कमलनाथ यांचे पाय खोलात; २८१ कोटी रुपयांचे बेहिशोबी रॅकेट उघड

09 Apr 2019 12:26:26



इंदोर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खाजगी सचिव प्रवीण कक्कड आणि इतर जवळच्या सहकाऱ्यांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. मागील तीन दिवसांपासून ही कारवाई चालू असून यातून १४.६ करोड रुपयांची रक्कम आढळून आली आहे. ही कारवाई करत असताना तब्बल २८१ कोटी रुपयांचे बेहिशोबी रॅकेट उघड झाल्याची माहिती आयकर विभागाने रात्री उशीरा दिली.

 

लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत कर चोरी आणि हवाला व्यवहारांच्या आरोपाखाली आयकर विभागाने भोपाळ, इंदोर, दिल्ली आणि गोवा येथे ही कारवाई केली. यातील इंदोर आणि दिल्ली येथे संशयास्पद नोंदी असलेल्या डायरी आणि कॉम्पुटर फायली आढळून आल्या आहेत. आयकर विभागाने जप्त केलेल्या रकमेचा उपयोग निवडणुकांच्या खर्चासाठी व मतदारांना वाटण्यासाठी करण्यात येणार होता असा संशय व्यक्त केला जात आहे.

 

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डानेही (सीबीडीटी) याला दुजोरा दिला असून व्यवसाय, राजकारण, सार्वजनिक सेवा अशा विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या माध्यमातून २८१ कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली आहे. दरम्यान, आयकर विभागाचे ३०० कर्मचारी कमलनाथ यांचे जवळचे सहकारी आणि इतर ५२ ठिकाणी रविवारी पहाटे तीन वाजल्यापासून कारवाई करत होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0