माणुसकीची तृतीया...

    दिनांक  01-May-2019समाजाने दुय्यम वागणूक देऊनही आपल्या समाजाला नवी दिशा देणाऱ्या मुंबईच्या तृतीयपंथीय प्रिया पाटील यांचा हा खडतर प्रवास...

 

रस्त्यावर, सिग्नलवर, रेल्वेमध्ये लोकांच्या डोक्यावर मायेने हात ठेवून चार पैसे मागणारा तृतीयपंथीय समाज. पण, या समाजाबद्दल लोकांमध्ये भीती, कुतूहल आणि काही अंशी सहानुभूतीसुद्धा दिसून येते. परंतु, बहुतांश वेळा पुरुषाच्या शरीरात स्त्रीजीवन जगणाऱ्या या तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आजही स्थान दिले जात नाही. त्यामुळे सामान्य लोकांप्रमाणे शिक्षण घेणे, नोकरी-धंदा करण्यापासून बहुतांशी तृतीयपंथीय वंचित राहतात आणि नाईलाजास्तव पोटापाण्यासाठी त्यांनी लोकांसमोर हात पसरवण्याची वेळ येते. मात्र, हे कष्टमय जीवन जगणाऱ्यांमध्येही काही अपवाद आहेत. विक्रोळीत राहणाऱ्या प्रिया पाटील या ३० वर्षीय तृतीयपंथी. त्या स्वत: उच्चशिक्षित आहेत. एका चांगल्या घरात प्रिया पाटील यांचा जन्म झाला. त्यांच्या घरच्यांनीच सुरुवातीला त्यांना ‘असे’ स्वीकारण्यास प्रतिकूलता दर्शविली. तेव्हा त्यांना खूप मनस्तापातून आणि कष्टदायक जीवनाला सामोरे जावे लागले. आजूबाजूच्या लोकांच्या खोचक, लिंगवाचक प्रश्नांनी त्या घायाळ झाल्या. मात्र, मदतीला कोणीच आले नाही. मग त्यांनी स्वतःच शिक्षणाची कास धरुन जिद्दीने एमकॉम पूर्ण केले. पण, त्यानंतरही नोकरीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले झाले नाहीत. प्रिया निराशा झाल्या, हतबल झाल्या. नकारात्मक विचारांनी त्यांचे मन पुरते पोखरले. पण, आपल्याला खचून चालणार नाही, आपल्यासारखे असे किती जण असतील, ज्यांना शिक्षणाच्याही संधी मिलाल्या नाहीत. म्हणून मग प्रिया यांनी निर्मला निकेतन महाविद्यालयातून सर्वप्रथम ‘सामाजिक कार्य’ विषयामध्ये पदविका संपादन केली.

 
सध्या त्या तृतीयपंथीयांनीच स्थापन केलेल्या ‘किन्नर माँ ट्रस्ट’साठी ‘प्रोग्राम मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहेत. “या ट्रस्टमध्ये अनेक तृतीयपंथीय कार्यरत आहेत. प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगळी असते. जेव्हा त्यांना त्यांचे कुटुंब स्वीकारण्यास असमर्थता दर्शवते, तेव्हा त्यांच्यावर रस्त्यावर भीक मागण्याशिवाय पर्यायच नसतो,” असे प्रिया म्हणतात. विक्रोळीच्या ‘किन्नर माँ’ या संस्थेत अनेक तृतीयपंथी आहेत, ज्यांची कहाणी मन हेलावून टाकते. अशीच एक कहाणी अंबरनाथमधून आलेल्या रज्जूची. लहानपणीच या मुलांना गुरूंच्या हाती सोपवून त्याच्यापासून त्यांचे पालक नामानिराळे होतात. कळत्या-नकळत्या वयात पालकांपासून दुरावल्यामुळे अनेकांना आपण कोण, आपले नाव काय, याचीही कित्येकांना माहिती नसते. रज्जू सांगतात की, “मी लहानपणापासून माझ्या गुरूंकडे आहे. माझे आई-वडील कोण, कुठले, याची मला काहीच माहिती नाही. तेव्हापासून आज वय वर्ष ६० होईपर्यंत मी इथेच आहे. त्यामुळे गुरूच माझ्यासाठी सर्वस्व आहेत. घरातली कामे आणि तरुण वयात वेश्या व्यवसाय आणि आत उतारवयात भीक मागणे, असेच माझे जीवन आहे. हे जीवन हाल, उपेक्षा, व्यथा, यातना यांनीच घडले आहे. काम द्यायला कोणीच तयार नसल्याने भीक मागण्याशिवाय पर्यायच उरत नाही.” या तृतीयपंथींचे गुरू सर्व ‘चेल्यां’ना हाताशी घेऊन समाजाचे काम करत असतात. काही गुरू श्रीमंत असतात, ते आपल्या टोळीतील चेल्यांची काळजी घेतात. त्यामुळे गुरूला सर्वांकडूनच मोठा मान दिला जातो. प्रत्येकाला विभाग वाटून दिल्यामुळे कोणी दुसऱ्याच्या विभागात हस्तक्षेप करत नाही. मुंबईत सध्या काही तरुण पैसे मिळविण्यासाठी साड्या नेसून, स्त्रियांसारखे हातवारे करीत लोकांना घाबरवून भीक मागण्याचे काम करीत होते. मात्र, या ट्रस्टच्या तृतीयापंथींनी त्यांना ‘समज’ दिल्यामुळे या प्रकाराला थोडा चाप बसला आहे.
 

काही तृतीयपंथीय उच्चशिक्षित असूनही त्यांना कोणीही काम देत नाही. ‘माणूस’ म्हणून जगण्याचा हक्क त्यांना समाजाकडून कधीच मिळाला नाही. आज अनेक सामाजिक संस्था तृतीयपंथीयांसाठी लढा देत असूनही समाजात त्यांच्याविषयीची मानसिकता बदलण्याबाबत सकारात्मक बदल झालेला दिसत नाही. तृतीयपंथींच्या संघर्षमय जीवनाला सुसाहाय्यता मिळावी, त्यांना सामान्य माणसासारखे जीवन जगता यावे, याकरिता प्रिया मेहनत घेत आहेत. याबद्दल प्रिया सांगतात की, “मला आमच्या समुदायासाठी शहरात आश्रम काढायचा आहे, जेथे आम्ही त्यांना शिक्षित करू आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करू. भेदभाव आणि समाजात मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे किन्नरांना शिकण्याची इच्छा असूनही ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. शहरातल्या कमीतकमी तीन आश्रमांचा आम्ही लाभ घेण्यासाठी योजना आखत आहोत.” याशिवाय, प्रिया पाटील गरीब महिला व बेरोजगार युवकांना कौशल्य विकास आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करण्यास उत्सुकआहेत. एवढेच नाही, तर २०१७च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्या उभ्या राहिल्या होत्या. मात्र, त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. प्रिया पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. एक राजकीय व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडविण्यास सहकार्य मिळेल, या आशेने त्यांनी राजकारणाची वाट धरली. पण, ही वाट सोपी नाही. अपार मेहनत, कष्ट घ्यायचे असून या समाजात अनेक बदल घडवायचे आहेत. प्रिया पाटील यांच्या आव्हानात्मक प्रवासाची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मात्र, अखंडपणे आणि खंबीरपणे ही तिसरी वाट निवडून मार्गक्रमण करणाऱ्या प्रिया पाटील यांना सलाम...!

 
- कविता भोसले 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat