ सज्ज आहे. त्यासाठी शाळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. www.maxplore.org या संकेस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनाही नावनोंदणी करता येईल.

अधिक माहितीसाठी संपर्क

अजिंक्य पोतदार, संस्थापक मॅक्सप्लोर

मोबाईल : (९९२००५४७४७/ ०२२ २४३३९६०० / ०२२ २४३३९६०१ )

पत्ता : ३२१, प्रभादेवी इंडस्ट्रीलिअल इस्टेट, प्रभादेवी, मुंबई ४००२५

ईमेल : connectmaxplore.org

संकेतस्थळ : www.maxplore.org
 

 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat