भारत सरकारचे मोठे यश : मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

01 May 2019 19:04:36



नवी दिल्ली : २००१ सालच्या संसदेवरील हल्ल्यासह भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश--मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्यासाठी भारताने केलेल्या मुत्सद्देगिरीला मोठे यश मिळाले आहे. बुधवार दि. १ मे रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले, हा भारताचा मोठा विजय मानला जात आहे.

 

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताकडून चौथ्यांदा मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला होता. तत्पूर्वी चीनने तीन वेळा आपल्या नकाराधिकाराचा वापर करत या प्रस्तावाला विरोध केला होता. यंदा मात्र पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठिंबा दिला. परिणामी भारतीय मुत्सद्देगिरी आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे चीनला आपल्या भूमिकेत बदल करत नरमाईची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे कायम पाकला पाठिंबा देणाऱ्या चीननेच माघार घेतल्याने पाकिस्तानला जोरदार दणका बसला.

 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता मौलाना मसूद अझहर पाकिस्तानव्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशात जाऊ शकणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या कोणत्याही सदस्य देशाला मसूदला अर्थपुरवठा किंवा शस्त्रास्त्रे पुरवता येणार नाहीत. यामुळे मसूदची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे मोडले आहे. मसूदच्या अटकेसाठी पाकिस्तानवर आता दबाव वाढेल किंबहुना पाकिस्तानला त्याच्यावर कारवाई करणे भाग पडणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0