मायावी घटोत्कच!

    दिनांक  01-May-2019अर्जुनाने राधेयशी लढण्यास घटोत्कचला पाठवले आणि दोघांचे घनघोर युद्ध सुरू झाले. दुर्योधनाने अश्वत्थाम्यास बोलावून सांगितले की, “तू राधेयची मदत कर.” नेमक्या त्याच क्षणी जरासुराचा पुत्र तिथे आला आणि म्हणाला, “भीमाने माझ्या पित्याचा वध केल्यापासून मला त्याचा सूड घ्यायचा आहे. मला पांडवांशी लढायची परवानगी द्या.” हे ऐकून दुर्योधनास आनंदच झाला. असुरांशी लढायला असुरच मिळाला. त्याने त्याचे स्वागत केले.

 

जरासुराचा पुत्र घटोत्कचाशी लढू लागला. दोघेही राक्षस रात्रीच्या काळोखात मायावी तंत्र वापरून लढत होते. त्याने पांडव सैन्याचा खूप संहार केला. पण, त्याचा रथ घटोत्कचने तोडला. मग जमिनीवर बराच वेळ युद्ध झाले. एका बेसावध क्षणी घटोत्कचने आकाशात तलवार घेऊन उड्डाण केले आणि तलवारीचा घाव घालून जरासुरपुत्राचे शिर उडवले. ते शिर घेऊन तो दुर्योधनाच्या रथाशी पोहोचला आणि ते मस्तक त्याच्या रथात ठेवून म्हणाला, असे म्हणतात की, “राजाच्या भेटीस रिकाम्या हाताने जाऊ नये. तुझ्या अतिशय जवळच्या माणसाचे हे मस्तक मी तुला भेट म्हणून आणले आहे. अजून थोडा वेळ थांब मी तुला राधेयचे पण मस्तक आणून देतो,” असे म्हणून विकटपणे हसत घटोत्कच राधेयकडे गेला.

 

घटोत्कच कधी जमिनीवर, तर कधी आकाशात प्रकट व्हायचा. त्यामुळे राधेयास त्याला तोंड देणे कठीणच जात होते. पण, त्याच्या मायावी तंत्राला राधेय पुरून उरत होता. एका मायावी अस्त्राला तो दुसरे अस्त्र वापरून बरोबर उत्तर देत होता. घटोत्कचचा विशाल देह आणि लाल बुंद डोळे पाहून कौरव सैनिक घाबरून जात होते. तो हजारो सैनिक मारत सुटला. त्यांच्या किंकाळ्यांनी युद्धभूमीवर गोंधळ माजला होता. घटोत्कच राधेयावर आकाशातून बाणांचा वर्षाव करत होता आणि क्षणात पुन्हा जमिनीवर उतरून लढत होता. नाना रूपे धारण करून तो सैनिकांना छळत होता.

 

दुर्योधनास भेटायला अलायुध नावाचा राक्षस आला. त्याच्या नातेवाईकांचा म्हणजे, हिडींब, किर्मीर आणि बकासुर यांचा पूर्वी भीमाने वध केला होता. अलायुध त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी पांडवांशी लढणार होता. हे ऐकून दुर्योधन खूप खूश झाला. त्याने घटोत्कचाच्या वधाची कामगिरी अलायुधवर सोपवली. अश्वत्थामा, कृप, द्रोण आणि कृतवर्मा यांच्याहून राधेय श्रेष्ठ योद्धा होता. पण, आज घटोत्कच त्याला अधिक भारी पडत होता. म्हणून दुर्योधनानेअलायुधला जवळ बोलावून सांगितले, “तू पाहतो आहेस, तो घटोत्कच राधेयला किती त्रास देतोय ते. माझ्या सैन्याचा पण नाश करतो आहे. तू त्या घटोत्कचला मार आणि राधेय व माझ्या सैन्याचे रक्षण कर.”

 

राधेय आणि अलायुध असे दोघेजण आता घटोत्कचशी एकाच वेळी लढू लागले. हे पाहून भीम पुढे आला आणि अलायुधाशी लढू लागला. कृष्णाने अर्जुनाला पण सांगितले की, “भीमाची आता मदत कर.” अर्जुन आणि सर्वच पांडव आता घटोत्कचच्या मदतीला आले. काही वेळातच घटोत्कचाने अलायुधचे मस्तक धडापासून वेगळे केले आणि तेही दुर्योधनच्या रथात ठेवले. ते मस्तक पाहून दुर्योधनच्या काळजात तर धडकीच भरली.

 

घटोत्कचच्या आरोळ्यांनी सारे आकाश दुमदुमले. त्याने पुन्हा राधेयवर मायावी अस्त्रे सोडण्यास सुरुवात केली. राधेय त्याला चोख उत्तरे देत होता. त्याने पाषाण अस्त्र सोडले, तर राधेयने उत्तर म्हणून वायव्यास्त्र सोडले. त्याने आकाशातून बाणांचा वर्षाव केला, तर राधेयने इंद्रास्त्र सोडून सर्वांचे रक्षण केले. परंतु, कौरव सैनिक खूप घाबरले होते व राधेयला सारखी विनंती करत होते की,“या घटोत्कचाला ठार कर! तसे एक विशेष अस्त्र तुझ्याकडे आहे, त्याचा वापर करून याला संपव.” त्यांचा इशारा इंद्राने राधेयास दिलेल्या वासवी शक्तीकडे होता आणि राधेयने ती शक्ती अर्जुनावर वापरण्यासाठी राखून ठेवली होती.

 
(क्रमश:)
 

- सुरेश कुळकर्णी

[email protected]

9821964014

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat