महाराष्ट्र दिनाचा महाराष्ट्रासह देशभरात उत्साह

    दिनांक  01-May-2019मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा संपन्न झाला.

 

महाराष्ट्र हे देशपातळीवर एक अग्रगण्य राज्य असून हा लौकिक यापुढेही कायम राहण्यासाठी सर्वांनी कार्यतत्पर राहावे असे असे सांगून सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी आपल्या संदेशात सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळण्याचे, उपलब्ध जलसाठ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून जलसाक्षरता ही संकल्पना सर्वांनी यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 

महाराष्ट्र हे देशांतर्गत तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून ते देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे सांगताना राज्यपाल विद्यासागर राव यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापनदिनी नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,असे आवाहन शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या सोहळ्यात केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्र्यांचे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण

 

 
 

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बृहन्‍मुबई महानगर पालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुख्य सचिव यु.पी.एस मदान, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता तसेच प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat