शरदराव असलं वागणं शोभतं का ? - पंतप्रधान मोदी

09 Apr 2019 14:44:53



लातूर : औसा येथील महायुतीच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून काँग्रेसला त्यांनी लक्ष केले, काँग्रेसचा जाहीरनामा ढकोसला पत्र असल्याचे मोदी म्हणाले. काँग्रेस आज फुटीरतावाद्यांसोबत उभी असून काँग्रेसकडून अपेक्षा करू शकत नाही पण, शरद पवार अशा काँग्रेसला साथ देणे तुम्हाला शोभते का? असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांना केला.

 

औसा येथील सभेत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमधून केली. छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वाभिमानी आणि शक्तिशाली देशाची कल्पना केली होती, आज आपला देश छत्रपतींच्या सांगितलेल्या मार्गावरूनच चालला असल्याचे मोदी म्हणाले. यासोबतच उपस्थित जनसमुदाय उन्हामध्ये बसलेला पाहून मोदींनी तुमचे कष्ट मी वाया जाऊ देणार नाही, विकासाच्या रूपाने मी तुमची परतफेड करेल असेही ते म्हणाले.

 

शरद पवार तिकडं शोभत नाहीत

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान असावा अशा लोकांच्या मागे उभा आहे. देशाला काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा नाही मात्र, शरद पवार तिकडं शोभत नाहीत? असा टोला त्यांनी लगावला.

 

चोर कोण आहे?

 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याचा पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. काँग्रेस मागील सहा महिन्यांपासून चौकीदार चोर असल्याच्या घोषणा देते पण खरे चोर हेच आहेत. करोडोंची बेहिशोबी रक्कम यांच्याच कार्यकर्त्यांकडून आढळून आली. यासोबतच त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर हल्ला चढवला. काँग्रेसचा जाहीरनामा हा जाहीरनामा नसून तो ढकोसला पत्र आहे. काँग्रेस काम करत नाही, फक्त घोषणा करते असा आरोप त्यांनी काँग्रेसवर लावला. पाकिस्तानला जे पाहिजे तेच यांच्या ढकोसला पत्रामध्ये दिसून येत आहे.

 

यावेळी त्यांनी मानवतावादाच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसवर गंभीर आरोप केले. ते म्हणले, "काँग्रेसने आपला चेहरा आरशात पहावा मगच मानवतावादाच्या गप्पा माराव्यात. हीच ती काँग्रेस आहे जिने बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता." दरम्यान, भाजपा-शिवसेनेची युती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे प्रथमच एकत्र आले. यावेळी मोदींनी उद्धव यांना आपला छोटा भाऊ म्हणून संबोधले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेते उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0