माहात्म्य वेदज्ञानाचे...!

    दिनांक  01-May-2019


 

 

बृहस्पते प्रथमं वाचो अग्रं

यत्प्रैरत नामधेयं दधाना:।

यदेषां श्रेष्ठं यदरिप्रमासीत्प्रेणा तदेषां निहितं गुहावि:॥ (ऋग्वेद-10.71.1)

 

अर्थात, (बृहस्पते) हे वेदज्ञानाच्या अधिपती परमेश्वरा! (प्रथमम्) सर्वात अगोदर, सृष्टीच्या प्रारंभी (नामधेयम्) विविध वस्तू वा पदार्थांच्या नामकरणाची इच्छा (दधान:) अंतरात्म्यात बाळगणार्‍या प्राचीन ऋषींनी (यत्) जे (वाच:) वचन, शब्द (प्रैरत) उच्चारले, तो वाणीचा(अग्रम्) पहिला प्रकाश होता. (एषाम्) यांच्यामध्ये ही (यत्) जे (श्रेष्ठम्) श्रेष्ठ, महान आणि (यत्) जे (अरिप्रम्) निर्दोष, पापविरहित (आसीत्) होते, (एषाम्) अशांच्याच (गुहावि:) हृदयरुपी गुहेमध्ये (निहितम्) स्थापित झालेला (तत्) तो ज्ञानप्रकाश (प्रेणा) तुझ्याच प्रेरणेमुळे (आवि:) सर्वत्र व्यक्त होत आहे.

 

विवेचन - हे सारे जग निर्माण झाले, तेव्हा मानवासह इतर जड-चेतन तत्त्वांचीही उत्पत्ती झाली. त्यावेळी मनुष्यास ज्ञानसंपादनाची गरज भासली. ऋषी-महर्षींनाही सृष्टीतील सर्व पदार्थांचे नामाभिधान करण्याची इच्छा जागृत झाली. अशावेळी परमेश्वराने त्या सर्वज्ञानी ऋषिवृंदांच्या अंत:करणात ज्या ज्ञानाचा प्रकाश केला, ते म्हणजे ‘वेदज्ञान’ होय. मानवसमूहाला जीवन जगण्यासाठी ईश्वराने जी भाषा शिकविली, ती वेदांची वाणी म्हणजे त्याचा तो पहिला ज्ञानप्रकाश होय.

 

तिन्ही काळी, सर्वत्र ज्याप्रमाणे मानवांकरिता अन्न, वस्त्र, निवारा या तीन गरजा अत्यावश्यक असतात, त्याहूनही अधिक गरज असते ती ज्ञानाची! ‘ऋते ज्ञानान्न मुक्ति:।’ म्हणजेच ज्ञानाशिवाय सर्व दु:खापासून मुक्ती नाही, असे वेदमंत्र वर्णितो. योगेश्वर श्रीकृष्णांसारख्या सत्पुरुषांनीदेखील ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते।अशा शब्दांत ज्ञानाची महती गायिली आहे.

 

या मंत्रात बृहस्पति म्हणजे ब्रह्मांडाच्या त्या अधिपति, अधिनायकाने विश्वाची संरचना करतानाच समग्र मानवाच्या विकासासाठी पवित्र वेदवाणीचे वरदान दिले. याच ज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक वस्तूंचे नामकरणदेखील करता येते. तसेच विविध प्रकारच्या आध्यात्मिक व भौतिक ज्ञानाचा शोधही घेता येतो. प्राचीनकाळच्या ऋषिमुनींनी, दार्शनिकांनी आणि सद्य युगातील शास्त्रज्ञांनीदेखील याच ज्ञानाचा समृद्ध वारसा पुढे चालविला आहे. सामान्य माणसे ही स्वार्थी, सांसारिक मोहजाळात अडकलेले आणि षड्रिपूंनी ग्रस्त असतात. स्वत:च्या स्वार्थापलीकडे त्यांना काहीच सूचत नाही. त्यांची ही जीवनयात्रा अशीच भौतिक सुखविलासात युगानुयुगे सुरूच असते. पण, ज्यांची अंत:करणे शुद्ध व पवित्र असतात, जे योगाभ्यासाद्वारे आध्यात्मिक जीवन जगतात, वावरतात आणि जे प्रखर सत्यनिष्ठ, तपस्वी, त्यागी, परोपकारी आणि ईश्वर साक्षात्कारी असतात. अशांचे ध्येय मात्र ईश्वरीय असते. ते सतत परमेश्वराच्या सान्निध्यात वास्तव्य करतात.

 

अशाच ईश्वराशी सतत तादात्म्य भाव ठेवत चिंतन व मननात व्यस्त असणार्या प्रज्ञावंत, आत्मज्ञानी ऋषी-महर्षींच्या अंत:करणात तो बृहस्पति म्हणजेच विश्वाचा बृहत् पालक परमेश्वर नेहमीच ज्ञानाची प्रेरणा देत असतो. त्यामुळे वेदज्ञानाच्या प्रकाशकिरणांचा विस्तारदेखील त्या ऋषिजनांच्या पवित्र व शुद्ध अंत:करणातच प्रकट होत असतो. विश्वाचे ज्ञानकेंद्र असलेल्या चार वेदांचा उल्लेख ऋग्वेदातील पुरुष सूक्तात व यजुर्वेदातील 31व्या अध्यायात आढळतो.

 

तस्माद्यज्ञात्सर्वहुत: ऋच: सामानि जज्ञिरे।

छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत॥

 

इथे ज्या सर्वव्यापी अव्यक्त व महदादिविलक्षण चेतन ‘पुरुष’ शब्दांकरिता ‘यज्ञ’ हा पर्यायवादी शब्द आला आहे. त्या पूजनीय सर्वहुत-सर्वज्ञानदात्या यज्ञीय परमेश्वरापासून ऋच: (ऋग्वेद), सामानि (सामवेद), छन्दांसि (अथर्ववेद) आणि (यजु:) यजुर्वेद उत्पन्न झाले. हे चारही वेद अनुक्रमे अग्नी, वायु, आदित्य आणि अंगिरा या ऋषींच्या पवित्र अंत:करणात प्रकट झाले. यातील ऋग्वेदांचा विषय ‘ज्ञान,’ यजुर्वेदाचा विषय ‘कर्म,’ सामवेदाचा विषय ‘उपासना’ आणि अथर्ववेदाचा विषय ‘विज्ञान’ आहे. हे चारही वेद सर्व विद्यांचे माहेरघर होत. महर्षी मनूंनी वेदांचा गौरव करीत म्हटले आहे- ‘सर्वज्ञानमयो हि स:।’ म्हणजेच वेदज्ञान हे सर्व ज्ञानयुक्त आहे. तसेच ‘धर्मं जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुति:।’ धर्मतत्त्वांविषयी जिज्ञासा बाळगणार्‍यांकरिता श्रुती (वेद) हे सर्वात मोठे प्रमाण आहेत.

 

पौर्वात्य विद्वान, चिंतक व विचारवंतांप्रमाणेच पाश्चात्य तत्त्ववेत्यांनीदेखील वेदांचे महत्त्व वर्णिले आहे. पाश्चिमात्य विद्वान प्रो. मॅक्समूलर यांनी 'Rigveda is the oldest book in the libariry of makind' असे वेदांप्रति गौरवोद्गार काढले आहेत. संत ज्ञानेश्वरांनीही ‘ओम् नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या’ या ओवीने आपल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आरंभ केला. वेद हे सकल ज्ञानाचे अधिष्ठान आहेत. असेे हे शुद्ध व पवित्र वेदज्ञान ‘अरिप्रम्’ म्हणजेच सर्वश्रेष्ठ व निर्दोष आहे.

 

कोणत्याही प्रकारची न्यूनता अथवा कमतरता त्यात नाही. परमेश्वर हा या वेदरुपी काव्याचा कवी आहे. त्याचे हे काव्य कधीच नाहीसे होत नाही. ते प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी अखंडितपणे प्रवाहित होत राहणारे आहे. अथर्ववेदात याविषयी संकेत करण्यात आला आहे. अशा या वेदवाणीचे अध्ययन, चिंतन, मनन व तत्त्वानुसरून करीत आपण आपले जीवन पवित्र करु या...!

 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

9420330178

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat