समाज सक्षमीकरणाचे ‘रिनोव्हेट’

    दिनांक  09-Apr-2019   सामाजिक संस्थांचे सक्षमीकरण, त्यांच्याद्वारे परिणामकारक कार्य आणि त्याद्वारे सकारात्मक सामाजिक परिवर्तन करणे हे लक्ष्य आणि उद्दिष्ट असलेली संस्था म्हणजे ‘रिनोव्हेट इंडिया.’ ‘रिनोव्हेट’ म्हणजे पुनर्बांधणी. पण, सामाजिक संस्थांची पुनर्बांधणी आहे, तिचे पुननिर्माण नाही. संस्थांच्या मूळ उद्देशाच्या गाभ्याला किंचितही धक्का न लावता, उलट त्या उद्देशाला परिपूरक बांधणी करत त्या संस्थांचे सर्वांगीण सक्षमीकरण करणारी संस्था म्हणून ‘रिनोव्हेट इंडिया’ आज कार्यरत आहे.


हे फक्त संकल्पनेच्या संदर्भातले नाही, तर संकल्पना, इच्छाशक्ती प्रत्यक्ष वास्तवात आणण्यासाठीचे आहे. असा आशावाद नव्हे, तर लक्ष्य घेऊन काम करणारी ‘रिनोव्हेट इंडिया संस्था.’ सामाजिक संस्थांना प्रेरणा देण्याचे आणि मार्ग दाखवण्याचे काम ही संस्था करते. मात्र, सामाजिक उद्योजकतेच्या आयामातून संस्थेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे संस्थेचे संस्थापक प्रथमेश रावराणे आणि अलोक कदम यांनी संस्थेचे ध्येयच ठरवले की, समाजाच्या कल्याणासाठी काम करणार्‍या संस्थांचे उत्थान करायचे. मात्र, हे करत असताना या संस्थांना स्वत:ची जबाबदारीसुद्धा पार पाडायला हवी. त्यासाठी ‘रिनोव्हेट इंडिया’ संस्थांचे सक्षमीकरण करणार्‍या उपक्रमांसाठी शुल्क आकारते. पण हे शुल्क अत्यंत माफकच म्हणायला हवे.

सध्या संस्था तीन उपक्रम राबवते. पहिला उपक्रम आहे तो, समाजविकास उपक्रम. यामध्ये सध्या १२ संस्था सहभागी आहेत. दुसरा उपक्रम आहे, संस्था विकास कार्यक्रम. यामध्ये १०० संस्था सहभागी आहेत, तर तिसर्‍या प्रशिक्षण आणि कार्यक्रम उपक्रमामध्ये ३५० संस्था सहभागी आहेत. २०१५ साली दोन मराठमोळ्या तरुणांनी कष्टाची परिसीमा गाढून उभ्या केलेल्या ‘रिनोव्हेट इंडिया’ संस्थेचे यश लक्षणीयच म्हणावे लागेल.पण हे यश सहजासहजी मिळालेले नाही. सामाजिक क्षेत्रातले योग्य ते सर्व शिक्षण पूर्ण केल्यावर प्रथमेश आणि आलोक या दोन समाजभान असलेल्या तरुणांच्या मनात एक कल्पना आली की देशभरात सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या ३२ लाख संस्था आहेत. पण देशभरातल्या तर सोडाच, पण स्थानिक पातळीवरही शेकडो संस्था छोटी-मोठी सामाजिक कार्य करतात. पण काही वर्षातच त्या संस्थांचा उत्साह मावळून जातो, तर काही संस्था पूर्णत: काम करण्याचे थांबवतात. याचे कारण असते की त्यांना योग्य ती कामाची दिशा, मार्गदर्शन आणि सहकार्य नसते. जर या संस्थांना सहकार्य केले, मार्गदर्शन केले, तर संस्था जगतील, तगतील आणि समाजासाठी चांगले काम करतील. मात्र, त्यासाठी या संस्थांना चांगले प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या प्रशिक्षणासाठी जो खर्च लागतो तो संस्थेकडून घ्यायचा आणि ही कल्पना प्रथमेश आणि अलोकने प्रत्यक्षात उतरवायची ठरवली.

 

नेमके त्याचवेळीअनलिमिटेड इंडिया’ नावाची एक नावाजलेली स्पर्धा होती. त्या स्पर्धेत आपली संकल्पना प्रत्यक्षात कशी साकार करून, त्यामधून एक उद्योग मॉडेल कसे तयार होईल, यावर भर होता. प्रथमेश आणि आलोकने ‘रिनोवेट इंडिया’च्या माध्यमातून सामाजिक संस्था प्रशिक्षण आणि त्यातून उद्योग-व्यवसाय ही संकल्पना मांडत या स्पर्धेत भाग घेतला. अंतिम टप्प्यापर्यंत या दोघांची संकल्पना पोहोचली. मात्र, अंतिम फेरीत त्यांना यश मिळाले नाही. परीक्षकांनी निर्णय दिला की, संकल्पना चांगली आहे पण, व्यवसाय किंवा उद्योग म्हणून ती संकल्पना बिलकूल टिकणार नाही. त्यामुळे या संकल्पनेचा वास्तवात ‘उद्योगाची कल्पना’ म्हणून उपयोग नाही. हा निर्णय ऐकून अलोक आणि प्रथमेश दोघेही निराश झाले. त्यांना वाटले, खरेच का आपण ज्या कल्पनेनुसार अर्थाजन करायचे ठरवले ती कल्पना वास्तवात टिकणारच नाही. क्षणभर दोघांच्या मनात निराशा दाटली. कारण, या संकल्पनेनुसार काम करण्यासाठी दोघांनीही आपली नोकरी सोडली होती. उत्पन्नाचे साधन काहीच नव्हते.

 

 
 

संस्था सक्षमीकरणासाठी काम मिळावे म्हणून दोघेही प्रत्येक सामाजिक संस्थेला भेट देत. आपली ओळख देत, कामाचा तपशील देतात पण, सगळीकडून नकार घंटा. कदाचित दोघे वयाने लहान होते आणि यापूर्वी असे काही कोणी केले नव्हते. त्यातच एका नावाजलेल्या संस्थेकडून फोन आला. तिथून विचारणा झाली की आमचा अहवाल लिहून द्या. पहिल्यांदाच काम मिळाले होते. त्यामुळे दोघेही आनंदीत झाले. पण लगेच संस्थेच्या प्रतिनिधीने त्यांना सांगितले की, हा अहवाल तुम्ही व्हॉलेंटरी लिहून द्या. खरे तर एमएसडब्लू झालेले, एमबीए इन बिझनेसमध्ये शिक्षण घेतलेले आणि याच प्रकारची छोटी-मोठी काम करून या तरुणांना काही वर्षे झाली होती. अर्थार्जन करणे गरजेचे होते, असे त्यावेळी वाटले. संस्था तर खूप मोठी आहे. मग तिने असे का करावे? कदाचित संस्थेला आपण अहवाल लिहू शकतो का, हे पाहायचे असेल. मग त्यांनी होकार कळवला आणि सांगितले निदान संस्थेपर्यंतचा प्रवासखर्च मिळेल का? तर समोरून उत्तर आले ‘नाही देऊ शकत.’ त्यावेळी प्रथमेश आणि अलोकने विचार केला. काम मिळत नव्हते, पहिल्यांदा मिळाले आहे करून पाहावे. ते काम त्यांनी सर्व ताकदीने केले.

 

संस्थेने तो अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवला. त्या संस्थेने तो अहवाल ‘प्रेमजी अझिज’ कंपनीला पाठवला होता आणि आश्चर्य घडले! ‘प्रेमजी अझिज’ कंपनीला तो अहवाल खूप आवडला. कंपनीने त्या संस्थेला सांगितले की, या मुलांकडूनच पुढील अहवाल तयार करा. संपूर्ण एक वर्षाचे अहवाल लिखाण करून घ्या. त्यासाठी मुलांना योग्य ते मानधनही द्या. इथून सुरुवात झाली.” पण अलोक आणि प्रथमेश यांना अहवाल लिहिण्यात रस नव्हता, त्यांना संस्था सक्षमीकरण करण्यात रस होता. ते काम काही मिळत नव्हते. याचवेळी चंद्रकांत तांबे यांनी ‘युनायटेड फॉस्पोरस लिमिटेड’च्या उपाध्यक्ष सँड्रा श्रॉफ यांची भेट घडवली. त्यांनी प्रथमेश आणि अलोकची संकल्पना ऐकली. संस्था सक्षमीकरण, गतिमान करणे आणि त्याद्वारे सकारात्मक समाजबदलाची कार्यप्रणाली ऐकली. त्यांनी ‘रिनोव्हेट इंडिया’ला मदत केली. पुढे मुंबईतल्या अनेक संस्थांचे सक्षमीकरण करण्याचे काम ‘रिनोव्हेट इंडिया’ने केले. संस्थेच्या कामाची दखल आजपर्यंत अनेक मान्यवरांनी घेतली. संस्थेला अनेक पारितोषिक मिळाली आहेत. नुकताच त्यांना ‘इमर्जिंग स्टार्ट अप अवॉर्ड’ फ्रॉम बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन तसेच एसिशिन लिडरशिप अवॉर्ड सोशियल इम्पॅक्ट अवॉर्ड मिळाला आहे.संस्था सक्षमीकरणाची यशोगाथा सिद्ध करणार्‍या ‘रिनोव्हेट इंडिया’चा प्रवास वाखाण्याजोगा आहे. त्यातही प्रथमेश आणि आलोकचे म्हणणे आहे की, ज्या सकारात्मक गोष्टींसाठी मन:पूर्वक प्रयत्न करतो, त्या गोष्टी मिळाल्याशिवाय राहतच नाही. मग ती गोष्ट संकल्पनेची वास्तवपूर्तीही करणे असले तरी...माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

९५९४९६९६३८

संपर्क

प्रथमेश रावराणे ९८६७१०५६५०