महाराष्ट्र दिन विशेष : घडवू जलसमृद्ध राज्य

    दिनांक  01-May-2019   

 


शिवरायांच्या या लढवय्या मातीला संघर्षाचा इतिहास आहे. मात्र, आता त्याच मातीसाठी पुन्हा एकदा सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे.१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. १ मे २०१९ रोजी आपण ५९ वा महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे " या मागणीतून ' संयुक्त महाराष्ट्र समिती'ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झाला. सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला. कॉ. डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठेआणि अश्या बऱ्याच जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमुल्य योगदान दिले.
 

 

शिवरायांच्या या लढवय्या मातीला संघर्षाचा इतिहास आहे. मात्र, आता त्याच मातीसाठी पुन्हा एकदा सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. महाराष्ट्र दिनी राज्याच्या वाट्याला आलेली एक बातमी म्हणजे राज्यांतील धरणांतील शिल्लक पाणीसाठ्याची...धरणांमध्ये केवळ १९.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये सध्या १७.६९ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो ३३.४६ इतका होता. तर मध्यम प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी या काळात ३३.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तो आता २८.९२ टक्क्यांवर आला आहे 

 

राज्यभरातील धरणांची आकडेवारी पाहता, औरंगाबादच्या धरणांमध्ये सध्या २.७३ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो ३२.५४ इतका होता. नाशिक विभागात सध्या १६.२ टक्के पाणीसाठा असून, गतवर्षी तो ३५.८९ इतका होता. नागपूर विभागात सध्या ८.६९ टक्के इतका पाणीसाठा असून, तो गतवर्षी १६.८२ इतका होता. कोकणात गेल्यावर्षी ४८.७८ टक्के पाणीसाठा होता, यंदा तेथे केवळ ३६.५८ टक्के पाणी आहे. मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या कोकणातही पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर याचार जिल्ह्यांमध्ये ७५७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मे मध्ये ही संख्या दीड ते दोन हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परिस्थिती आणखी भीषण होण्यापूर्वी राज्याला पाणीदार बनवण्यासाठी एका मोठ्या सामाजिक चळवळीची गरज आहे.

 

सुरुवात आपल्या गावापासून करू...विचार आपल्या गावापासून करू... गाव पाणीदार बनवण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यापैकी पाणी फाऊंडेशन असो, सरकारचे जलयुक्त शिवार असो...मात्र, त्याला आणखी बळ आवश्यक आहे. गावात वृक्षारोपण मोहीम, पाणी बचत, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी आवश्यक अशी जनजागृती, शहरी भागात रेन वॉटर हार्वेस्टींग सारख्या उपाययोजना राबवण्याची गरज आहे. आम्हाला पाणी मिळतं ना, जगाचा विचार आम्ही का करू, अशा वृत्तीविरोधात जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. काही दिवसांपूर्वी एका आदीवासीपाड्यावर हंडाभर पाण्यासाठी दोन आदिवासी महिला एकमेकींच्या झिंज्या उपटतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुंबईकरांनाही नळावरची भांडणं नवी नाहीत. मात्र, याहून भयानक परिस्थिती पाणी नसेल तर उद्भवायची भीती पाण्याच्या समस्यांमुळे आहे. गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन शहरात २१ एप्रिल रोजी डे-झिरो घोषित करण्यात आला. याचा अर्थ घरात येणारे पाणी, शहरातील सर्व पाणीपुरवठा बंद करण्यात आला. लोकांना पाणी पिण्यासाठी आता रांगेत उभे राहावे लागत आहे. शहरात सुरू केलेल्या दोनशे केंद्रांवर नागरिकांना पाणी भरून घ्यावे लागत आहे. पाणी मुबलक असताना त्याची नासाडी आणि नसल्यावर एका थेंबासाठी वणवण, अशी परिस्थिती आज दुष्काळी भागात आहे.
 

राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळामुळे आत्महत्या आजवर केल्या. काही गावांनी मात्र, दुष्काळावर मात करत आपली गावे पाणीदार बनवली आहेत. अनेकांनी आपल्या गावाचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक जणांनी आपल्या गावाला हा लाभ करून घेतला. प्रश्न आहे आता ही चळवळ अधिक बळकट करण्याची शहरातील नागरिकांनीही यात सहभागी होण्याची आणि पाण्याची कोणत्याही प्रकारे होत असलेली नासाडी शक्य तितक्या कमी वेळेत थांबवण्याची...आणि सर्वसंपन्न असलेल्या आपल्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्याची... 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat